पुरातन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते. त्याच्या राज्यात समृद्धी होती. राजाकडे सर्व प्रकारचे वैभव होते; पण त्याच्या पोटी संतान नव्हते. राजाने खूप दान-धर्म केला; पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही.
राजा-राणी उदास झाले. ते तीर्थयात्रा करू लागले. एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले. त्यांनी गणेशाची आराधना करावयास सांगितले. संकष्टी चतुर्थाचे व्रत करा, असे मार्गदर्शन केले.
राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला. राणीला अतिशय आनंद झाला. राजा-राणीने जाणकारास व्रताची माहिती विचारली.
जाणकाराने सांगितले की, दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते, तिला संकष्टी म्हणतात. व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठावे. तिळाचे उटणे लावून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. श्री गणेशाचे नामस्मरण करावे. दूध व फळे खाऊन राहावे.
रात्री चंद्रोदयाचे वेळी गणपतीची पूजा करावी. चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी. अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. दुधाचा अभिषेकही करावा. लाल गंध लावावे. तांबडी फुले अर्पण करावीत. एकवीस दूर्वांची जुडी व शमीपत्रे वाहावीत. धूप व दीप लावून २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा. आरती, मंत्रपुष्पांजली करावी. मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी.
चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावयाची. ओवाळणी करावयाची. मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करावयाची. भोजन-प्रसाद ग्रहण करावयाचा. हे संकष्टी चतुर्थीचे व्रत ४, ७, ११ किंवा २१ वेळा करावयाचे.
राजा-राणीने या व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतःकरणाने हे व्रत पूर्ण केले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव कार्तवीर्य असे ठेवले. हा मुलगा पुढे महान् गणेश-भक्त झाला.
पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे व्रत केले व आपले कार्य सफल केले. तसेच आपले कार्य सफल होवो.
ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.