You are currently viewing तुपरोटी

तुपरोटी

मागे मी तुम्हाला संत नामदेवांच्या दोन गोष्टी सांगितल्या. 

नामदेव पांडुरंगाचे फार मोठे भक्त होते. 

ते इतके मनापासुन पांडुरंगाचे भजन कीर्तन करीत कि साक्षात मूर्तीरुपी उभा पांडुरंग मान डोलावत ते ऐकत असे. 

त्यांना आपल्या भक्तीवर थोडा अहंकार झाला होता. 

ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाईंनी त्यांचा अहंकार ओळखुन त्यांना विसोबांकडुन उपदेश घेण्याचा सल्ला दिला होता. 

विसोबांनाही आपल्या पद्धतीने त्यांना देव तर सगळीकडेच आहे याची जाणीव करून दिली. 

त्यानंतर नामदेवांची दृष्टीच बदलली. 

आता त्यांना फक्त पांडुरंगाच्या मूर्तीतच नाही तर जिथे तिथे देव दिसायला लागला. 

एक दिवस ते जेवायला बसत असताना एक कुत्रा आला आणि त्यांची रोटी घेऊन पळाला. 

नामदेव तुप घेण्याच्या बेतात होते तेवढ्यात हे झालं. 

नामदेव त्या कुत्र्याच्या मागे धावायला लागले. पण त्याला रोटी पळवली म्हणुन मारण्यासाठी नाही. 

उलट कोरडी रोटी खाण्याऐवजी तुप लावुन खावी म्हणुन तुप घेऊन त्यांची हि धडपड चालली होती. 

नामदेवांना त्या कुत्र्यातही देव दिसला. 

एक उपाशी कुत्रा आपली रोटी घेऊन गेलाय आणि त्याने त्याचं पोट भरेल याचं त्यांना समाधान होतं. 

पण त्या कुत्रातल्या ईश्वराला साधी रोटी अर्पण करण्याऐवजी आपल्याकडे तूप आहे तेही अर्पण करावं म्हणुन ते धावत होते.  

त्यांचं तूप घ्या तूप घ्या हे म्हणणं कुत्र्याला कुठे समजतंय?

काही अंतर त्यांचा पाठलाग चालला आणि तो कुत्रा गायब झाला आणि त्याच्या जागी पांडुरंग प्रकट झाला. 

विसोबांनी दिलेला संदेश नामदेवांच्या किती ध्यानी उतरला ह्याची परीक्षा पांडुरंग पाहत होता. 

नामदेव त्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. 

आपल्या भक्ताची हि प्रगती पाहुन विठ्ठलाला फार आनंद झाला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा