You are currently viewing पाचा देवांची कहाणी

पाचा देवांची कहाणी

पाची देवांनो, तुमची कहाणी ऐका. 

एकदा ईश्वर-पार्वती पृथ्वि-प्रदक्षिणा करण्यास निघाली. 

मुक्कामी उतरली, तेव्हा पार्वती पादसेवा करत असता तिचे हात कठीण लागले. 

एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केल्यास तुझे हात मऊ होतील, असे सांगितले. 

पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केले. 

ती उतराई होऊन पार्वतीला म्हणाली, “तू माझी माय-बहीण आहेस. मला काही वसा सांगतेस का ?” 

तेव्हा पार्वतीनं कोणता वसा सांगितला ? 

चातुर्मासात आखाडी दशमीस गणपतीची पूजा करावी. दूर्वा वाहाव्यात, मोदकाचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी. 

कार्तिकी दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून वशाचं उद्यापन करावं. अशीच विष्णूची पूजा करून तुळशीपत्र वाहावं, खिरीचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी. 

कार्तिकामध्ये ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसेच नंदीला स्नान घालून आघाड्याचं पान वाहावं. खिचडीचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी. ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. 

त्याप्रमाणे महादेवाला स्नान घालून बेलाची पानं वाहावीत. दहीभाताचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरावी. ब्राह्मणास जेवावयास घालून उद्यापन करावं. 

तसेच, पार्वतीला स्नान घालावं. पांढरी फुलं वाहावीत, घारगेपुऱ्यांचा नैवेद्य दाखववा आणि कार्तिकात ब्राह्मणास भोजन देऊन उद्यापन करावं. 

हा वसा कधी घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा. कार्तिकी दशमीस संपूर्ण करावा,” असा वसा सांगून पार्वती अदृश्य झाली. 

बऱ्याच दिवसांनंतर पार्वतीनं गरिबाचा वेष घेतला व त्या बाईला भेटायला गेली; पण तिनं पार्वतीला ओळखलं नाही. पार्वतीला खूप राग आला. 

तिने गणपतीकडे जाऊन सांगितले, “ती उतली आहे, मातली आहे. तिचं वैभव काढून टाक.” पण गणपती म्हणाला, ही गोष्ट माझ्याकडून घडणार नाही. ती उतायची नाही, मातायची नाही, तिनं माझी चार महिने पूजा केली. दूर्वा वाहिल्या. मोदकांचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरली. मी काही तिचं वैभव काढू शकत नाही.” 

हे ऐकताच पार्वती विष्णूकडे गेली. सगळी हकीगत सांगून तिचं वैभव काढून घेण्यास सांगितलं. तेव्हा विष्णूंनी सांगितले, “ती उतायची नाही, मातायची नाही. मी तिचे वैभव काढून घेणार नाही. कारण, तिनं माझी चार महिने पूजा केली. तुळशीपत्र वाहून खिरीचा नैवेद्य दाखवला. वर तुपाची धार धरली.”

पार्वती नंदीकडे गेली. सगळी हकीगत सांगितली व तिचं वैभव काढून घेण्यास सांगितले. पण नंदी म्हणाला, “तिनं माझी चार महिने पूजा केली. आघाड्याचं पान वाहिलं. खिचडीचा नैवेद्य दाखवून वर तुपाची धार धरली. मी काही तिचं वैभव काढणार नाही.”

पार्वती महादेवाकडे आली व म्हणाली, “ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाका.” महादेव म्हणाले, “तिने माझी चार महिने पूजा केली. बेलाची पानं वाहिली. दहीभाताचा नैवेद्य दाखविला. वर तुपाची धार धरली. मी काही तिचं वैभव काढणार नाही. तुझ्या गरिबाच्या वेषामुळे ती तुला ओळखू शकली नाही. पहिल्या वेशात गेलीस, तर निश्चित ओळखेल.”

पार्वती पुन: श्रीमंती वेषानं गेली. त्या स्त्रीने तिला बसायला दिला, पाय धरले व आभार मानले. मग पार्वतीने प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद दिला. जसे तिला पाची देव प्रसन्न झाले, तसे तुम्हां-आम्हां होवोत. 

ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.  

प्रतिक्रिया व्यक्त करा