You are currently viewing पनीर

पनीर

आपण जेव्हा हॉटेलात जेवायला जातो, तेव्हा भारतीय पदार्थांमध्ये एक तर दाक्षिणात्य पदार्थ असतात जसे कि इडली, डोसा, उत्तप्पा इ. किंवा उत्तर भारतीय पदार्थांमध्ये भाज्या (सब्जी), वेगवेगळ्या रोट्या (मुख्यतः तंदुरी) आणि भात आणि वरण असे प्रकार शक्यतो खाल्ले जातात. 

जर उत्तर भारतीय प्रकारचं जेवण केलं तर अनेक प्रकारच्या भाज्या असतात, तेव्हा ठरवताना एक वाक्य हमखास बोललं जातं ते म्हणजे “यार एक पनीरची भाजी घेऊ आणि दुसरी कोणती पण चालेल.” 

बाहेर जाऊन जेवण केलं आणि पनीर खाल्लं नाही असं सहसा होत नाही. पनीरच्या अनेक भाज्या असतात, पनीर बटर मसाला, पनीर कोफ्ता, पनीर भुर्जी, पनीर कढई, पनीर हंडी, पनीर टिक्का. म्हणजे खाणाऱ्याच्या आवडीनुसार आणि तिखट खाण्याच्या क्षमतेनुसार पनीरची भाजी ठरते आणि मागवली जाते. 

एक भाजी पनीरची आणि दुसरी कोणतीही असं म्हणण्याचं कारण म्हणजे पनीरची भाजी तर चांगली लागेलच याची खात्री असते. ताजं पनीर असेल तर त्याची एक सुंदर मलईदार चव पदार्थाला छान बनवते. नव्या हॉटेलमध्ये गेलो तर चवीची माहिती नसते पण शेफने काही गडबड केली तरी पनीरची भाजी बरी लागेलच याचा विश्वास असतो. 

जे लोक मेसमध्ये, हॉस्टेलमध्ये, कॅंटीनमध्ये जेवतात त्यांच्या मेनुमध्येसुद्धा पनीर हमखास असतं कारण बाकी जेवण बकवास असलं तरी पनीरचे तुकडे खाऊन जरा समाधान मिळवता येतं. पनीर फक्त भाजीच नाही तर आजकाल बिर्याणी, रोल्स, सँडविच यामध्ये सुद्धा टाकतात. 

फोटो काढताना बरेच जण सगळ्यांना हसरे चेहरे यावे म्हणुन चीssssज म्हणायला सांगतात. माझा एक मित्र होता तो म्हणायचं चीज क्यु यार, हम पनीर कहेंगे. आणि मग पनीsssssर म्हणायला लावायचा. फोटोसाठी परिणाम सारखाच होता. पण तेव्हा आम्हाला माहित नव्हतं कि पनीरचा अर्थ पण चीज असाच होतो. पनीरला इंडियन कॉटेज चीज असंही म्हणतात. 

हा शब्द मुळचा पर्शियन भाषेतला आहे, आणि त्याचा अर्थ तिथे चीज असा होतो. चीजचे अनेक प्रकार आहेत, पण पनीर म्हणजे कुठलंही चीज. आधी त्यालाच पेनीर असंही म्हणायचे. मध्यपुर्वेतून अनेक शतकं भारतात आक्रमणे, स्थलांतरे झाली, त्या दरम्यान हा पदार्थ इथे आलेला असणं शक्य आहे. 

काही जण वेदांमध्येही पनीरचा उल्लेख असल्याचं सांगतात. ऋग्वेदात दुधात आंबट पदार्थ टाकुन दुसरा पदार्थ बनवण्याचा उल्लेख असला तरीही आता जसं पनीर बनतं थेट त्या कृतीचा उल्लेख नाही. पदार्थ बनवण्याची पद्धत कालांतराने बदलत जाते, तत्कालीन चवीनुसार त्यात फरक पडतो, त्यामुळे हेही मुळ असणं शक्य आहे. 

पण काही लोक याचं खंडन करताना कृष्णाचं उदाहरण देतात. कृष्ण लहानपणी गोकुळात गोपालकांसोबत राहिला तेव्हा त्याच्या लोणी चोरून खाण्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. त्यात दूध, दही, घी, माखन असे उल्लेख असले तरी पनीरचा उल्लेख नाही. 

पनीरचाच एक प्रकार पोर्तुगीजांनी बंगालमध्ये बनवल्याचाही उल्लेख आहे. याला तिथे छेना म्हटलं गेलं. त्यापासूनच रसगुल्ला आणि चमचम सारखी बंगाली मिठाई बनते. 

मध्ययुगात प्रदीर्घ काळ चाललेल्या मुस्लिम राजवटींमध्येच हा पदार्थ आताच्या स्वरूपात लोकप्रिय झाला असावा अशी सर्वसाधारण मान्यता आहे. आताच्या पनीर या नावाचा मध्यपूर्वेतला संबंध हेच सूचित करतो. 

तर अशी आहे आपल्या आवडत्या पनीरची पार्श्वभूमी. पुढच्या वेळी हॉटेलात जेवण मागवाल तेव्हा नेहमीप्रमाणे एक पनीरची आणि दुसरी कोणती तरी भाजी मागवा, आणि नेहमीप्रमाणे तो टेबलवरचा सेल्फीसुद्धा काढा आणि म्हणा “पनीssssर”. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा