You are currently viewing हनुमान जन्म

हनुमान जन्म

हनुमान हा भगवान श्रीरामांचा निष्ठावान सेवक. हनुमान आपल्या असीम भक्ती, अफाट शक्ती, विनम्रता अशा अनेक गुणांसाठी पुजला जातो. 

हनुमानाच्या जन्माची कथा श्रीरामांच्या जन्माशी निगडित आहे. हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते. अंजनी आपल्याला मुल व्हावे म्हणुन महादेवाची पूजा करत होती. 

अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या हे सुद्धा आपल्याला मुल व्हावे म्हणुन देवाची प्रार्थना करत होते. त्यांनी आपल्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे पुत्रकामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाचा प्रसाद म्हणुन तिन्ही राण्यांना देवाकडुन फळ मिळाले. 

राणी कैकेयीच्या हाती आलेले फळ एक घार घेऊन पळाली. पण उडताना तिच्या हातुन ते दिव्य फळ निसटले. हेच फळ वाऱ्याने अंजनीच्या हातात पडले. आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले फळ तिने देवाचा प्रसाद म्हणुन श्रद्धेने ग्रहण केले. अयोध्येत सुमित्रेने आपले फळ कैकेयीसोबत वाटून खाल्ले. 

त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येत तिन्ही राण्या आणि अंजनी या सर्वांना मुले झाली. 

केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला, त्याचे नाव ठेवले मारुती. मरुत म्हणजे वारा किंवा वायु. वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले, त्यामुळे मारुतीला वायुपुत्र असेही म्हणतात. 

शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती, रुद्रावतार असल्याचीही श्रद्धा आहे. 

मारुती अत्यंत शक्तिशाली होता. एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्यबिंब पाहुन मारुतीला ते सुंदर पिकलेले फळ वाटले आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. त्याला अडवायला देवांचा राजा इंद्र याला आपले वज्र वापरावे लागले. या वज्रप्रहाराने मारुतीच्या हनुवटीला लागले आणि ती थोडी वाकडी झाली. त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमान असेही पडले. 

मारुतीची अनेक नावे किंवा बिरुदे आहेत आहेत. केसरीचा मुलगा म्हणुन केसरीनंदन, अंजनीचा मुलगा असल्यामुळे आंजनेय, वायूच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र. बजरंग, हनुमंत हि इतर नावे सुद्धा आहेत. 

श्रीराम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना सीतेला राक्षस राजा रावणाने पळवुन लंकेला नेले. श्रीराम, लक्ष्मणाची सीतेच्या शोधात असताना हनुमानाशी भेट झाली. इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेणे, रावणाशी लढाई, आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासुन सेवा केली. 

त्यामुळे सहसा जिथे रामाची मंदिरे आहेत तिथे त्यांच्या बाजूला हात जोडलेला हनुमान असतोच. त्याला भक्तांचा शिरोमणी म्हटले जाते. 

हनुमान चिरंजीव म्हणजेच अमर आहे. त्यामुळे असे म्हणतात तो आजही जिवंत आहे आणि लोकांना बळ देतो. जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून जातो अशी श्रद्धा आहे. 

हनुमानाच्या अतुलनीय बळामुळे त्याला बळाची देवता मानले जाते. 

जेव्हा मुस्लिम राज्यकर्ते भारतात येऊन इथल्या हिंदू जनतेवर अत्याचार करत होते, तेव्हा हिंदूंमध्ये त्यांच्याशी लढण्याचे सामर्थ्य यावे म्हणुन समर्थ रामदासांनी हनुमानाच्या म्हणजेच बळाच्या उपासनेला प्रोत्साहन दिले. विविध ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. 

आजही कुस्तीच्या आखाड्यांमध्ये हनुमानाची मूर्ती सहसा असते. पहिलवान हनुमानाला नमन करूनच कुस्ती खेळतात, तयारी करतात. 

चैत्र पौर्णिमेला हनुमानाची जयंती साजरी होते. हनुमानाच्या मंदिरांमध्ये त्याची विशेष पूजा होते. मोठ्या संख्येने लोक हनुमानाच्या दर्शनाला जातात. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा