विसोबांचा उपदेश

ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून नामदेव विसोबा खेचरांना भेटायला आणि त्यांच्याकडून उपदेश घ्यायला गेले. 

तेव्हा विसोबा खेचर एका महादेवाच्या मंदिरात होते. 

नामदेव जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा एक विचित्र दृश्य पाहायला मिळालं. 

अत्यंत म्हातारे विसोबा खेचर चक्क महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवुन झोपले होते. त्यांची अवस्था सुद्धा गलिच्छ होती. कपडे अस्वच्छ होते. 

नामदेवांना हे पाहुन राग आला. त्यांच्या मनात आलं कि हा महादेवाच्या पिंडीला पाय लावणारा माणुस काय मला उपदेश करेल? 

पण ज्ञानेश्वरांनी त्यांना भेटायला सांगितले असल्यामुळे नामदेवांनी विसोबांना उठवले. 

ते जागे झाल्यावर त्यांना म्हणाले “तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवुन का झोपलाय? दुसरीकडे पाय ठेवा.” 

विसोबा म्हणाले “बाळा मी आता फार म्हातारा झालोय. माझ्या शरीरात अजिबात त्राण नाही. मला नीट दिसतसुद्धा नाही. मला पाय हलवायची सुद्धा शक्ती नाही. तुच माझा पाय पकड आणि सरकवुन ठेव.” 

नामदेवांनी विसोबांचे पाय धरले आणि सरकवले. त्याच क्षणी त्यांच्या पायाखाली दुसरी पिंड प्रकट झाली. 

नामदेवांनी त्यांचे पाय इकडे तिकडे बऱ्याचदा हलवुन ठेवले. पुन्हा पुन्हा त्यांच्या पायाखाली पिंड प्रकट झाली. 

आता नामदेवांना यामागचा अर्थ कळला. 

हि सगळी सृष्टीच देवाने निर्माण केली आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी देव आहे. आपल्या खाली, वर, सर्व बाजुंना प्रत्येक वस्तुत देव आहे. माणुस आपल्या सोयीसाठी देवाचं एक प्रतीक म्हणुन मूर्ती बनवतो, देवाला एखाद्या रूपात बघतो, मूर्तीची पूजा करतो. केवळ ते प्रतीक किंवा रूप म्हणजे देव नाही. तो तर सर्वत्र आहे. 

त्यांना आपल्या आजवरच्या भक्तीमधली त्रुटी कळली. देव सगळीकडेच असल्यामुळे तो त्यांना भेटायला आलेल्या निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरांमध्ये सुद्धा होता. त्यांनाही आदराने वागवायला हवं होतं. त्यांनी तसं केलं नाही त्यामुळे त्यांचं मडकं कच्चं राहिलं होतं. 

विसोबांना आता नामदेवांना बोध झालाय हे लक्षात आलं, आणि ते आपला गलिच्छ अवतार दूर करत मुळ रूपात आले. त्यांनी आपल्या चमत्काराने नामदेवांचं मडकं भाजुन पक्कं केलं होतं. नामदेव विसोबांचे शिष्य झाले आणि आपल्या ज्ञानात प्रगती केली. 

पुढे स्वतः विठ्ठलाने त्यांची परीक्षा घेतली, त्यातही ते उत्तीर्ण झाले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा