You are currently viewing खारीचा वाटा

खारीचा वाटा

सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंत आणि सर्व वानर सेना निघाली होती. 

ते भारताच्या दक्षिण टोकाला पोहोचले. आता लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते. हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती. आणि त्यांच्याकडे जहाजेही नव्हती. त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतु (पुल/ ब्रिज) बांधायचे ठरवले. 

सर्व वानर मोठे मोठे दगड आणुन त्यावर श्रीराम असे प्रभुचे नाव लिहुन समुद्रात टाकत होते. प्रभुनामाच्या महिमेमुळे ते दगड समुद्रात तरंगत होते. हळु हळु सेतु आकार घेत होता. 

अशात एक छोटीशी खार तिच्या इवलुशा हातात बसेल असे छोटे दगड, माती नेऊन पुलावर टाकत होती. तिलासुद्धा देवाला मदत करायची होती. 

इतर वानरांना जेव्हा तिची हि धडपड दिसली तेव्हा ते हसायला लागले. ते तिला म्हणाले “अगं खारुताई, लंकेत जायला मोठा सेतु बांधायचा आहे. आम्ही बघ किती मोठे दगड उचलुन आणतोय. तुझ्या छोट्या दगड मातीने पुलात काय भर पडणार आहे? तु उगाच धडपड करू नकोस.”

खार हिरमुसली. 

प्रभु श्रीरामांनी हा संवाद ऐकला. त्यांनी खारीला उचलुन हातावर घेतले. आणि इतर वानरांना म्हणाले. 

“चांगल्या कामात फक्त मोठं काम करणं महत्वाचं नसतं. चांगल्या भावनेने आपल्याला जे योगदान शक्य असेल ते करणं महत्वाचं असतं. आपल्याकडे जास्त क्षमता असेल म्हणुन दुसऱ्यांना सत्कार्य करण्यापासुन रोखु नये. लहान, मोठे, कमजोर आणि शक्तिवान अशा सगळ्यांनी आपल्या परीने योगदान दिलं तरच मोठं कार्य होत असतं.

अशा वेळेस आपलं कार्य आणि दुसऱ्याचं कार्य याची तुलना करू नये. तसं करून आपल्या कार्याची किंमत कमी होते.”

वानरांनी क्षमा मागितली आणि प्रभूंनी हसुन त्यांना क्षमा केली. त्यांनी खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या शरीरावर काळे पट्टे उमटले. असे म्हणतात कि आधी खारीचे शरीर एकाच रंगाचे होते, प्रभु श्रीरामांनी प्रेमाने हात फिरवला तेव्हापासून खारीच्या अंगावर हे पट्टे दिसतात. देवाला मदत केल्याची ती खुण आहे.

प्रभूंच्या कार्यात खारीने आपल्या परीने हातभार लावत “खारीचा वाटा” उचलला आणि दाखवुन दिले कि आपण कितीही छोटे असलो, आपल्यात शक्ती कमी असली तरीही आपण सद्भावनेने चांगल्या कामात योगदान देऊ शकतो, आणि देवालाही त्याची किंमत असते. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has 2 Comments

  1. Sarika

    Khup God aahe Goshta. Ani ticha aartha hi khup chaan samjavla aahet tumhi.Thanks

  2. Gayatri lohite

    नमस्कार
    तुमच्या वेबसाईट वरील लहान मुलांच्या गोष्टी आवडल्या. त्या जर तुमची परवानगी असेल तर ऑडिओ रूपात केल्या तर चालेल का?
    मी एक छोटा व्हाट्स app चा ग्रुप केला आहे छान छान गोष्टी त्यासाठी त्याचा वापर होईल.

    धन्यवाद 🙏🏻
    गायत्री लोहिते

प्रतिक्रिया व्यक्त करा