You are currently viewing गोवा मुक्ती संग्राम

गोवा मुक्ती संग्राम

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला असला तरी संपुर्ण भारत स्वतंत्र झाला नव्हता. 

ब्रिटिशांचा सगळ्या भारतावर एकछत्री अंमल नव्हता. त्यात अनेक संस्थाने होती, त्यांचे राजे ब्रिटिशांना अंकित राहुन आपापला राज्यकारभार करत होते. काही भाग फ्रेंच आणि काही भाग पोर्तुगीज लोकांच्या ताब्यात होता. 

गोवा, दीव, दमण, दादरा, नगर हवेली हे भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. समुद्र मार्गाने युरोपातुन १४९७ भारतात येणारा वास्को द गामा हा पहिला दर्यावर्दी होता. त्याने हा मार्ग शोधल्यावर युरोपातील इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच अशा साम्रज्यातून व्यापारी भारतात येऊ लागले. 

त्यांनी आधी इथल्या राजांच्या परवानगीने फक्त व्यापाराची सोय म्हणुन वखारी बांधल्या. समुद्री चाच्यांचा त्रास नको, आणि इथेही स्थानिकांपासुन सुरक्षा म्हणुन ते सैन्यबळ सुद्धा ठेवत असत. चलाखीने त्यांनी मग एक एक करत भारतातले वेगवेगळे भाग बळकावायला सुरुवात केली. 

यात सगळ्यात जास्त यशस्वी ठरले ते इंग्रज. त्यांनी जवळपास सगळा भारत बळकावला तरी ते कट्टर धार्मिक नव्हते. त्यांचा मुख्य रस भारतातील शेती, व्यापार, आयात निर्यात यावर नियंत्रण करून जास्तीत जास्त संपत्ती आपल्या देशात नेणे यामध्ये होता. 

पोर्तुगीज मात्र कट्टर ख्रिश्चन होते. त्यांचे मुख्य राज्य गोव्यात होते. तिथे त्यांनी फार जुलमाने स्थानिक जनतेला ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी भाग पाडले. इतर धर्मीय म्हणजे मुख्यतः हिंदूंना त्यांचा फार जाच होत असे. 

शिवाजी महाराजांनी गोव्यापासून जवळ असलेल्या मालवण भागात सिंधुदुर्ग बांधला, आपले आरमार स्थापन करून त्यांना वचक बसवला होता. संभाजी राजांनीही पोर्तुगीजांवर हल्ला करून त्यांचा नायनाट केला असता पण हि मोहीम चालू असताना दुसरीकडे मोगलांचा हल्ला झाल्यामुळे त्यांना परत फिरावे लागले.

पुढे अधून मधून पोर्तुगीजांविरुद्ध उठाव होत राहिले पण त्यांना यश आले नाही. अशा प्रयत्नांना मोठा जनाधार लाभला नाही. १९१० मध्ये पोर्तुगालमध्ये राजेशाही जाऊन लोकशाही आली तेव्हा त्यांच्या इतरत्र वसाहती स्वतंत्र होतील अशी आशा होती, पण पोर्तुगालला अशा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या वसाहती सोडायच्या नसल्याने गोव्यासाठी काही फरक पडला नाही. 

विसाव्या शतकात भारतात काँग्रेस देशभरात सक्रिय झाली होती. जनजागृती व्हायला लागली होती. टिळक, गांधी, नेहरू, बोस, पटेल अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या चळवळी होत होत्या त्याला लोकांचा भरपुर पाठिंबा मिळत होता. 

त्याचा प्रभाव गोव्यातही पडत होता. लुई मेनेझेस दे ब्रागांझा यांनी “ओ हेराल्डो” या नावाचे पोर्तुगीज वृत्तपत्र सुरु करून पोर्तुगीज सत्तेविरुद्ध आवाज उठवायला सुरु केले. पोर्तुगीजांनी कायदा करून वृत्तपत्रे, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणली. 

१९२८ मध्ये त्रिस्ताव दे ब्रागांझा कुन्हा यांनी गोव्यात “गोवा राष्ट्रीय काँग्रेस”ची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात या काँग्रेसला मान्यता मिळाली आणि त्यांना प्रतिनिधित्व सुद्धा मिळाले. पण त्यानंतर पोर्तुगालने पुन्हा कायदा करून राजकीय संघटना, मोर्चे यावर बंदी आणली. लोकांना सैन्यात भरती होण्यासाठी सक्ती केली गेली. 

पोर्तुगालच्या याप्रकारे प्रत्येक गोष्ट दडपणे आणि जाचक कायद्यांमुळे गोव्यातल्या जनतेत रोष वाढत होता. 

१९३८ मध्ये गोव्याच्या मुंबईत राहत असलेल्या लोकांनी तिथे हंगामी गोवा काँग्रेसची स्थापना केली आणि मुंबईतुन स्वातंत्र्य लढ्याचे काम सुरु केले. 

दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ मध्ये ब्रिटिशांनी भारत सोडणार असल्याचे जाहीर केले तेव्हा पोर्तुगीज सुद्धा गोवा आणि इतर वसाहती सोडतील अशी आशा निर्माण झाली. 

राम मनोहर लोहिया हे भारतीय काँग्रेसमधले लोकप्रिय नेते होते. गोव्यातील एक नेते ज्युलिओ मेनेझेस हे त्यांचे मित्र होते. लोहिया आपल्या मित्राला भेटायला म्हणुन गोव्यात गेले. ते आल्याचे लोकांना कळल्यामुळे आता काहीतरी चळवळ सुरु होईल ह्या आशेने अनेक लोक त्यांना भेटायला जमा झाले. 

लोहियांनी गांधीवादी पद्धतीने गोव्यातही आंदोलने करावीत असे सुचवले. त्यांनी आणि मेनेझेस यांनी जमलेल्या हजारो लोकांना संबोधित केले. लोकांनी भारत आणि गांधी यांचा जयजयकार करणाऱ्या घोषणा दिल्या. पोर्तुगीजांनी त्या दोघांना अटक करून गोव्याच्या हद्दीबाहेर सोडून दिले. 

पोर्तुगीजांनी ब्रिटिशांनी भारत सोडला तरी आपण सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. गोव्यात तेव्हा अनेक ठिकाणी निदर्शने आणि सत्याग्रह झाले, पण पोर्तुगीजांनी तेव्हाचे मुख्य नेते ब्रागांझा कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मीकांत भेम्बरे अशा नेत्यांना पकडुन पोर्तुगालमध्ये नेले. त्यामुळे जनता नेतृत्वहीन झाली आणि आंदोलन थंडावले. 

भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची फाळणीसुद्धा झाली. प्रचंड दंगली आणि हिंसाचार झाला. ब्रिटिशांनी शेकडो संस्थानिकांनासुद्धा भारत, पाकिस्तान यामध्ये सामील होणे किंवा स्वतंत्र राहणे असे पर्याय दिले. सरदार पटेलांनी फार कसबीने आणि प्रयत्नांची शर्थ करून बहुतेक संस्थानिकांना भारतात सामील करून घेतले. 

त्यात पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला करून एक युद्धसुद्धा सुरु केले. अशा घडामोडींमुळे भारतातल्या नेतृत्वाचे जास्त लक्ष तिकडेच होते, गोव्याकडे लक्ष कमी झाले होते. 

त्यात गोव्यात तोपर्यंत अनेक पक्ष उदयास आले होते. गोव्याने भारतात सामील व्हावे, महाराष्ट्र राज्यात जावे/ कर्नाटक राज्यात जावे, गोव्याने स्वतंत्र देश व्हावे किंवा पोर्तुगालचेच राज्य म्हणुन राहावे पण स्थानिकांच्या हाती व्यवस्थापन असावे असे अनेक वेगवेगळे परस्परविरोधी विचार हे पक्ष मांडत होते, त्यामुळे लोकांची एकजूट होत नव्हती आणि कुठलेच मोठे आंदोलन आकारास येत नव्हते. 

महात्मा गांधींनी त्यांना सुचवले कि सगळ्या पक्षांनी किमान नागरी अधिकारांसाठी एकत्र होऊन पोर्तुगीजांविरुद्ध लढावे म्हणजे पोर्तुगीजांना इथल्या लोकांचे म्हणणे ऐकावे लागेल. त्यानुसार सत्याग्रहाचे प्रयत्न होत होते पण पोर्तुगीज अशावेळी नेत्यांना अटक करून बळाचा वापर करून अशी आंदोलने दडपत होते. 

भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. त्यांनी पोर्तुगालकडे वेळोवेळी गोव्याचा विषय मांडला आणि गोव्याला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. भारत नवोदित स्वतंत्र देश असल्यामुळे लगेच युरोपातल्या एका शक्तीशी शत्रुत्व घेणे भारताला परवडणार नव्हते. 

पोर्तुगाल हा नाटो संघटनेचा सदस्य असल्यामुळे पोर्तुगालशी युद्ध केले तर इतर शक्ती त्यात पोर्तुगालच्या बाजूने उतरून पुन्हा महायुद्धासारखी परिस्थिती ओढवण्याचा धोका होता. 

भारताने गोव्यातल्या स्वातंत्र्य चळवळींना छुपा पाठिंबा देण्याचे धोरण अंगिकारले. 

गोव्याच्या सीमेवर सत्याग्रह होत असत, मोठ्या संख्येने महाराष्टरातून लोक गोव्यात प्रवेश करत असत. पोर्तुगीजांनी त्यावर गोळीबार केल्यामुळे अनेकांचा जीव गेला, पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे नेहरूंना त्यावर उघड पाठिंबा किंवा पोर्तुगालच्या निषेध करता आला नाही. 

अहिंसक चळवळीसोबतच गोव्यातल्या काही मंडळींनी क्रांतिकारी मार्ग स्वीकारला. विश्वनाथ लावंड, नारायण नाईक, दत्तात्रय देशपांडे अशा लोकांनी एकत्र येऊन आझाद गोमंतक दल स्थापन केले. त्यांचे क्रांतिकारक गोव्यात पोर्तुगीज पोलीस, बँक अशा सरकारी व्यवस्थांवर हल्ला करून गोव्याला अस्थिर करण्याचे काम करत होते. 

शेवटी १९६१ मध्ये भारताने पोर्तुगालविरुद्ध ताठर भूमिका घेतली. पोर्तुगालने गोवा सोडण्यास नकारच दिला. 

भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन विजय सुरु केले. ह्यात भूदल, नौदल, हवाई दल असे तिन्ही दल सहभागी झाले. १८ डिसेंबर १९६१ ला हि कारवाई सुरु झाली आणि ३६ तासात संपली. 

पोर्तुगालच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या पंतप्रधानांना इतक्या दूर भारतात युद्ध लढणे परवडणार नाही त्यामुळे युद्ध टाळा असा सल्ला दिला होता. पण पंतप्रधांनानी तो मानला नाही. त्यांनी गोव्यातल्या अधिकाऱ्यांना शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत लढा असा आदेश दिला. 

त्यांना आशा होती कि जर गोव्यातल्या सैन्याच्या तुकडीने काही दिवस तग धरला तर तिकडून अजून कुमक पाठवता येईल आणि इतर देशांचा पाठिंबा मिळवुन भारताला हरवता येईल. 

गोव्यातल्या अधिकाऱ्यांना मात्र भारताला हरवणे अवघड असल्याची आणि त्यांना स्थानिकांचा पाठिंबा असल्यामुळे राज्य करणे सोपे नसल्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी अनावश्यक जीवितहानी टाळण्यासाठी पंतप्रधानांचा आदेश डावलुन शरणागती पत्करली. 

अवघ्या दीड दिवसात हि कारवाई संपली आणि गोवा स्वतंत्र होऊन भारतात सामील झाले. त्यामुळे १९ डिसेंबर हा दिवस गोवा मुक्ती दिन म्हणुन साजरा होतो. 

पंडित जवाहरलाल नेहरू यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उत्तम होती. त्यांनी अनेक देश आणि तिथल्या नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. याचा भारताला फार फायदा झाला. बऱ्याच देशांनी भारताला पाठिंबा दिला. काही देशांनी पोर्तुगालचे मित्रदेश असल्यामुळे निषेध नोंदवला पण प्रत्यक्ष कृती करणे टाळले. 

सुरुवातीला काही दिवस गोवा लष्करी प्रशासनाखाली होते. मग गोवा आणि दमण दिव केंद्राच्या शासनाखाली आले. 

गोवा महाराष्ट्रात सामील व्हावे अशी तिथल्या काही लोकांची इच्छा होती, आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्नही केले. पण बहुसंख्य गोव्याच्या जनतेला गोव्याची एक वेगळी संस्कृती आहे आणि त्यांनी स्वतंत्र राहून ती जपावी असे वाटत होते. गोव्यात सार्वमत चाचणी झाली तेव्हा गोव्याने स्वतंत्र राहावे हाच कौल निघाला. 

काही वर्षांनी ३० मे १९८७ रोजी गोव्यामध्ये केंद्राचे शासन संपले आणि गोवा एक पूर्ण राज्य म्हणुन घोषित झाले. ३० मे हा दिवस गोवा राज्य दिन म्हणुन साजरा होतो. 

आता गोवा हे भारतातले आकारमानाने सर्वात छोटे राज्य आहे. त्याची राजधानी पणजी येथे आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे गोवा हे आवडते ठिकाण आहे. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा