You are currently viewing शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळा

भारतात मुस्लिम आक्रमणे सुरु झाल्यावर हळू हळू त्यांची सत्ता उत्तरेकडून दक्षिणेकडे पसरत गेली. मोगल साम्राज्यात पहिल्या ६ बादशहांच्या काळात फार मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. याकाळात हिंदू लोकांवर अनेकदा अत्याचार झाले. मंदिरे, शिल्पे तोडली गेली, त्यांचा भाविकांनी दान रुपी दिलेला, देवांच्या दागिने वस्त्रे आदी संपत्तीचा ठेवा लुटला गेला. मुले, बायकांना पळवले जात असे. 

या अन्यायाच्या विरुद्ध अनेकांच्या मनात रोष असला तरी या बलाढ्य सत्तांपुढे उभे राहणे अवघड होते. शहाजीराजांनी स्वतः स्वराज्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले होते पण त्यांच्या कालखंडात दक्खन प्रदेशात अस्थिरता फार होती. त्यांना स्वराज्यस्थापनेचा बेत पूर्ण करता आला नाही. मातोश्री जिजाबाईंच्या संस्कारांखाली वाढलेले त्यांचे सुपुत्र शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. 

आपल्या पुणे सुपे जहागिरीच्या प्रांतापासुन सुरूवात करत एक एक किल्ला, एक एक प्रदेश स्वराज्याला जोडत हे राज्य उभे राहिले होते. त्यासाठी अनेक लढाया लढाव्या लागल्या. अनेक शुर सरदारांना, मावळ्यांना बलिदान द्यावे लागले. बरेच पेचप्रसंग आले. आपल्या युक्तीने, धैर्याने आणि मावळ्यांच्या बहुमोल साथीने शिवाजी महाराज त्यातुन पार पडले. 

मिर्झा राजा जयसिंग याच्याशी तहानंतर स्वराज्यातला बराच भाग मोगलांच्या ताब्यात द्यावा लागला होता. तोही महाराजांनी पुन्हा परत मिळवला. 

आतापर्यंत महाराज स्वराज्याची शासनव्यवस्था चोख पाहतच होते. पण सुरुवातीला आदिलशाहीचे जहागीरदार (शहाजीराजे आदिलशाहीचे जहागीरदार होते, पुणे सुपे हा त्यांच्या जहागिरीचा भाग होता), मग तहानुसार स्वीकारलेली मोगलांची मनसबदारी अशा प्रकारची पार्श्वभूमी असल्यामुळे आता मराठा साम्राज्य हे कोणाचे अंकित नसुन एक सार्वभौम राज्य आहे हे जाहीर करणे आवश्यक होते. 

सुलतान आणि मोगलांनी राजे, महाराजा अशा मुळात राजासाठी वापरल्या जाणाऱ्या पदव्या आपल्या हिंदू जहागीरदारांना देण्याची पद्धत सुरु केली होती. त्यामुळे स्वतंत्र राज्य नसले तरीही राजा हि पदवी लावणारे अनेकजण होते. 

महाराजांनी आपला विधिवत राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. पूर्वीच्या काळी राजाचे राज्य “राज्याभिषेक” हा विधी करूनच सुरु होत असे. परंतु अनेक पिढ्या सुलतानी, मोगलाई इत्यादींच्या अधिपत्याखाली गेल्यामुळे गेल्या अनेक वर्षात असा विधी कोणाचाच झाला नव्हता. 

असा विधी केल्यामुळे एक परंपरागत सोपस्कार पार पाडुन, अभिषिक्त हिंदू राजाचे राज्य उदयास आले आहे असा संदेश रयतेत, इतर राज्यकर्त्यांपर्यंत गेला असता. लोकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला असता आणि स्वाभिमान जागृत झाला असता. 

या सोहळ्यासाठी महाराजांनी खास काशीहून गागाभट्ट नावाच्या पंडितांना बोलावले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा पार पडला. अभिषेकासाठी सात पवित्र नद्यांचे पाणी आणले होते. महाराजांसाठी ५२ मण सोन्याचे सिंहासन बनवले होते. 

सर्व राज्यातली रयत आपल्या लाडक्या देवासमान राजाच्या अभिषेकाचा सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी रायगडावर एकवटली होती. महाराजांनी या सोहळ्यापासुन छत्रपती हि उपाधी धारण केली. 

डॉ. अमोल कोल्हेंच्या शिवाजी महाराजांवरच्या गाजलेल्या मालिकेस या सोहळ्यापासुनच सुरुवात झाली होती. महाराज दरबारातुन सिंहासनाकडे एक एक पाऊल टाकत जात आहेत आणि प्रत्येक पावलाला त्यांना आपला एक एक शुर सरदार आठवतोय असे दाखवले होते. फार सुंदर पद्धतीने हे दृश्य घेतले होते. 

हा प्रसंग लेखकाच्या कल्पकतेतुन साकार झाला असला तरी महाराजांचं व्यक्तिमत्व असं होतं कि त्याला तो छान शोभुन दिसला. त्यांचे आपल्या साथीदारांवर, रयतेवर अतोनात प्रेम असल्यामुळेच त्यांनाही तसेच प्रेम मिळायचे आणि त्यांच्यावर जीव ओवाळुन टाकायला माणसे सहज तयार व्हायची. 

मोठ्या कालावधीनंतर लोकांचा स्वाभिमान जागवणाऱ्या या घटनेचा महाराष्ट्रावर फार प्रभाव पडला. आजही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे चित्र बऱ्याच घरी लावलेले असते, दुकानांमध्ये, हॉटेलात लावलेले असते. ह्या प्रसंगाचा इतका सगळ्यांना अभिमान वाटतो. 

आणि सहसा या चित्रांमध्ये दृश्य असते ते सिंहासनारूढ महाराजांचे, त्यांच्या आजूबाजूला भरलेला दरबार आणि त्यांना अभिवादन करायला आलेला इंग्रज प्रतिनिधी ह्यांचे. 

व्यापारासाठी इंग्रज, पोर्तुगीज अशा युरोपीय सत्तांनी मुंबई, गोवासारख्या किनारपट्टीच्या भागात आपली सत्ता मिळवली होती. तिथुन त्यांचा समुद्री व्यापार आणि आसपासचा प्रदेश यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न असायचा. शिवाजी महाराजांनी त्यांनाही वचक बसवला होता. 

त्यामुळेच राज्याभिषेकाच्या वेळेस इंग्रजांनी महाराजांशी चांगले संबंध बनवावेत या उद्देशाने आपला प्रतिनिधी पाठवला होता. 

ह्या प्रतिनिधीची यावेळची एक गमतीशीर गोष्ट आहे. राज्याभिषेकाच्यावेळी डौलदार हत्ती वापरण्यात आले होते. पाश्चात्य लोकांना हत्तीचं फार अप्रुप असतं. हा हत्ती पाहून तो आश्चर्यचकित झाला. रायगड चढण्याची अवघड वाट पाहुन तो आला होता. त्याला असा प्रश्न पडला कि माणसे आणि घोड्यांनाही अवघड अशा या वाटेवर हत्ती कसा आला असेल? 

तेव्हा त्याला महाराजांच्या दूरदृष्टीची प्रचिती आली. ते हत्ती लहान वयाचे आणि आकाराचे असतानाच रायगडावर नेले होते. जावळीचा प्रदेश शिवाजी महाराजांच्या ताब्यात येऊन, तेथे रायगड बांधुन, तेथे राजधानी हलवुन राज्याभिषेक करेपर्यंत बराच कालावधी गेला होता. या अशा असंख्य घडामोडी चालु असताना त्यात शिवाजी महाराजांनी हत्ती लहान असतानाच गडावर नेऊन ठेवण्याची कल्पकता दाखवली होती. 

अशा या द्रष्ट्या, प्रजावत्सल, शूरवीर, पहाडासारख्या खंबीर छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम!!!

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा