You are currently viewing विद्या विनयेन शोभते

विद्या विनयेन शोभते

स्वामी समर्थांचे अक्कलकोटला वास्तव्य असताना त्यांची ख्याती दूरदूरपर्यंत पसरली होती. त्यांच्या दर्शनासाठी अनेक लोक असत. 

एकदा अक्कलकोटला तीन विद्वान पंडित आले. मात्र ते स्वामींच्या दर्शनासाठी नाही तर स्वामींसमोर आपले ज्ञान प्रदर्शित करण्यास आले होते. हा कोण स्वामी, काय त्याची विद्वत्ता कि त्यांना इतका मान मिळतो? असा विचार करून त्यांना मत्सर वाटत होता, आणि ह्या स्वामीसमोर वादविवादात आपले ज्ञान लोकांना दाखवले कि ते ह्या स्वामींना विसरून आपल्या मागे येतील असा त्यांचा समज होता. 

अक्कलकोटला पोहोचल्यावर ते स्वामींच्या ठिकाणाची चौकशी करत स्वामींबद्दल अपशब्द काढु लागले, शंका मांडु लागले. कोण हे स्वामी? कुठून आले? कधी संन्यास घेतला? कोणाकडे शिकले? किती शास्त्रांचा अभ्यास केला? असे प्रश्न विचारू लागले. 

लोकांनी आश्चर्यचकित होत आणि काहीशा रागानेच त्यांना स्वामींकडे नेले. त्यांनी स्वामींना नमस्कार करण्याचीही विनम्रता दाखवली नाही. स्वामींची नजर फार भेदक होती. स्वामींनी त्या पंडितांकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि ते गर्भगळीत झाले. त्यांना शब्दच फुटेनात. वादविवादाच्या महत्वकांक्षेने आलेल्या त्यांना वादाच्या एखाद्या विषयालाही तोंड फोडता आले नाही. 

त्यांना हे कळुन चुकले कि आपण ज्यांच्यासमोर आपले ज्ञान पाजळायला आलो ते प्रत्यक्ष ईश्वर आहेत, आणि आपल्या घमेंडीचीच त्यांनी हि शिक्षा दिली आहे. त्यांना आपली चुक कळली, त्यांचा गर्व नाहीसा झाला आणि डोळ्यातुन पश्चातापाचे अश्रु वाहायला लागले. त्यांनी स्वामींसमोर लोटांगण घातले. 

स्वामींनी मोठ्या मनाने त्यांना क्षमा करून आशीर्वाद दिले. आजवर केवळ पुस्तकी ज्ञान मिळवुन घमंड करणाऱ्यांना स्वामींनी विनम्रतेचा धडा शिकवला. पुढे ते स्वामींचे भक्तच बनले.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा