You are currently viewing बालहट्ट

बालहट्ट

एकदा बिरबल दरबारात उशिरा पोहोचला. सहसा असे होत नसे. दरबारातल्या सर्व महत्वाच्या कामात अकबर बिरबलाच्या सल्ला घेत असे. त्यामुळे बिरबल वेळेवर हजर नसल्याने अकबर नाराज होता. 

बिरबलाने आत येताच अकबराला मुजरा केला. अकबर त्याला म्हणाला, “काय हे बिरबल? आमचा वजीरच दरबारात उशिरा येतोय हे आम्हाला आवडलं नाही.”

“माफ करा खाविंद. मी वेळेत तयार होतो, पण जरा अडकलो होतो.”

“अडकलो होतो म्हणजे, राज्याच्या कारभारापेक्षा काय महत्वाचं काम आलं होतं?”

“तसं नाही खाविंद. मला तसं नव्हतं म्हणायचं. खरं तर माझा मुलगा मी घरीच थांबावे, त्याच्याशी खेळावे म्हणुन हट्ट करत होता. मी दाराकडे वळलो कि रडत होता. त्याची समजुत काढता काढता जरा वेळ लागला. माफी असावी.”

“काहीतरीच काय बिरबल, एवढ्या मोठ्या राज्याचा वजीर तु आणि एका लहान मुलाला तुला पटकन समजावता येत नाही?”

“हुजूर, बालहट्ट काही सोपी गोष्ट नसते. लहान मुलांना उठसूट रागावलेलं चांगलं नसतं. आणि त्यांना फार समजही नसते. त्यांना त्याक्षणी एखादी गोष्ट हवी वाटली तर तीच पकडून बसतात. त्यांना जरा प्रेमाने, गोडीगुलाबीने समजावणं कठीण काम असतं. त्याला वेळ लागतोच.”

“मला त्यात काही अवघड वाटत नाही बिरबल. तू पराचा कावळा करतो आहेस.”

“तुम्ही काही वेळ मुलांसोबत घालवल्यावर तुम्हाला नक्की पटेल, खाविंद.” 

“आण लहान मुलांना. मी दाखवतोच तुला, सहज सांभाळीन मी.”

“हुजूर, लहान मुलांना आणायची गरज नाही. मला आता लहान मुलांचा चांगलाच अनुभव आहे, काही वेळ मीच लहान मुलांसारखा वागतो आणि तुम्ही माझ्या वडिलांसारखे वागा.”

“चालेल.”

“पण हुजूर, एक अट आहे. तुम्ही न चिडता, न रागावता, न ओरडता मला सांभाळून दाखवायचं.”

“मंजुर आहे बिरबल, आज दरबार संपल्यावर तु मुलासारखा वाग आणि मी वडिलांसारखा वागतो.” 

दरबार संपला आणि निवाडे, तक्रारी अशा विविध कामांसाठी आलेली माणसे घरी गेली. अकबराने बिरबलाला सांगितले चल आता ठरले तसे करूया. 

बिरबल लगेच खाली बसला. आणि मला खेळणे हवेत म्हणुन हट्ट सुरु केला. 

अकबराने त्याची समजूत काढली, “अरे बेटा, इथे दरबारात कुठे खेळणे असणार? आपण पकडा पकडी खेळूया का?”

“नाही नाही, मला खेळणे हवेत.” असे म्हणुन बिरबलाने मोठ्याने रडायला सुरु केले. 

“अकबराने आपल्या सेवकाला खेळणे आणायला पाठवले. आणि मग बिरबलाला म्हणाला “बेटा, बघ मी तुझ्यासाठी खेळणे आणायला सेवकाला पाठवले आहे. आता जरा शांत हो. खेळणे येईपर्यंत आपण दुसरे काहीतरी खेळू.”

बिरबल शांत झाला. आणि म्हणाला “ठीक आहे बाबा, आपण घोडा घोडा खेळू. तुम्ही घोडा व्हा, मी तुमच्यावर रपेट मारणार.” 

अकबर चमकला. “हे काय बिरबल? तू माझ्या पाठीवर बसणार? तुझी एवढी हिम्मत?”

“हुजूर आपण भूमिकेत आहोत हे विसरू नका. मुले आपल्या बाबांशी घोडा घोडा खेळतच असतात. तुम्हाला नसेल खेळायचे तर तुम्ही हरलात म्हणुन कबुल करा.”

“नाही, अजुन मी हरलो नाही. मला कोणी घोडा बनवलं नाही अजुन. पण हरकत नाही. मी बनतो घोडा.”

अकबर खाली बसला आणि वाकुन घोडा झाला. बिरबल त्याच्या पाठीवर बसुन फिरून आला. अकबराचं अंग अवघडलं.

सेवक खेळणे घेऊन आला. बिरबल त्या खेळण्यांशी काहीवेळ खेळला. अकबराला वाटले आता झाले. 

तेवढ्यात बिरबलाने मला भूक लागली म्हणुन भोकाड पसरले. अकबराने त्याच्यासाठी खायला मागवले पण तो खायला ऊस हवा म्हणुन रडायला लागला. 

अकबराने सेवकाला पाठवुन उसाच्या कांड्या मागवल्या. त्या येईपर्यंत बिरबल रडतच होता. 

सेवक उसाच्या कांड्या घेऊन हजर झाला. बिरबल म्हणाला मी इतका मोठा ऊस कसा खाऊ? मला याचे तुकडे करून द्या. 

सेवकाने त्याचे छोटे तुकडे केले. परत बिरबल रडायला लागला. “फार छोटे तुकडे केले, मला थोडे मोठे तुकडे हवे होते.”

अकबराने बिरबलाला सांगितले “काही होत नाही बेटा, आपण दुसरी कांडी घेऊन तिचे थोडे मोठे तुकडे करू. मग झालं ना?”

बिरबल म्हणाला “नाही नाही, मला दुसरी कांडी नाही ह्याच कांडीचे थोडे मोठे तुकडे हवे होते.”

अकबराने समजावुन सुद्धा बिरबल ऐकेना. आता अकबराची सहनशक्ती संपली. तो ओरडला. “बिरबल, बस झाला हा वाह्यातपणा, आता शांत हो नाही तर चाबकाचे फटके देईन.”

बिरबल रडायचं थांबला आणि लगेच नेहमीच्या आवाजात अकबराला म्हणाला “पाहिलंत खाविंद, मुलांना सांभाळणं एवढं सोपं नसतं. तुम्ही तर एका लहान मुलाला, खोटा का असेना, चाबकाचे फटके मारायला निघालात.” 

अकबर शांत झाला. “बरोबर आहे बिरबल, मला वाटलं तेवढं हे सोपं नाही. आता हे खेळणे आणि ऊस घरी घेऊन जा तुझ्या मुलासाठी. त्याच्या बाबाला आम्ही दरबाराच्या कामात अडकवुन ठेवतो म्हणुन. 

आम्हाला तुझी आजची अडचण समजली. पण तरीही दरबारात पुन्हा उशीर करू नकोस. आपल्या खाजगी कारणासाठी प्रजेला खोळंबुन ठेवणं बरोबर नाही. आपल्या मुलाशी जरा लवकर खेळ आणि दरबाराच्या वेळेच्या आधीच त्याची समजूत काढुन लवकर निघत जा.”

बिरबलानेही ते मान्य केले आणि अकबराचा निरोप घेऊन घरी गेला.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

This Post Has 2 Comments

  1. Maya Danake

    खूप छान असतात गोष्टी

  2. Vishwanath Pawar

    What we say in English?

प्रतिक्रिया व्यक्त करा