आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन राण्या होत्या. एक आवडती पाटमाधवराणी व नावडती चिमादेवराणी.
त्या राजाला नंदनबनेश्वर नावाचा शत्रू होता. रात्रंदिवस तो राजाच्या पाठीस लागला. त्यामुळे राजा फार वाळत चालला.
एके दिवशी मात्र राजाने सर्व लोकांना बोलावून त्या शत्रूस मारण्यास सांगितले. ते लोकांनी मान्य केले. ते त्याचा शोध घेऊ लागले.
त्याच नगरात एक म्हातारीचा मुलगा होता. त्याने तिच्याकडून भाकरी घेतली व शत्रूस मारण्यास निघाला.
म्हातारी त्याला म्हणाली, “आपण गरीब. ही वाळलेली भाकरी आहे. चार पावलं पुढं जा आणि झाडाआड खा; म्हणजे कोणी हसणार नाही.”
त्याप्रमाणे तो सगळ्यांच्या पुढं गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. लोक परत आले. शत्रू काही सापडला नाही. राजाला काळजी लागली. खूप रात्र झाली; म्हणून म्हातारीचा मुलगा तिथ राहिला.
मध्यरात्री नागकन्या-देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या. त्या मुलाने विचारले, तेव्हा त्यांनी सांगितलं की, “पडल-झडल सापडतं, मनी चितिलं कार्य होतं.”
हे ऐकताच तोही त्यांच्याबरोबर वसा वसू लागला. पूजा केली. घागरी फुंकल्या. पहाटेस उत्तरपूजा केली.
जशी महालक्ष्मीमाता कोल्हापुरास निघाली, तसा नागकन्या-देवकन्या यांनी आशीर्वाद मागितला. ह्या मुलानेही मागितला.
देवीनं दिला, “राजाचा शत्रू मरेल. तुला अर्धं राज्य मिळेल. नवलवाट नाव ठेवील. तो वैरी उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल!” व देवी अदृश्य झाली. म्हातारीचा मुलगा घरी आला.
दुसऱ्या दिवशी राजाच्या अंगणात वैरी मेलेला दिसला. त्यानं चौकशी केली, म्हातारीचा मुलगा सर्वांत मागे होता. त्यानं मारलं असावं, असं लोकांनी सांगितले. राजाने त्याला बोलावून घेतलं. त्यासंबंधी त्याला विचारले. मुलाने रात्री घडलेली सर्व हकीगत सांगितली. ‘देवीच्या वराने तो मेला,’ असे सांगून देवीनं दिलेला आशीर्वादही सांगितला.
शत्रू मेला म्हणून राजाला आनंद झाला. त्याने मुलाला अर्धं राज्य दिलं. नवलवाट नाव ठेवलं. पुढं म्हातारी व मुलगा आनंदाने राहू लागली.
ही बातमी आवडत्या राणीला समजली. तिने नवलवाटाला बोलावून घेतलं. वसा कसा करावा, म्हणून तिनं विचारलं. नवलवाटानं तातू दाखविला.
“अश्विन मासात पहिल्या अष्टमीला सोळा सुतांचा तातू तेल-हळद लावून करावा. सोळा दूर्वा, सोळा तांदूळ घ्यावेत. तुळशीची पंचामृताने पूजा करावी. सोळा अर्घ्य द्यावीत. धूप-दीप दाखवावं. नैवेद्य दाखवून कहाणी करावी. हा वसा घेणाऱ्यांनी तातूची पूजा करावी. तातू हातात बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणं अश्विन मासी करावं.” वसा घेऊन राणी व्रत करू लागली.
एक दिवशी राजा राणीच्या महाली आला. सारीपाट खेळताना राजानं राणीचा तातू पाहिला.
राणीनं तातूची हकीगत सांगितली. “आपल्याकडे एवढे हार, कंकण आहेत. हे व्रताचं सूत तोडून टाक, ” राजा म्हणाला. रात्री राजा-राणी निजली.
सकाळी दासीला तो तातू सापडला. तिनं नवलवाटाला दिला. त्याला राणीचा राग आला. इतक्यात नावडती राणी भेटली. तिने तातू मागून घेतला आणि वसाही समजावून घेतला.
अश्विनमासी पहिली अष्टमी आली. देवी महालक्ष्मीनं म्हातारीचं सोगं घेतलं. ती पाटमाधवराणीच्या महाली गेली. तिथं महालक्ष्मीची आठवण नव्हती. घरात काहीच तयारी दिसेना. तिनं राणीला तसं सांगून आठवण करून दिली. तिला पाणी मागितलं. दहीभाताची शिदोरी मागितली.
“तुला दिलं, तर राज्याला पुरणार नाही.” राणीनं सांगितलं.
म्हातारीला राग आला. तिनं राणीला शाप दिला. “सवतीच्या न्हाणी डाराडुरी करशील. अर्धं अंग बेडकाचं, अर्धं अंग मनुष्याचं होईल.” राणी ऐकून उपहासाने हसली.
म्हातारी चिमादेवराणीच्या महाली आली. तिला सगळी गडबड दिसली. पूजासाहित्य, महालक्ष्मीचा मुखवटा दिसला. “चिमादेवराणी, आज तुझ्या घरी काय आहे,” म्हातारीनं विचारलं.
“आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे.
म्हातारी म्हणाली, “महालक्ष्मी म्हणतात, ती मीच.
“कसं ओळखायचं ?” राणी म्हणाली. ते
व्हा ती सकाळी कुवारीण, दुपारी सवाशीण व संध्याकाळी पोक्त बाई झाली. राणीला तीन रूपं दिसली. राणीनं तिला घरी घेतलं. न्हाऊ-माखू घातलं, पीतांबर दिला आणि चौरंगावर बसवल.
राणीनं व नवलवाटानं तिची यथासांग पूजा केली. संध्याकाळी देवीसमोर घागरी फुंकू लागली. तो आवाज व धूपाचा वास राजाच्या महाली आला. राजानं शिपायांना चौकशी करण्यास सांगितलं. शिपाई नावडतीच्या घरी गेले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. परत येऊन राजाला त्यांनी सर्व हकीगत सांगितली.
राजा राणीकडं आला. राणीनं पंचारतीनं ओवाळीत त्याला मंदिरात घेऊन गेली. सारीपाट खेळता-खेळता पहाट झाली. महालक्ष्मीमाता कोल्हापुरी जायला निघली. राणीनं आशीर्वाद मागितला. “राजा तुला सकाळी घेऊन जाईल. तुझी सवत मात्र शाप भोगेल.”
चिमादेवीनं उ:शाप मागितला. तसं देवीनं सांगितलं, “तिला बारा वर्ष वनवास घडेल. म्हणून देवी अदृश्य ” झाली.
सकाळी राजानं रथातून तिला वाड्यासमोर आणलं. पाटमाधवराणीला ‘तू सामोरी ये’ असा निरोप पाठवला.
फाटके-तुटके कपडे, केस मोकळे, कपाळी मळवट, डोक्यावर जळतं खापर अशा रूपात ती पुढे आली. तेव्हा राजानं शिपायांना ‘तिला रानात मारून टाका,’ असा हुकूम केला.
शिपायांनी पाटमाधवराणीला रानात नेलं. शिपायांनी तिच्या हातचं खाल्लं होतं. त्यांनी तिला मारलं नाही व ‘पुनः या राज्यात कधी येऊ नकोस,’ असं सांगून राणीला तिथं सोडून दिलं.
राणी नगरात गेली. लोकांनी तिला हाकलून दिले. ती रानात गेली. वाटेत ऋषीची गुंफा दिसली. तिथे ऋषी ध्यानस्थ बसले होते. तिथंच राहून बारा वर्षे तिनं ऋषींची सेवा केली.
ऋषी प्रसन्न झाले. “सेवा का करतेस?” ऋषीने विचारलं. तिनं अभय मागून सर्व हकीगत सांगितली.
ऋषींनी तिच्यावर महालक्ष्मीचा कोप झाल्याचे जाणले. “महालक्ष्मीचे व्रत कर,” ऋषी म्हणाले.
राणीनं महालक्ष्मीला आशीर्वाद मागितला. देवीनं उ:शाप दिला, “ह्या झाडाखाली सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची उटी, फराळ, कापुरी विडा, वाळ्याचा पंखा ठेव. तुझ्या हाताचा वास येऊ लागेल. राजा इथं आज उद्या येईल.”
दुसऱ्या दिवशी राजा आला. विश्रांती घेऊन फराळ केला. पाणी प्याला. आत्मा थंड झाला. या सगळ्याला पाटमाधवराणीच्या हाताचा वास कसा? राजानं विचारलं.
शिपायांनी अभय मागून राणीला सोडून दिल्याचं सांगितलं. राजाच्या आज्ञेवरून राणीचा शोध घेतला. राजा ऋषींच्या गुहेत आला. त्याचं दर्शन घेतलं. सगळी हकीगत सांगितली. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितलं. ऋषीनं तिला राजाच्या हवाली केलं. उभयतांनी ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी आशीर्वाद दिला.
राजा-राणी रथातून नगरात आले. ‘तू सामोरी ये,’ असा आवडतीला निरोप पाठविला. आवडती आनंदाने वाजत-गाजत राणीच्या स्वागताला आली.
“तू जर अशीच सामोरी आली असतीस, तर तुला हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या.” राजा म्हणाला.
त्यानं चिमादेवीला उचलून रथात घेतलं. वाजत-गाजत नगरात आला व सुखा-समाधानानं राज्य करू लागला.
देवाची भक्ती सदासर्वकाळी मोठ्या श्रद्धेने, शुद्ध अंत:करणाने करावी; म्हणजे देवीची सदैव कृपा राहते.
जशी पाटमाधवराणीवर महालक्ष्मीमाता कोपली, तशी तुम्हां-आम्हांवर न कोपो. तिची सदैव कृपादृष्टी लाभो.
ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.