You are currently viewing वैभवलक्ष्मीची कहाणी

वैभवलक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. ते नगर खूप मोठं होतं. 

त्या नगरामध्ये अनेक लोक व्यसनी होते; त्यामुळे त्यांचा प्रपंच दुःखी झाला होता. गावातील लोक आपापसांत संघर्ष करीत होते. 

त्याच गावामध्ये सुनीता राहत होती. त्यांचा देवावर पूर्ण विश्वास होता. परमार्थाच्या आधारावरती त्यांचा प्रपंच सुखाने चालला होता.

सुनीताच्या पतीला दुर्जनांची संगत लागली. ते व्यसनी बनले. त्यांच्या हातून काही काम-धंदा होईना. घरातील पैशाची आवक कमी झाली. रोजच्या भोजनाचीही सोय होईनाशी झाली. सुनीताचे पती मनोहर भिक्षाधीश बनले. घरातील सारे समाधान नाहीसे झाले. घराची दारे मोडून दारिद्र्य आत घुसले.

रात्रंदिवस सुनीताची काळजी वाढू लागली, उपासमार होऊ लागली; तरीपण तिने आपला पूजापाठ सोडला नाही. परमश्रद्धायुक्त अंत:करणाने ती देवाची भक्ती करू लागली. 

एके दिवशी अचानक एक सत्पुरुष येऊन उभे राहिले. सुनीता घाबरली. सत्पुरुषाच्या झोळीत टाकायला तिच्याजवळ काहीच नव्हते. एका गरीब बाईने दिलेली शिळी भाकरी घरात होती. पतीच्या ताटात दोन घास वाढावेत, या उद्देशाने तिने ती राखून ठेवली होती. 

परंतु सत्पुरुष दारामध्ये उभा राहिला, हे पाहून ती भाकरी आणली व त्याच्या झोळीत टाकली.

सत्पुरुषाने त्या भाकरीचा स्वीकार केला. परंतु सुनीताचा चेहरा पाहून त्याला शंका आली आणि तिला विचारले, “बाईसाहेब, आपला चेहरा एवढा उदास का ?” 

त्या वेळी सुनीताने आपली सारी कहाणी सांगितली. 

ते सारे ऐकून सत्पुरुषाने सांगितले, “आपणास मी एक व्रत सांगतो. ते आपण करावे; म्हणजे आपले दिवस बदलतील. गेलेलं वैभव परत प्राप्त होईल. पती पुनः सन्मार्गाला लागेल. दारिद्र्य संपून जाईल आणि सुखाचे दिवस येतील. हे व्रत असे की, दर शुक्रवारी सायंकाळी दिवेलागणीच्या वेळी दोन खऱ्या सोन्याच्या दागिन्यांची पूजा करावी. हळदी-कुंकू लावून लाल फुलाने पूजा करावी. गोड पदार्थ करून अलंकाररूपी देवीला नैवेद्य दाखवावा, आरती करावी. घरातील सर्व लोकांना नैवेद्याचा प्रसाद द्यावा.”

सुनीता महात्म्याच्या पाया पडली. तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. महात्म्याने तिच्याकडून घेतलेली भाकरी तिला प्रसाद म्हणून परत दिली आणि ते निघून गेले. 

शुक्रवार उजाडला. सुनीताने साधूने सांगितल्याप्रमाणे पूजा केली. दोन शुक्रवार निघून गेले आणि तिसरा शुक्रवार उजाडला. आज दिवा लावण्यास घरी तेलही नव्हते. काय करावे, हे तिला समजेना. 

अचानक दार वाजले. तिने दार उघडले, तर पती दारात उभे. पतीने पगाराचे पैसे सुनीताच्या हाती दिले. मनोहररावांचा बदललेला स्वभाव पाहून सुनीताने त्यांना विचारले की, ‘आपल्या वागण्यात बदल कसा झाला ?” 

मनोहररावानी सांगितले की, ‘माझ्या स्वप्नात एक सत्पुरुष आला आणि त्याने मला सर्व व्यसने सोडावयास आणि सन्मार्गाने वागावयास सांगितले. त्या वेळेपासून माझे जीवन बदलले. माझी चूक मला जाणवली. आता मी कधीही कुमार्गाने वाटचाल करणार नाही.”

पतीचे बदललेले जीवन पाहून सुनीताला खूपच आनंद झाला. तिने बाजारातून वस्तू आणल्या. मनोभावे वैभवलक्ष्मीची पूजा केली. गेलेले सर्व वैभव परत मिळाले. 

गावातील लोकांना आश्चर्य वाटले. काही महिला सुनीताकडे येऊन बदललेल्या परिस्थितीचे रहस्य विचारू लागल्या. सुनीताने वैभवलक्ष्मीचे व्रत सर्वांना सांगितले. 

त्या महिलांच्याही काही अडचणी होत्या. त्यांनी व्रत केले आणि त्याची संकटे दूर झाली. गावातील अनेक महिलांनी व्रत केले. गावात सुधारणा झाल्या. व्यसनी गाव आता सन्मार्गाला लागले. गावातील संघर्ष कमी झाले. 

‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ,’ ही भावना गावात वाढली. सुखा-समाधानाचे सूर गावात निनादू लागले. 

ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा