एका जंगलात दोन हट्टेकट्टे बैल होते.
त्यांच्यात छान मैत्री होती.
दोघे जवळपास नेहमीच सोबत असत.
एक सिंह त्यांच्यावर डोळा ठेवुन होता.
ह्यांची शिकार करायला गेलो तर दुसरा जवळपासच असेल आणि मग एकाशी नाही दोघांशी लढावं लागेल आणि आपला निभाव लागणार नाही हे त्याला माहित होतं.
तो एकदा एका बैलाला जाऊन भेटला. दुसरा बैल काही अंतरावरच होता.
तो म्हणाला “आज बरा एकटा दिसलास. नाही तर तुझा मित्र म्हणतो मला ह्याला एकटं सोडताच येत नाही. माझ्याशिवाय ह्याचं पान हलत नाही. प्रत्येक गोष्टीत मला बघावं लागतं.”
बैलाला हे ऐकुन राग आला. तो म्हणाला “असं काही नाही. आम्ही मित्र आहोत म्हणुन सोबत राहतो. एकमेकांच्या गोष्टीत लक्ष घालायला नाही.”
सिंह म्हणाला “असेल असेल. चल मी येतो.”
तोवर दुसरा बैल तिथे आला. “अरे गेला का सिंह. मला वाटलं तुझ्यावर हल्ला करायला येतोय कि काय, मी फटाफट आलो. कसा काय निघुन गेला? काय म्हणत होता तो?”
पहिल्या बैलाला सिंहाच्या तोंडुन ऐकलेल्या गोष्टीनंतर दुसऱ्या बैलाने अशी चौकशी केलेली आवडली नाही.
तो म्हणाला “तुला काय करायचंय तो काय म्हणाला? तुला लक्ष द्यायची गरज नाही प्रत्येक गोष्टीत.”
दुसऱ्या बैलाला आश्चर्य वाटलं.
पहिला बैल त्यानंतर दुसऱ्या बैलाशी जरा फटकूनच राहायला लागला.
एक दिवस सिंहाने दुसऱ्या बैलाला एकटं गाठलं. त्याला म्हणाला “अरे तुझा मित्र नाही का तुझ्यासोबत आज?”
दुसरा बैल: “नाही, त्याच्याकडेच चाललोय.”
सिंह: “तुझ्या सहनशक्तीची कमाल आहे.”
दुसरा बैल: “का?”
सिंह: “अरे मी ऐकलं आजकाल तो तुझ्याशी काही चांगलं वागत नाही. सदानकदा तु त्याच्या मागे मागे फिरतोस, त्याला एकटं सोडत नाहीस ह्याचा त्याला कंटाळा आलाय म्हणे. पण तु मात्र काही मनात न ठेवता त्याच्याकडे चालला आहेस, छान आहे. चला, मी येतो.”
दुसरा बैल पण आता जरा पहिल्या बैलाशी जरा अंतर ठेवुन राहायला लागला. त्यांच्यात भांडणं व्हायला लागली. हळू हळू त्यांनी सोबत फिरणं पण बंद केलं.
सिंहाने आता संधी साधली.
पहिल्या बैलाला गाठुन मारलं. दुसरा बैल जवळपास कुठेही नव्हता. सिंहाने आरामात शिकार केली.
असेच काही दिवसांनी त्याने दुसऱ्या बैलाला पण मारले.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take