You are currently viewing वसुबारसेची कहाणी

वसुबारसेची कहाणी

एका आटपाट नगरात एक कुणब्याची वृद्ध स्त्री राहत होती. 

तिला एक सून होती. गायी-गुरं होती, ढोरं-म्हशी होत्या, गव्हाळी-मुगाळी वासरं होती. 

अश्विन महिना आला. द्वादशीच्या दिवशी ती वृद्ध स्त्री सकाळी उठली. शेतावर जायला निघाली. 

तेव्हा सुनेला हाक मारली व म्हणाली, “मी शेतावर जाते. दुपारी येईन. तू माडीवर जा. गव्हाचे, मुगाचे दाणे काढ, गव्हाळे-मुगाळे शिजवून ठेव.” असं सांगून शेतावर गेली. 

सून माडीवर गेली. गहू, मूग काढून ठेवले. गोठ्यात गव्हाळी-मुगाळी वासरं उड्या मारत होती. त्यांना ठार मारलं, चिरलं व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली.

दुपारी सासू आली. सुनेनं पानं वाढलं. 

तांबडं मांस दृष्टीस पडताच सासून “हे काय केलंस?” असं विचारलं. 

सुनेने सर्व हकीगत सांगितली. सासू घाबरून गेली. ही चूक घडली; पण जाणून-बुजून नव्हे, हे सासूनं जाणलं. ती तशीच उठली. देवाजवळ आली. 

देवाची मनोभावे प्रार्थना केली, “देवा, हा सुनेच्या हातून चुकून अपराध घडला. तिला ह्याची क्षमा कर, गायीची वासरं जिवंत कर; नाहीतर मी संध्याकाळी आपला प्राण देईन.” 

श्रद्धायुक्त अंतःकरणाने तिने देवाची करुणा भाकली. ती निश्चयपूर्वक तिथंच बसून राहिली. तिचा तो दृढनिश्चय देवानं पाहिलं. शुद्ध हृदय जाणलं.

पुढं संध्याकाळी गायी आल्या, तर गोठ्यात वासरं नाहीत, हे पाहून त्या हंबरडा फोडू लागल्या. 

देवाला चिंता पडली. देवाने गायींचा वात्सल्यभाव जाणला आणि गायींची वासरं जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायींचे हंबरडे बंद झाले. 

सासूला आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटलं. नंतर त्यांनी गायी-वासरांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला. देवाचे आभार मानले. नंतर आनंदाने जेवली अन् सुखी-समाधानी झाली. तसे तुम्ही-आम्ही होऊ.

ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी देवा-ब्राह्मणांचे द्वारी, पिंपळाच्या पारी, गायीच्या गोठी सुफल संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा