You are currently viewing लक्ष्मी पूजन

लक्ष्मी पूजन

दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करण्यामागे वेगवेगळी करणे सांगितली जातात. 


विजयादशमीला रावणाचा वध करून श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह अयोध्येत पोहोचले. श्रीरामाचा मोठ्या थाटात राज्याभिषेक झाला. तेव्हा अयोध्यावासियांनी आनंदात सर्व नगर आणि शहर दिवे, फुले आणि रांगोळ्यांनी सजवुन उत्सव साजरा केला. 

तेव्हापासून वाईट वृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय म्हणुन दिवाळी साजरी करण्याची पद्धत पडली. रामाने अयोध्येत गेल्यावर, राज्याभिषेक झाल्यावर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. अयोध्येच्या राज्यामध्ये, राज्यकारभारामध्ये गणपतीच्या कृपेने सुबुद्धी यावी आणि लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी यावी यासाठी. 

रामाचेच अनुकरण करत सामान्य जणांनी हीच पद्धत पुढे चालु ठेवली. 


दिवाळी पासुन व्यापारी वर्ग आपले नवे वर्ष सुरु करतात. नव्या चोपड्यांची (हिशोब आणि कारभाराच्या वह्या) पूजा करून त्यात नव्या वर्षाचे व्यवहार सुरु करतात. तेही गणपतीने ज्ञान आणि सुबुद्धी द्यावी आणि लक्ष्मीने नवीन वर्षात आणखी समृद्धी द्यावी यासाठी अशी पूजा करतात. 

हीच पद्धत बाकी वर्गात सुद्धा रूढ झाली. 


गणपती हा प्रथमेश म्हणजे पुजण्याचा पहिला मान असलेला देव मानला जातो. त्यामुळे कुठल्याही लहान मोठ्या पूजेची सुरुवात गणपतीच्या पुजेनेच होते. त्याशिवाय लक्ष्मीपूजनात गणेश असण्याची एक खास कथा हि आहे: 

माणसाला जगात बरीचशी सुखे उपभोगायला पैसा हा लागतोच. त्यामुळे माणुस आयुष्यभर पैशामागे पळत असतो, तो मिळावा आणि आणखी मिळावा अशी नेहमीच त्याची इच्छा असते. 

लक्ष्मी हि धन, समृद्धी, संपत्ती याची देवी आहे. सर्व जण सुख समृद्धी आणि भरभराटीसाठी लक्ष्मीची आराधना करत असतात. लक्ष्मी ही सदैव उत्तमोत्तम दागदागिने यांनी नटलेली असते. ती आणि तिचे पती विष्णु नेहमी ऐश्वर्य संपन्न असत. 

याउलट शंकर पार्वतीची जोडी मात्र पर्वतावर राहणारी, अतिशय साधा पेहराव असलेली. शंकराच्या गळ्यात तर दागिन्यांच्या जागी रुद्राक्षाच्या माळा आणि नाग असे. 

यामुळेच एकदा देवी लक्ष्मीला थोडा गर्व झाला. ती भगवान विष्णूशी गप्पा मारताना थोडी आत्मस्तुती करायला लागली. माझीच कृपा भक्तांसाठी किती महत्वाची आहे, मी किती पूजनीय आहे असे म्हणायला लागली. विष्णुने त्यामागचा अहंकार ओळखला. 

तिचे गर्वहरण करायला म्हणुन ते म्हणाले “बरोबर आहे लक्ष्मी, माणसाला सुखी व्हायला तुझी कृपा लागतेच. तुझ्या कृपेशिवाय आनंदी राहता येणं अवघड आहे. पण तु पार्वतीसारखं अजुन मातृत्वाचा आनंद मात्र घेतलाच नाहीस. एखाद्या स्त्रीसाठी त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कशाशी करता येणार नाही.” 

लक्ष्मीला स्वतःस अपत्य नव्हते. पार्वतीला कार्तिकेय आणि गणपती हे दोन पुत्र होते. लक्ष्मी आणि पार्वती चांगल्या मैत्रिणी होत्या. म्हणुन ती पार्वतीकडे गेली. पार्वतीला तिच्या दोन पुत्रांपैकी एक पुत्र मला दत्तक दे अशी विनंती केली. 

पार्वतीने विचारले “मी माझ्या धाकट्या गणेशाला तुला दत्तक दिलेही असते. पण तू काही एका ठिकाणी राहत नाहीस. मग तू माझ्या मुलाची काळजी कशी घेशील?”

लक्ष्मी एका ठिकाणी राहत नाही याचा अर्थ:  घरी पैसे समृद्धी असणे म्हणजे लक्ष्मीचा वास असल्याचे मानतात. लक्ष्मी हि चंचल स्वभावाची असते असे म्हणतात. म्हणुन तिला घरी प्रसन्न ठेवायला स्वच्छ आणि पवित्र वातावरण ठेवावे लागते. तिची पूजा करावी लागते. ती नाराज झाली तर दुसऱ्या ठिकाणी निघुन जाते. ती विष्णुवर एकदा नाराज होऊन गेली तेव्हा तेही अगदी गरीब झाले होते अशी कथा आहे.

थोडक्यात, लक्ष्मीला घरी आणणे आणि प्रसन्न राखणे यासाठी आपण मेहनत करत राहावी असा यामागचा संदेश आहे. 

लग्न होऊन घरी आलेल्या स्त्रीलाही लक्ष्मीच्याच रूपात मानुन आदर दिला पाहिजे असे सांगतात तेही याच अर्थाने. जिथे स्त्रीला आदर असतो, तिला मान मिळतो, ती प्रसन्न असते, असे घर समृद्ध होत जाते. ती खुश नसेल तर घरात आनंद येऊ शकत नाही.

लक्ष्मीने तिला आश्वस्त केले. “मी गणेशाची पूर्ण काळजी घेईन. तू निश्चिन्त रहा. माझे सगळे ऐश्वर्य, संपत्ती हे गणेशाचेच आहे असे समज. 

माझ्या भक्तांना माझी आणि गणेशाची सोबतच आराधना करावी लागेल. ज्या घरी गणेशाला पुजणार नाहीत अशा ठिकाणी मीही राहणार नाही. मला आणि गणेशाला सोबत पुजेल अशाच भक्तांना मी प्रसन्न होईन.” 

पार्वतीचे समाधान झाले. तिने गणेशाला पार्वतीला दत्तक दिले. लक्ष्मीला फार आनंद झाला. तिला पुत्र मिळाला, गणेशाला आणखी एक आई मिळाली. 

तेव्हापासुन लक्ष्मी आणि गणेशाची सोबतच पूजा होते. 


काही जण लक्ष्मी आणि गणपतीच्या वेगळ्या मूर्तीची पूजा करतात, तर काही जण लक्ष्मी सरस्वती आणि गणेश यांच्या एकत्रित प्रतिमेची पूजा करतात. 

यामागचा प्रतीकात्मक अर्थ असा: 

लक्ष्मी संपत्तीची देवता, गणपती बुद्धीची देवता, सरस्वती ज्ञानाची देवता. 

बुद्धीचा वापर करून ज्ञान मिळवता येते. ज्ञानाचा वापर करून संपत्ती मिळवता येते. संपत्तीचा योग्य वापर करायला बुद्धी आणि ज्ञान दोन्ही लागते. नाहीतर आहे ती संपत्ती नष्ट होते. 

बुद्धी, ज्ञान, संपत्ती या तिन्हीमधे भर पडावी यासाठी मेहनत घ्यावी लागते. आपण आहे तेवढ्यातच संतुष्ट राहिलो तर एक दिवस बुद्धीचा प्रभाव कमी होतो, ज्ञान कालबाह्य होते, संपत्ती संपुन जाते. 

त्यामुळे या सर्वात देवांची कृपा असावी म्हणुन हि पूजा. हे एका दिवसापुरते प्रतीक आहे, त्यासाठी मेहनत नेहमी करायची आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. 

आपण फक्त परंपरा, कर्मकांड याच्यावर लक्ष केंद्रित करतो आणि त्यामागच्या गाभ्याकडे दुर्लक्ष करतो. 

ह्यासाठी एक उदाहरण देतो. अनेक कंपन्यांमध्ये वर्धापन दिन साजरा करतात. २५वा, ५०वा अशा विशेष प्रसंगी तर भला मोठा समारंभ असतो. मग अशा कार्यक्रमात आकर्षक सजावट असते, मुख्य व्यवस्थापकांचा, उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार होतो, सर्वांना मेजवानी असते, आनंदी वातावरण असते. 

ह्या कंपन्यांमध्ये वर्षभर अविरत काम चालु असते, त्यांच्या व्यवसायामध्ये प्रगती होते, तेव्हा कुठे वर्षानुवर्षे हा दिवस साजरा होतो. जर कंपनीचा कारभार नीट नसेल, प्रगती होत नसेल, तर अशा सोहळ्यांना काही अर्थ नसतो. 

सोहळे आहेत म्हणून कंपनी नसते उलट कंपनी चांगली चालु असते म्हणुन सोहळे असतात. 

तसेच फक्त अमुक पूजा केल्यामुळे लक्ष्मी किंवा कुठलेही प्रसन्न होते असे न समजता वर्षभर आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी मेहनत करावी, आणि या कामात देवांची कृपा असल्याबद्दल आभार मानायला आणि अशीच कृपा ठेवण्याची प्रार्थना करण्यासाठी कुटुंबाने एकत्र येऊन असे सण साजरे करावेत. 

प्रतिक्रिया व्यक्त करा