एकदा एक सिंह आपल्या गुहेत आरामात झोपला होता. तेव्हाच एक उंदीर अन्नाच्या शोधात तिथे आला.
तिथे सिंहाने केलेली शिकार थोडी उरलेली होती. पण ती सिंहाच्या पलीकडे होती. उंदराला पलीकडे जायला जागा नव्हती.
त्याने सिंहाचा अंदाज घेतला. सिंह झोपेत होता. त्याने सिंहाच्या अंगावरून पलीकडे जायचे ठरवले.
तो सिंहाच्या अंगावर चढला पण त्याच्या हालचालीमुळे सिंहाला जाग आलीच.
सिंह अंग झटकत उठला आणि उंदीर खाली पडला. सिंहाने लगेच त्याला पकडले आणि गर्जना केली.
“काय रे उंदरा, माझ्या अंगावर चढायची तुझी हिम्मत कशी झाली? माझी शिकार आयती खायला चालला होतास काय? आता मी तुझीच शिकार करतो.”
उंदीर फार घाबरला होता. त्याने हात जोडले. “असं नका करू महाराज, तुम्ही एवढे मोठे सिंह, जंगलाचे राजे. माझ्या सारखा छोट्या उंदराला मारून तुमचं पोटसुद्धा भरणार नाही आणि उंदराची शिकार तुम्हाला शोभणार सुद्धा नाही. त्यापेक्षा तुम्ही मला माफ करा महाराज. मीपण तुमची लागेल तेव्हा मदत करेन.”
उंदराने मदत करेन म्हटल्यावर सिंह जोरात हसायला लागला. “अरे तुझा आकार बघ, माझा आकार बघ. तू कसली माझी मदत करणार?”
पण सिंहाचे पोट नुकतेच खाऊन झाले असल्यामुळे भरलेले होते. त्याला काही भूक नव्हती. त्यामुळे त्याने उंदराला सोडून दिले.
काही दिवसांनी त्या जंगलात शिकारी आले. त्यांनी सिंहाला पकडायला जाळे लावून ठेवले. त्या जाळ्यात सिंह अडकला. सिंहाने जाळ्यातून सुटण्याची खूप धडपड केली पण तो अजूनच अडकत गेला. त्याने खूप मोठ्याने गर्जना केली.
त्याचा आवाज ऐकून तो उंदीर तिथे आला. त्याने लगेच सिंहाला दिलासा दिला. “थांबा महाराज, काळजी करू नका. मी तुमचे जाळे माझ्या दाताने तोडून टाकेन.”
एक एक करून उंदराने पटापट आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळ्याच्या दोऱ्या तोडल्या आणि सिंहाला मुक्त केले. सिंहाला वाटले नव्हते पण एक दिवस तो उंदीर त्याच्या कामी आलाच. सिंहाने त्याचे आभार मानले.

लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take
khup Chan goshta aahe
Good but end should be concluded