You are currently viewing भाऊबीज

भाऊबीज

भाऊबीज हा राखीपोर्णिमेसारखाच भावा बहिणींचा सण आहे. हा सण दिवाळीसोबत साजरा केला जातो. यालाच हिंदीत भाई-दुज असेही म्हणतात. 

यातला भाऊ / भाई हा शब्द सहज समजतो. बीज, किंवा दुज म्हणजे द्वितीय किंवा दुसरी तिथी. कार्तिक महिन्याच्या द्वितीयेला हा सण येतो म्हणुन त्याच्या नावात तिथीचा उल्लेख आहे. 

याच्या दोन कथा आहेत. 


श्रीकृष्ण जेव्हा नरकासुराशी लढायला गेले तेव्हा त्यांची धाकटी बहीण सुभद्रा त्यांच्या काळजीत होती. आपला भाऊ सुरक्षित रहावा, युद्धात त्याला अपाय होऊ नये म्हणुन ती सतत मनोमन प्रार्थना करत होती. 

(नरकासुर वध  आणि नरकचतुर्दशीची पुर्ण कथा येथे वाचु शकता.)

जेव्हा श्रीकृष्ण नरकासुराचा वध करून परत आले, तेव्हा सुभद्रेचा जीव भांड्यात पडला आणि अतिशय आनंदाने तिने भावाचे स्वागत केले. भावाला ओवाळले, गोडाधोडाचे जेवण केले. आनंद साजरा केला. 

ह्या दिवशी मग भाऊबीज साजरी केली जाऊ लागली. 


यम (यमदेव / यमराज / धर्मराज) आणि यमुना (यमी असे हि नाव आहे) या देवता जुळी भावंडे आहेत असे मानले जाते. 

यमुना आपल्या भावाला नेहमी आग्रहाने घरी जेवायला बोलवत असे, पण यम आपल्या कामात व्यग्र असे. 

एकदा यम वेळ काढुन आपल्या बहिणीकडे गेला. ती फार आनंदित झाली. 

तिने त्याचे ओवाळुन स्वागत केले. त्याच्या आवडीचे जेवण केले. 

दोघांनी आनंदाने तो दिवस घालवला. 

निघताना यमाने प्रसन्न होऊन तिला विचारले तुला काय वरदान हवे?

तेव्हा तिने मागितले कि “असेच तु नित्यनेमाने मला भेटायला येत रहा. तसेच हा दिवस सर्व भावा-बहिणींचा म्हणुन ओळखला जावा. सर्व भावांनी आपापल्या बहिणीला या दिवशी भेटायला जावे. तिच्याकडुन ओवाळुन घ्यावे. जे असे करतील त्यांना तुझे भय नसावे.”

यमाने तथास्तु म्हणुन तिला ते वरदान दिले. 

त्यामुळे या सणाला “यम द्वितीया” या नावाने सुद्धा ओळखले जाते. 


या दिवशी सहसा भाऊ बहिणीकडे जाऊन ओवाळून घेतात. बहिणीला ओवाळणी म्हणुन काही भेटवस्तु किंवा पैसे देतात. राखीपौर्णिमेला भावाने बहिणीची रक्षा करावी म्हणुन बहीण भावाला राखी बांधते, तर या दिवशी बहीण भावाच्या रक्षणासाठी कामना करते. 

यमराज हा मृत्युचा देव आहे आणि मृत्यु पश्चात स्वर्ग, नरक किंवा मोक्ष या गोष्टींचा अधिपती आहे. त्यामुळे यमाचे भय लोकांना दोन प्रकारे असते. एक म्हणजे मरणाची भीती. दुसरे म्हणजे मरणानंतर आपल्याला स्वर्ग मिळेल कि नरक, चुकून नरकात गेलो तर फार भयानक शिक्षा मिळेल का याची भीती. 

त्यामुळे इथे यमुनेने भाऊबीज साजरी करणाऱ्या भावाला “यमाचे भय नसावे” असे जे म्हटले आहे त्याचा लोक दोन प्रकारे अर्थ लावतात: 

  • जो भाऊ भाऊबीजेला बहिणीकडून ओवाळून घेतो, त्याला त्या वर्षी मृत्यूचे भय नसते. 
  • जो भाऊ भाऊबीजेला नित्यनेमाने बहिणीकडे जातो, त्याला मृत्यू नंतर यमलोकात यमराजाकडुन त्रास होत नाही. 

मरण प्रत्येकाला अटळ आहे, त्यामुळे हा जो दुसरा अर्थ आहे, तो जास्त सुसंगत वाटतो. 

या दिवशी यमुनेत स्नान करण्यालाही महत्व आहे. 

आपल्याकडे पुण्य पाप आणि त्याचा हिशोब ह्या संकल्पनेवर आधारित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या केल्याने पुण्यवर्धन (पुण्य वाढणे) किंवा पापक्षालन (पाप कमी होणे) होते असे मानले जाते. तशातलीच हीसुद्धा एक मान्यता. 

दिवाळी ह्या सणाच्या पौराणिक कथा अनेक असल्या तरी शेवटी सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन घरात साफसफाई करणे, सजावट करणे, चांगले पदार्थ करून खाणे आणि एकमेकांना भेटवस्तु देत आनंद साजरा करणे हा ह्या सणाचा गाभा आहे. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा