You are currently viewing सोमवारची कहाणी (साधी)

सोमवारची कहाणी (साधी)

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. 

त्याचा एक शिष्य रोज तळ्यावर जाई, स्नान करी. शंकराची पूजा करी आणि वाटेत वेळूचं बेट होतं. 

तो परत येऊ लागला, म्हणजे ‘मी येऊ?’ असा आवाज येई. तो मागे पाही; पण कोणीच नसे. 

त्या भीतीने तो वाळत चालला. तेव्हा गुरुजींनी त्यास त्याविषयी विचारले. 

शिष्याने “मी येऊ?” या गोष्टीबद्दल सांगितले. 

तेव्हा गुरुजी म्हणाले, “भिऊ नको, मागे काही पाहू नको! खुशाल त्याला ये म्हण! तुझ्यामागून येऊ दे.” 

शिष्य नेहमीप्रमाणे स्नानास गेला. पूजा करून येऊ लागला, तेव्हा ‘मी येऊ असा आवाज येताच त्याला ‘ये’ असे उत्तर दिले. 

घरी आला. गुरुजींनी पाहिलं. बरोबर एक मुलगी होती. 

त्यांनी दोघांचा विवाह करून दिला व एक घर दिलं. त्यानंतर श्रावणी सोमवार आला. 

बायकोला म्हणाला, “माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस.” नंतर तो उठला व शंकराच्या पूजेला गेला. 

हिनं थोडी वाट पाहिली. सैपाक करून जेवायला बसली. एक घास खाल्ला, तेवढ्यात पती आला. पुढचं ताट पलंगाखाली सरकवून हात धुतला व दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. 

दुसऱ्या सोमवारीही असंच झालं. असं चारी सोमवारी झालं. 

शेवटच्या सोमवारी नवल घडलं. रात्री दोघेजण पलंगावर गेले. पलंगखाली उजेड दिसला. 

“हा उजेड कशाचा ?” त्याने विचारलं. 

“ताटी भरल्या रत्नाचा.”

‘ही रत्ने कुठून आणली ?” 

ती मनात खूप घाबरली. “माझ्या माहेरच्यांनी दिली.”

“माहेर कुठं आहे ?” 

“वेळूच्या बेटी आहे.” 

“मला तिथं घेऊन चल.” 

दोघेही निघाली. 

ती मनात शंकरांची प्रार्थना करू लागली, “मला अर्धघटकेचं माहेर दे.”

ते वेळूचे बेट आलं. एक मोठा वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला. कोणी म्हणे माझा जावई आला. कोणी म्हणे, नणंद, कोणी म्हणे, बहीण आली. अनेक दास-दासी तिथं राबत होते; तर शिपाई पहारा देत होते. त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू-सासऱ्यांचा निरोप घेऊन घरी परतली. 

अर्ध्या वाटेत खुंटीवर हार राहिल्याची आठवण झाली. दोघेही परत गेली, तर तेथे वाडा नाही की शिपाई नाहीत. केवळ वेळूचं बेट आहे. 

पतीने विचारलं, “इथलं घर काय झालं ?” 

“जसं आलं तसं गेलं. आपलं अभय असेल, तर सांगते. चारी सोमवारी आपली हाक ऐकताच जेवताना ताटं तशीच पलंगाखाली सरकवून दिली. ती रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला, तेव्हा मी घाबरून गेले व माहेरची म्हणून सागितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितल. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. देव भक्ताच्या हाकेला धावला.” 

जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां-आम्हां पावो. 

ही साठा उत्तरांची कहाणी पांची उत्तरी सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा