हिंदु धर्मात एकादशी हा दिवस फार पवित्र मानतात. एकादशी म्हणजे अकरावा दिवस. हा दिवस भगवान विष्णु यांच्या पूजेचा असतो. त्यादिवशी उपवास, सदाचरण, नामस्मरण असे व्रत केल्याने पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे.
हिंदु कालगणनेत चंद्राच्या कलांनुसार दिवस मोजतात. म्हणजे चंद्र कलाकलाने वाढत जाऊन पोर्णिमेपर्यंतचे १५ दिवस, आणि मग कमी होत अमावास्येपर्यंतचे १५ दिवस. त्यामुळे एका महिन्यात दोन एकादश्या आणि वर्षभरात २४ एकादश्या येतात.
ह्या सर्व एकादश्यांना वेगवेगळी नावे आहेत आणि त्यांच्याशी निगडित कथा आहेत. त्यातल्या एकादशी याच दिवशी प्रकट झालेल्या आणि त्याच नावाच्या देवीच्या कथा खालीलप्रमाणे आहेत:
एकादशीचे व्रत त्या दिवसभर करायचे असते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला (बारावा दिवस) सोडायचे असते.
सर्व एकादश्यांपैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्व वेगळे आहे. हिंदूंच्या मान्यतेनुसार मनुष्यांची कालगणना, दिनचर्या वेगळी आणि देवांची कालगणना आणि दिनचर्या वेगळी. त्यानुसार देव आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे चार महिने झोपायला जातात. त्यांच्यासाठी तो एवढा मोठा कालखंड नसतो.
ह्या चार महिन्याच्या काळाला चातुर्मास म्हणतात. ह्या काळात देव झोपलेले असल्यामुळे आपले संरक्षण व्हावे ह्या उद्देशाने व्रत वैकल्ये, उपास तापास इ. कर्मे जास्त करण्याची पद्धत पडली.
आषाढ महिन्यातल्या एकादशीला देव झोपतात म्हणुन तिला शयनी किंवा देवशयनी एकादशी म्हणतात. कार्तिक महिन्याच्या एकादशीला ते उठतात म्हणुन प्रबोधिनी एकादशी म्हणतात.
महाराष्ट्रात ह्या दोन्ही एकादशांचं अजुन वेगळं महत्व आहे ते वारकरी संप्रदायामुळे. वारकरी संप्रदाय, भागवत धर्मीय, भागवत संप्रदाय, भक्ती संप्रदाय, वैष्णव धर्मीय अशा वेगवेगळ्या नावाने ते ओळखले जातात.
वर सांगितल्याप्रमाणे एकादशी हा विष्णूचा महत्वाचा दिवस आहे. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी हे विष्णु आणि लक्ष्मीचंच रूप आहे. महाराष्ट्रातल्या सर्व भक्तांसाठी हे परम आदराचं आणि श्रद्धेचं स्थळ आहे.
अनेक शतकांपूर्वी हिंदु समाज मरगळलेल्या अवस्थेला आला होता. अनेक अनिष्ट परंपरा रूढी यात अडकलेला होता. देवाधर्माची कुठलीही गोष्ट हि पंडितांच्या नियमांमध्ये कैद झाली होती. वेदशास्त्रांचे अध्ययन फक्त त्यांनाच करण्याची अनुमती असल्यामुळे ते म्हणतील तसे धर्माचे निर्णय होत असत. बाकी मंडळींना याबाबतीत ज्ञान नसे.
ज्ञानेश्वरांपासुन सुरु झालेल्या संतांच्या साखळीने हि चाकोरी मोडली. संस्कृतऐवजी लोकांच्या नित्याभाषेत ज्ञानेश्वरी, ओव्या, अभंग, भारुडे, भजने असे अध्यात्मिक साहित्य रचले. लोकांना सोप्या भाषेत अध्यात्म सांगितले.
लोकांनी कर्मकांडाच्या फार आहारी जाऊ नये म्हणून अगदी सोपा मार्ग सांगितला. देवावर श्रद्धा ठेवणे, नियमित भक्ती करणे, देवाचे नाव घेत राहणे, आणि त्याची आठवण ठेवत सदैव चांगले वागणे इतका तो सोपा मार्ग होता.
ह्या सर्व संतांची आणि त्यांच्या अनुयायांची पंढरपुरातल्या विठ्ठलावर फार श्रद्धा होती. अत्यंत प्रेम होते. हा विठ्ठल ह्या भक्तांच्या हाकेला धावुन जायचा, त्यांच्या इच्छा पूर्ण करायचा, त्यांना संकटातुन सोडवायचा, सदैव सोबत करायचा. त्याने आपल्या भक्तांना कुठल्याही जातीभेदाने अंतर दिले नाही.
या विठ्ठलाची भेट होत राहावी म्हणुन वारीची पद्धत पडली. वारी म्हणजे वारंवार विठ्ठलाला भेटायला जाणे. आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे दोन्ही दिवस फार पवित्र असल्यामुळे ह्या दिवशी पंढरपुरात पोहचावे या हिशोबाने लोक यात्रा करायला लागले.
पंढरपुरात भक्तांचा, संतांचा मेळा भरायला लागला.
संतांची पादुका असलेली पालखी वारीत नेण्याची प्रथा संत तुकारामांच्या वंशजांनी सुरु केली. आता संत तुकारामांची देहूमधून, संत ज्ञानेश्वरांची आळंदीतून, संत निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरातुन, संत एकनाथांची पैठनहून, गजानन महाराजांची शेगावहून अशा अनेक पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघतात.
आपापल्या ठिकाणाहून पंढरपुरात पायी पोहचायला जो वेळ लागतो तेवढे दिवस आधी ह्या दिंड्या प्रस्थान करतात. रोज थोडे अंतर चालुन एका ठिकाणी मुक्काम करतात. आता अनेक वर्षांपासुन हा क्रम चालत असल्यामुळे पालख्यांचे मार्ग, मुक्काम स्थळ सर्व काही ठरलेले असते. तुकाराम आणि ज्ञानेश्वरांची दिंडी पुण्याजवळूनच निघत असल्यामुळे त्यांची वाटेत दोन तीन भेट होते.
लाखो लोक दरवर्षी ह्या वारीत सहभागी होतात. फार उत्साहाचे वातावरण असते. संतांच्या पादुका एका फार सुंदर सजवलेल्या पालखीत ठेवलेल्या असतात. त्या पालखीच्या पुढे आणि मागे ठरलेल्या क्रमाने वेगवेगळ्या गावच्या दिंड्या असतात. पूर्ण दिवस लोक वेगवेगळे भजन म्हणत, विठ्ठल रुक्मिणी, वेगवेगळे संत यांच्या नावाचा जयघोष करत मार्गक्रमण करतात.
दिंडीत काही ठिकाणी रिंगणे होतात. दिंडीमध्ये एक माउलींचा घोडा असतो त्यावर माउली अदृश्यरूपाने स्वार असतात असे मानतात आणि दुसऱ्या सेवकाचा घोडा. हे घोडे ठरलेल्या ठिकाणी वेगाने दौडत रिंगण घालतात. आणि लोक त्यांचे पाऊल पडले तिथली माती घेऊन डोक्याला लावण्यासाठी झेपावतात. घोडे गेले कि सगळे वारकरी त्याच मार्गावर नाचत नाचत, भगवे झेंडे उंचावत रिंगण घालतात. आनंदाला उधाण येतं. ह्या ठिकाणी वारकऱ्यांची ऊर्जा काही वेगळीच असते.
दिंडीत बहुतेकांकडे टाळ असतो, काही जण मृदूंग घेऊन चालतात. काही स्त्रिया तुळस आपल्या डोक्यावर घेऊन चालतात. काहीजणी पाण्याचा कळस घेऊन जातात. वाटेत वारकऱ्यांना तहान लागली तर पाणी मिळावे या सेवाभावनेने त्या असे करतात.
गावोगावी अनेक लोक श्रद्धेने वारकऱ्यांची खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करतात. सर्वांना वारीत जाणे शक्य नव्हते त्यामुळे विठ्ठलाला भेटायला निघालेल्या वारकऱ्यांना सर्व जण सन्मानाने वागवतात. वारीला जाऊन गावात परत आलेल्या लोकांना लोक नमस्कार करतात ते विठ्ठलाला भेटून आलेल्या माणसाला नमस्कार केला तो विठ्ठलालाच पोहचेल अशा भक्तिभावाने.
वारीमध्ये सर्व वारकरी एकसमान असतात. कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ / उच्च नीच नसतो. सर्वबंधुसमभाव हीच संतांची शिकवण आहे. ज्ञानेश्वरांना लोक त्यांच्या सर्व विश्वप्रतीच्या वत्सलतेमुळे माउली म्हणायचे तसेच वारीत सर्व एकमेकांना अगदी लहानांना सुद्धा आदराने माउली म्हणुनच हाक मारतात. एकमेकांमध्ये पांडुरंग बघुन एकमेकांना नमस्कार करतात.
आपापल्या गावातून ह्या दिंड्या निघाल्या कि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून दिंड्या निघतात, लोक वारीत सहभागी होतात. इतक्या मोठ्या संख्येने आणि स्वयंप्रेरणेने दीर्घकाळापासून चालू असलेल्या ह्या सोहळ्याची विश्वविक्रमात नोंद झालेली आहे.
वारीत सतत भजन, हरिपाठ इ. चालु असते. दिवसभर देवाचे नाव घेतले जाते. पहाटे काकड आरतीने दिवस सुरु होतो आणि संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले कि तिथे देवाची आरती आणि कीर्तनाने शेवट होतो. ह्यातुन एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा तयार होते ती आपल्याला अनेक दिवस पुरते.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
तुमच्या गोष्टी फारच छान लिहिल्या आहेत. त्या मी ऑडिओ मध्ये सांगत आहे. सगळ्यांना फार आवडतात