You are currently viewing दिसुनही न पाहणारे

दिसुनही न पाहणारे

एक दिवस अकबराने बिरबलाला एक विचित्र प्रश्न केला. “बिरबल, या जगात आंधळी माणसं जास्त असतील कि डोळस माणसं जास्त असतील?”

बिरबलाने लगेच उत्तर दिले. “खाविंद, अशी गणना तर कोणी केली नाही, पण माझ्या मते जगात आंधळी माणसंच जास्त असतील.”

अकबराचे समाधान झाले नाही. “बिरबल, जर गणना केलीच नाही तर तू कशाच्या आधारे हे सांगतो आहेस? उगाच तडक उत्तर देण्यासाठी काहीही सांगु नकोस.”

दुसऱ्या दिवशी बिरबल रस्त्यावर एका चौकात आपल्या दोन सहाय्यकांसोबत जाऊन बसला. दोन्ही सहाय्यकांकडे वह्या आणि लेखणी होती. बिरबल स्वतः दोघांच्या मध्ये धान्य घेऊन जात्यावर दळत बसला. 

राज्याच्या वजिराला भर चौकात दळण दळताना पाहुन सर्वांना आश्चर्य वाटायला लागले आणि लोक येऊन बिरबलाला त्याबद्दल विचारू लागले. बिरबल अशा लोकांची नावे आपल्या सहाय्यकांपैकी एकाला त्यांच्या वह्यांमध्ये लिहायला सांगु लागला. 

पाहता पाहता हि बातमी संपूर्ण शहरात पसरली. स्वतः बादशहा अकबरापर्यंतही हि बातमी जाऊन पोहोचली. अकबराचा यावर विश्वास बसत नव्हता कि बिरबल रस्त्यावर दळण कसा काय दळतोय? 

अकबर स्वतः त्या चौकात बिरबलाला भेटायला आला. आणि खरंच बिरबलाला दळण दळताना पाहुन आश्चर्यचकित होत त्याने विचारले “अरे बिरबल, हे तु काय करतोयस?”

बिरबलाने आपल्या सहाय्यकाला सांगितले, “सुरज, खाविंदांचे नाव तु तुझ्या यादीत लिही.”

अकबराने दोन्ही सहाय्यकांकडे आणि त्यांच्या वह्यांकडे पाहिले. एका सहाय्यकाची वही बरीचशी रिकामीच दिसत होती. आणि अकबराचे नाव ज्यात लिहायला सांगितले ती भरत आली होती. अकबराने ती वही हातात घेऊन पाहिली. त्या वहीचे शीर्षक होते “आंधळ्या लोकांची यादी”. 

अकबर आपले नाव या यादीत लिहायला सांगितलेले पाहुन संतापला. त्याने बिरबलाला जाब विचारला “बिरबल हा काय प्रकार आहे. तुला चांगलं माहित आहे मला सगळं व्यवस्थित दिसतं, तरीही तु माझं नाव आंधळ्या लोकांच्या यादीत का लिहिलंस?”

बिरबलाने उत्तर दिले. 

“क्षमा असावी खाविंद, पण आपल्याला मी काय करत होतो हे दिसत असूनही हे तु काय करतोय बिरबल असा प्रश्न विचारला. आपल्याला समोरचं दिसत असूनही दुर्लक्ष करणाऱ्यांना आंधळंच म्हणावं लागेल ना. म्हणुन मी तुमचं नाव त्या यादीत लिहायला सांगितलं. आज इथे आल्यापासुन बहुसंख्य लोकांनी अशाच प्रकारे चौकशी केली. 

फार कमी लोकांनी मी दळण दळतोय हे समजुन पुढचे प्रश्न विचारले, कि मी दळण का दळतोय, मला काही समस्या आहे का, मला खाविंदानी काही शिक्षा दिली आहे का वगैरे. फक्त अशा लोकांची नावे मी डोळस लोकांच्या यादीत लिहिली आहेत, ती यादी फारच छोटी आहे.

म्हणुन मी काल म्हणालो होतो, जगात आंधळ्या लोकांचं प्रमाणच जास्त आहे असं मला वाटतं.”

आपला मुद्दा पटवुन द्यायला बिरबलाने इतक्या टोकाचे प्रात्यक्षिक केल्याचे अकबराला हसु आले. तो म्हणाला “ठीक आहे बिरबल, मला तुझा मुद्दा पटला. आता हे दळण सोड आणि दरबारात चल आणि तुझे खरे काम कर. मी काही दळण दळायला तुला वजीर म्हणुन नेमलेले नाही.”

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा