You are currently viewing तुलना

तुलना

एकदा अकबर आणि बिरबल शिकारीसाठी जंगलात गेले. 

दोघे दाट अरण्यात गेले होते आणि धनुष्य बाण घेऊन तलावाजवळ मोठ्या झाडावर चढले. 

एखाद्या पाणी प्यायला येणाऱ्या जनावराची वाट बघत ते तिथेच दबा धरून बसले. 

तिथे एक भिल्ल स्त्री आली. ती गर्भवती दिसत होती. ती आपल्या झोळीत फळे, सुक्या काड्या अशा तिला लागणाऱ्या गोष्टी भरून घेत होती. 

अचानक तिला वेदना व्हायला लागल्या. तिला बाळाचा जन्म व्हायची वेळ झाली आहे हे लक्षात आले. 

ती एका झाडाच्या आडोशाला गेली. तिला मदतीला कोणी नव्हते. तिने एकटीने स्वतःच बाळाला जन्म दिला. 

तलावातले पाणी घेऊन बाळाला स्वच्छ केले. झोळीतले सामान रिकामे केले, झोळी थोडी झटकून त्याच कपड्यात बाळाला गुंडाळले. 

बाळाला एका कडेवर घेतले, हातात येईल तितके सामान घेतले आणि आपल्या घरी निघाली. 

अकबर बिरबल दोघेही हे पाहुन थक्क झाले. 

अकबर बिरबलाला म्हणाला. “कमाल आहे या बाईची. गर्भवती असताना इतके काम करत होती. आणि इतक्या कठीण वेळी कोणीही सोबत नसताना, वैद्य नसताना तिने स्वतःच सर्व काही निभावले. 

नाही तर आमची बेगम. हजार नखरे असतात तिचे. आणि साधं सर्दी पडसं झालं तरी सगळं सोडून आराम करत बसते.” 

दोघे शिकार करून परत आल्यावरही अकबराच्या डोक्यातुन हा विषय गेला नव्हता. ते दोघे परत आल्यावर त्याने आपल्या बेगमशी थोडे तुसडेपणाने वागायला सुरु केले. गोडीगुलाबीने वागणे, तिच्या इच्छा पुरवणे बंद केले. 

बेगम दुःखी झाली. तिने बिरबलाला भेटून आपले दुःख सांगितले. ह्याचे कारण बिरबलाच्या लक्षात आले. त्याने बेगमला निश्चित राहायला सांगितले आणि तो अकबराला समजावण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. 

बिरबलाने अकबराच्या माळ्याला बोलावुन घेतले. त्याला सांगितले कि काही दिवस बागेतल्या फुलझाडांची काळजी घेऊ नकोस. 

बागेत फेरफटका मारणे हा अकबराचा आवडता छंद होता. छान बहरलेली फुलझाडे बघुन तो खुश व्हायचा. त्या बागेची काळजी नाही घ्यायला सांगितल्याने माळी घाबरला, पण बिरबलाने त्याला अभय दिले. त्याला कोणी जाब विचारल्यावर बिरबलाच्या आदेशाने असे केल्याचे सांग म्हणुन सांगितले. 

काही दिवसातच बागेतली फुलझाडे थोडी कोमेजली. त्यांना चांगली फुले येत नव्हती. अकबर बागेत फिरायला गेल्यावर बागेची हि दशा पाहुन संतापला आणि माळ्याला बोलावून फैलावर घेतले. 

माळ्याने घाबरत घाबरत असे बिरबलाने करायला सांगितल्याचे अकबराला सांगितले. 

अकबराने त्याला जायला सांगितले आणि फुलझाडे नीट राहिली पाहिजेत असा दम दिला. 

तो गेल्यावर अकबराने बिरबलाला बोलावुन त्याला जाब विचारला. 

बिरबल म्हणाला “हुजूर, हि फुलझाडे फारच नाजुक असतात. त्यांचे किती नखरे असतात. एका माळ्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायला ठेवावे लागते. जंगलातली झाडे पहा. कोणी त्यांच्याकडे बघत नाही तरी किती छान वाढतात, सावली देतात, फळे देतात. ह्या झाडांनी त्यांच्यासारखे व्हावे म्हणुन मी माळ्याला सांगितले कि ह्यांचे लाड पुरवू नकोस.” 

“बिरबल अरे ती जंगलात वाढणारी मजबूत झाडे कुठे, हि नाजूक फुलझाडे कुठे? ह्यांची काळजी घ्यावीच लागते. नाही तर त्यांची वाढ कशी होणार? दोन्ही झाडांचे प्रकारच वेगळे आहेत, त्यांना एकसारखे कसे वाढवता येईल?”

“अगदी बरोबर बोललात खाविंद. जंगलात स्वतःच वाढणाऱ्या मजबूत झाडे आणि महालात वाढणारी सुंदर आणि नाजूक झाडे यांची तुलना करण्यात काही अर्थ नाही.” 

अकबराला बिरबलाच्या इशाऱ्याचा अर्थ समजला. त्याने बिरबलाला सांगितले कि “मी तुला काय म्हणायचे ते समजलो. महालात लाडाकोडात वाढणाऱ्या, सर्व सुविधांची सवय असणाऱ्या बेगमेची, जंगलात लहानपणापासून अवघड परिस्थितीत राहण्याची सवय असणाऱ्या भिल्ल स्त्रीची तुलना होऊ शकत नाही. माझ्या हे लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.”

अकबर आपल्या बेगमेशी पुन्हा नेहमीसारखे वागायला लागला. बेगम परत प्रसन्न झाली आणि तिनेही बिरबलचे आभार मानले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा