You are currently viewing बोडणाची कहाणी

बोडणाची कहाणी

आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला दोन सुना होत्या. एक आवडती होती; दुसरी नावडती. 

आवडतीला चांगलं खायला-प्यायला देत, चांगलं नेसायला देत; तर नावडतीला गोठ्यात ठेवून फाटके-तुटकं नेसायला देत. उष्टं-माष्टं खायला देत. आवडतीचे लाड होत; तर नावडतीचे हाल होत.

एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला. ब्राह्मणाच्या बायकोनं बोडणाची तयारी केली. सवाष्णींना बोलावलं. देवीची पूजा केली. सगळ्या जणींनी मिळून बोडण भरलं. कहाणी वाचली. नैवेद्य दाखवला. सर्व माणसे जेवली. नावडतीला उष्टं-माष्टं वाढून दिलं. तेव्हा तिला समजलं की, घरात बोडण भरलं. तिला आपणास मात्र बोडण भरण्यास बोलावलं नाही, म्हणून वाईट वाटलं. 

सर्व दिवस तिनं उपवास केला. रात्री देवीची मनोभावे प्रार्थना केली व झोपी गेली. रात्री तिच्या स्वप्नात एक सवाशीण आली. तिला पाहून नावडती रडू लागली. तेव्हा तिनं तिला रडण्याचं कारण विचारलं. नावडतीनं बोडणाची सर्व हकीगत सांगितली. 

तेव्हा सवाष्णीनं तिला सांगितलं, “उद्या तू गोठ्यात दही-दूध विरजून ठेव. एक खडा मांड. देवी म्हणून त्याची पूजा कर. तू एकटीच बोडण भर. संध्याकाळी गायी-गुरांना खाऊ घाल.” इतकं सांगून ती अदृश्य झाली. नावडती जागी झाली. तिनं जाणलं की, देवीनंच आपणास दर्शन दिलं.

सकाळी उठली. सवाष्णीनं सांगितलं, तसं सर्व केलं. देवीची प्रार्थना केली. नंतर लाकडाची काथरवट घेतली. विरजून ठेवलेलं दही-दूध त्यात घातलं. एकटीनंच बोडण भरलं. नैवेद्य दाखविला. घरातून आलेलं उष्टं-माष्टं जेवण जेवली. भरलेलं बोडण झाकून ठेवलं. दुपारी गुरांना घेऊन रानात गेली. 

इकडे सासरा गोठ्यात आला. झाकलेलं काय आहे, म्हणून पाहू लागला. लाकडाची काथरवट सोन्याची झाली. आत हिरे-माणकं दृष्टीस पडली. बाहेर उडालेल्या ठिपक्यांची मोत्ये झाली. ती त्यानं आत भरली. नावडतीनं हे कुठून आणलं, म्हणून त्याला आश्चर्य वाटलं. इतक्यात नावडती आली. त्याने त्याबद्दल तिला विचारलं. 

नावडतीनं स्वप्न सांगितलं. त्याप्रमाणं “मी बोडण भरलं, ते हे झाकून ठेवलं, त्यांचे हे असं झालं. काय असेल ते पाहून घ्या,” म्हणाली. सासरा ओशाळला. नावडतीला घरात घेतली. पुढं तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करू लागला.

जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली, तशी तुम्हां-आम्हां होवो. 

ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा