आज आपल्याकडे सॅन्डविच हा प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. दोन ब्रेड घेऊन त्यांच्यामध्ये नुसते बटर, जॅम, काही ठिकाणी चटणी लोणचेसुद्धा लावुन खातात. आणि काकडी, टमाटे, कांदे यांच्या चकत्या घेऊन त्यात चीज, मेयॉनीज, सॉसेस असे विविध प्रकारचे मिश्रण करूनसुद्धा खाल्ले जाते.
जगभरात ब्रेड करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या पोळ्या-भाकऱ्यांनासुद्धा फ्लॅट म्हणजे सपाट ब्रेड म्हणतात. आपण पोळी किंवा भाकरीचे तुकडे करून त्यात भाजी किंवा तत्सम पदार्थ घेऊन खातो. तसं मध्यपूर्वेत आणि युरोपात फ्लॅट ब्रेडला गुंडाळुन त्यात वेगवेगळे पदार्थ भरून खाण्याची पद्धत आधीपासुन होती.
सॅन्डविच हे इंग्लंडमधल्या शहराचे आणि विभागाचे नाव आहे. तिथल्या सरदाराला “अर्ल ऑफ सॅन्डविच” असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये सरदारांना लॉर्ड, अर्ल, ड्यूक, सर अशा वेगवेगळ्या पदव्या त्यांच्या मानाप्रमाणे दिल्या जातात. ह्या “अर्ल ऑफ सॅन्डविच”लाच लोक लॉर्ड सॅन्डविच असेही संबोधत असत.
तर या सॅन्डविचचे चौथे अर्ल जॉन मॉंटेग्यू यांना पत्ते खेळण्याचा मोठा छंद होता. आपल्या मित्रमंडळींसोबत ते बराच वेळ पत्ते खेळत असत. इतका वेळ खेळुन भुक लागली तरीही त्यांना खेळ मधेच सोडुन जेवायला जाणे आवडत नसे. त्यामुळे ते नोकराला दोन ब्रेड मध्ये मांसाचे तुकडे भरून द्यायला सांगत.
दोन ब्रेडच्या मध्ये असल्यामुळे त्यांना काटा चमचा न वापरता, हात खराब न करता आणि मुख्य म्हणजे आपला खेळ अर्धवट न सोडता हा पदार्थ खाता येत असे. त्यांचे मित्रही लॉर्ड सॅन्डविच खातायत तेच आम्हालाही हवे असे सांगत. त्यामुळे या पदार्थाचे सॅन्डविच हेच नाव पडले.
आधी सामान्य लोकांचा पदार्थ असलेला सॅन्डविच नंतर युरोपातल्या उच्च्वर्गीय लोकांमध्येही लोकप्रिय झाला आणि त्यांच्यामार्फत जगभर पसरला. ह्याच सॅन्डविचमध्ये मग बरेच प्रकार आले. परदेशात सॅन्डविच बहुतांश वेळा मांसाहारी असले तरी भारतात याचे शाकाहारी प्रकार जास्त लोकप्रिय आहेत.
आता हा शब्द आपल्या वाक्प्रचारांमधेही शिरला. दोन गोष्टींमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये एखादा कोंडला गेला असेल तर मराठीत जसं कात्रीत सापडलाय असं म्हणतात तसंच त्याचं सॅन्डविच झालंय असंही म्हणतात. इंग्लिशमध्येही सॅन्डविच हे त्याच अर्थाने क्रियापदासारखे वापरले जाते.
तर अशी आहे आपल्या आवडत्या सॅन्डविचची कथा.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take