You are currently viewing जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती

जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती

अकबराचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने शाही मेजवानी होती. अकबराला सर्व दरबारी, सरदार इ. भेटून शुभेच्छा देत होते. सोबत बिरबलही बसला होता. 

अकबराचे साम्राज्य मोठे असल्याने त्याचा दबदबा फार मोठा होता. दूरदूरच्या राजांकडून यानिमित्ताने शुभेच्छा संदेश येत होते. त्यासोबतच त्या राजांचे दूत अकबरासमोर विविध नजराणे सादर करत होते. त्यात भरजरी कपडे, सुवर्णमुद्रा, सुंदर रत्ने आणि अलंकार इत्यादींचा समावेश होता. 

अकबरासमोर हे सादर झाले कि तो त्यावर हात ठेवुन त्याचा स्वीकार करत होता आणि मग त्याचे सेवक हे सगळे शाही भांडारात जमा करत होते. 

एका राजाने भेट म्हणुन फार उंची अत्तरे पाठवली होती. ती अत्तरे सुंदर सुंदर रंगबिरंगी काचेच्या कुप्यांमध्ये भरलेली होती. ती पाहून अकबराला ते लावुन पाहण्याची इच्छा झाली. 

त्याने एक कुपी बिरबलाला लावून पाहायला दिली आणि एक स्वतःसाठी घेतली. 

अकबराने कुपी उघडून हातावर अत्तर लावायचा प्रयत्न करताना त्याच्या कडून थोडं जास्तीचं अत्तर त्याच्या अंगरख्यावर सांडलं. अकबराने पटकन ते टिपून घ्यायचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. 

अकबराला तेवढ्यात बिरबल समोर असल्याचे लक्षात आले आणि तो अवघडला. 

बिरबलाने हे पाहिले. त्याला असे वाटून गेले कि एवढा मोठा बादशहा, त्याची संपत्ती केवढी, आज आलेले नजराणे किती आणि अत्तराचे काही थेंब गेले तरी किती कासावीस होतोय. तो काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित आलं. 

अकबराच्या हे लक्षात आलं. त्याला ते फार लाजिरवाणं वाटलं. 

त्याने थोडंसं अत्तर आपल्यासाठी काहीच नाही हे दाखवण्यासाठी दुसऱ्या दिवशी एका हौदात अत्तर भरायला सांगितलं. आणि प्रजेला त्यातून हवं तेवढं अत्तर घेऊ शकता अशी दवंडी पिटवली. 

सर्व लोक येऊन अत्तर घेऊन जाऊ लागले, आणि अकबराची स्तुती करायला लागले. अकबर मनोमन खुश झाला. 

बिरबल आला आणि हा प्रकार कालच्या एवढ्याशा गोष्टीवरून अकबराने एवढं टोक गाठलेलं पाहुन त्याला गंमत वाटली. त्याने अकबराजवळ जाऊन त्याच्या कानात म्हटले “हुजूर, जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती.” 

म्हणजे थेंबभर अत्तरासाठी धडपड केल्यामुळे जी अकबराची शान गेली ती नंतर हौदभर वाटल्याने परत येऊ शकत नाही. 

अकबर काय समजायचं ते समजला. बिरबलाने याची कुठे वाच्यता केली नाही, आणि अकबराने तो विषय पुढे सोडुन दिला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा