पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो, पापे वाढतात तेव्हा तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतार असे मानले जाते. पुराणांमध्ये भगवान विष्णूंचे दशावतार म्हणजे दहा अवतार सांगितले आहेत. त्यापैकी सातवा अवतार म्हणजे श्रीराम.
रामायण हे महर्षी वाल्मिकींनी रचलेले भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचे असलेले महाकाव्य भगवान श्रीरामांच्या आयुष्यावर आधारित आहे.
त्यांच्या जन्माची कथा अशी:
अयोध्येचे पराक्रमी राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या. कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. त्यांना मुल नसल्यामुळे ते दुःखी होते. आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला.
या यज्ञात अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिन्ही राण्यांसाठी एक असे प्रसाद म्हणुन तीन फळे दिली. कौशल्या राणी सर्वात मोठी असली तरीही कैकेयी हि दशरथ राजाची सर्वात प्रिय राणी होती. त्यातले सर्वात मोठे सुंदर फळ आपल्यालाच आधी पराक्रमी पुत्र व्हावा म्हणुन पटकन कैकेयीने घेऊन टाकले. कौशल्या आणि सुमित्रेनेही उरलेली फळे घेतली.
पण एका घारीने झडप घालत कैकेयीच्या हातचे फळ पळवुन नेले. (ह्याच फळामुळे हनुमानाचा जन्म झाला)
तोपर्यंत कौशल्येने आपले फळ घेऊन खाऊन टाकले होते. कैकेयीला दुःखी झालेले पाहुन सुमित्रेने मोठ्या मनाने आपले अर्धे फळ कैकेयीला दिले.
देवाच्या कृपेने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या. आणि सर्वांना पराक्रमी पुत्र झाले. कौशल्येचा मुलगा सर्वात मोठा, त्याचे नाव ठेवले श्रीराम.
कैकेयीच्या मुलाचे नाव ठेवले भरत. आणि सुमित्रेला जुळी मुले झाली, त्यांची नावे ठेवली लक्ष्मण आणि शत्रुघ्न.
असे म्हणतात कि तिन्ही राण्यांना फळ मिळूनही कैकेयीच्या मनात लोभ असल्यामुळे तिचे फळ पळवुन नेले गेले, आणि सुमित्रेने आपल्याला मिळालेल्या एकाच फळातून कैकेयीला अर्धे देण्याचा उदारपणा दाखवल्यामुळे तिला अर्धे फळ खाऊनही एकाऐवजी दोन पुत्ररत्ने प्राप्त झाली.
या चारही भावंडांमध्ये एकमेकांबद्दल खुप प्रेम होते. पण त्यातही राम लक्ष्मण, आणि भरत शत्रुघ्न अशा अतुट जोड्या होत्या. चौघेही पराक्रमी होते. पण श्रीराम हे साक्षात भगवान विष्णुचा अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक असूर राक्षसांचा संहार केला. रावणासारख्या अत्याचारी राक्षसाचाही विनाश केला.
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला. त्यामुळे हा दिवस राम नवमी म्हणुन ओळखला जातो. रामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवुन (उत्तर भारतात बाल रामाला “राम लल्ला” असं प्रेमाने म्हणतात) त्यांचा जन्म साजरा करत त्यांच्या बाल रूपात पूजा केली जाते.
रामाचा जन्म म्हणजे राम नवमी, रामाने रावणाला मारल्याचा दिवस म्हणजे दसरा, राम अयोध्येत परतले तेव्हा दिवाळी, आणि रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असे रामाच्या आयुष्यातले सर्व महत्वाचे क्षण आपण साजरे करतो इतका त्यांचा भारतीय संस्कृतीवर आणि लोकांवर पगडा आहे.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take