संत सावता माळी हे संत ज्ञानेश्वरांच्याच काळात होऊन गेलेले आणि वयाने त्यांना ज्येष्ठ असलेले भक्ती परंपरेतले एक महान संत होते. परंपरा आणि कर्मकांडाच्या चौकटीत, एकाच जातीच्या मक्तेदारीत अडकलेल्या देवाधर्माला, अध्यात्माला, भक्ती परंपरेने सर्व चौकटी मोडत घराघरात पोहचवले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध जातींमधले अनेक जण भक्तिपंथाला लागले आणि त्यांनी संतपद गाठले, आध्यात्मिक उन्नती केली आणि आपल्या आयुष्यातुन इतरांना भक्तीचा मूल्यवान संदेश दिला.
संत सावता माळी यांचा जन्म इ.स. १२५० मध्ये झाला. आजच्या सोलापुर जिल्ह्यातले अरण हे त्यांचे गाव. त्यांच्या घरी धार्मिक वातावरण होतेच. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही विठ्ठलाचे भक्त होते. घरची शेती सांभाळुन ते विठ्ठलाचे भजन नामस्मरण करत असत.
सावता माळी हे आपल्या कामातच देव पाहत असत. आपल्या शेतमळ्यात फळे, फुले आणि भाज्या पिकवणे हा त्यांचा नित्यक्रम होता. हीच कामे ते अगदी मग्न होऊन करायचे, काम करता करता सतत विठ्ठलाचे स्मरण करायचे आणि आपल्या मळ्यात, आपल्या झाडांमध्ये पिकांमध्येच विठोबाला बघायचे. खाली दिलेल्या प्रसिद्ध ओळ हि सावता माळी ह्यांचीच आहे.
आमची माळियाची जात। शेत लावू बागाईत।।
कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी ।।
लसण मिरची कोथंबिरी| अवघा झाला माझा हरि।।
आपल्या अभंगांमध्ये त्यांनी आपल्या व्यवसायातल्या आणि नित्य वापरातल्या अनेक शब्दांचा आणि वस्तूंचा अशाप्रकारे उपमा देत सुंदर वापर केला. देव अशा रोजच्या वस्तूंमध्येही पाहता येतो हे दाखवुन दिलं.
सावता माळी ह्यांचे जवळच्याच गावातील जनाई हिच्याशी लग्न झाले. त्यांना विठ्ठल व नागाताई असे एक मुलगा व एक मुलगी होते. त्यांनी आपली शेती आणि संसार करतच विठ्ठलाची भक्ती केली.
स्वकर्मात व्हावे रत। मोक्ष मिळे हातो हात।।
सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।।
ह्या अभंगातुन त्यांचा विचार व्यक्त होतो. आपले नियोजित कामच करत रहावे. सावत्याने जो मेहनत घेत मळा बनवला, तो विठ्ठलालाही दिसतो, आणि विठ्ठल त्यात समाधानी असतो. त्यातुनच मोक्ष प्राप्त होतो.
ते स्वतः हा विचार जगले. असे म्हणतात ते कधीही आपले गाव आणि शेत सोडुन पंढरपुरला गेले नाहीत. पण आपल्या ह्या भक्ताला भेटायला स्वतः विठ्ठल त्यांच्या घरी आला.
ह्याची आठवण म्हणुन आषाढी एकादशीला सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. पण एकादशीनंतर स्वतः विठ्ठलाची पालखी संत सावता माळी ह्यांच्या गावी येते. १२९५ साली आषाढ वद्य चतुर्दशीला ते इहलोक सोडुन गेले. त्यांच्या पुण्यतिथीला त्यांना वंदन करून त्यांच्या गावात उत्सव केला जातो.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take