You are currently viewing गुरु अर्जुनदेव

गुरु अर्जुनदेव

गुरु अर्जुनदेव हे शिखांचे पाचवे धर्मगुरू होते. पंजाबी लोक अर्जुन याच नावाचा अर्जन असा उच्चार करतात. त्यामुळे यांनाच गुरु अर्जन म्हणुन सुद्धा ओळखतात. त्यांचा जन्म १५-एप्रिल-१५६३ रोजी गोइंदवाल गावी झाला. 

त्यांचे पूर्ण कुटुंब शिखांच्या गुरु परंपरेत अग्रस्थानी होते. त्यांचे वडील भाई जेठा, हे पुढे जाऊन शिखांचे चौथे गुरु बनले. त्यांची आई माता भानी हि शिखांचे तिसरे गुरु अमरदास यांची सुपुत्री होती. 

त्यांना प्रिथिचंद आणि महादेव असे दोन मोठे भाऊ होते. शीख धर्म तेव्हा पंजाब भागात लोकप्रिय होत होता. अनेक अनुयायी त्यांना येऊन मिळत होते. त्यामुळे लहानपणापासुन सर्व भावंडे धार्मिक वातावरणातच वाढली. 

शिखांमध्ये गुरुची सेवा, गुरुद्वाऱ्यात मिळेल ते काम करणे ह्याला फार महत्व आहे. अर्जुनदेव सुद्धा त्यांच्या गुरूच्या (म्हणजे वडिलांच्याच आखाड्यात) अशीच मनापासुन सेवा करायचे. त्यांना गुरु नेहमी भांडी घासण्याचे काम द्यायचे. 

इतक्या मोठ्या संख्येने लोक येत असल्यामुळे फार भांडी घासायला पडत. अर्जुनदेव यांना भांडी घासता घासत मध्यरात्र होत असे. पुन्हा दुसऱ्या दिवशी भांड्यांचा ढीग जमा व्हायचा. पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. 

इतर भक्तगण गुरूंसोबत अध्ययन, भजन, इत्यादी धार्मिक कार्यामध्ये गुंतलेली असत. अर्जुनदेवांना तिकडे फारसे जायला मिळायचे नाही, पण ते नाराज झाले नाहीत. 

बाकी लोकांना वाटायचे गुरुदेव अर्जुनला भांडी घासण्याच्याच लायकीचा समजतात म्हणुन त्याला ते दुसरं कोणतं काम देत नाहीत, आपल्याजवळ बसवत नाहीत. पण उलट गुरु रामदास अर्जुनदेवाला सच्चा भक्त समजत. त्यांची गादी तोच पुढे चालवेल असा त्यांना विश्वास होता. त्यांनी आपला गुरुपदाचा वारसदार अर्जुनदेव होईल हे लिहुन ठेवले होते पण कोनाला सांगितले नव्हते. 

त्यामुळे त्यांचे निधन झाल्यावर जेव्हा लोकांना अर्जुनदेव हे वयाच्या फक्त अठराव्या वर्षी पुढचे गुरु म्हणुन निवडले गेले आहेत हे समजले तेव्हा धक्काच बसला. बहुतांश लोकांनी हा आधीच्या गुरूचा आदेश मानुन अर्जुनदेवांना गुरु म्हणुन स्वीकारले. 

पण काही लोकांना हे मान्य नव्हते. त्यात स्वतः प्रीथीचंद ह्या अर्जुनदेवांच्या मोठ्या भावाचा समावेश होता. प्रीथीचंद यांनी आपल्या समर्थकांना सोबत घेऊन एक नवा पंथ काढला. शिखांचे तिसरे गुरु अमरदास यांचे मुलगे बाबा मोहन यांनी सुद्धा आपला एक पंथ काढला. त्यांनी अर्जुनदेवांना आव्हान द्यायला चालु केले. 

ह्या पंथांनी गुरु नानकांची जुनी पोथी, आधीच्या गुरूंनी दिलेल्या श्लोकांची खरी पुस्तके आपल्याजवळच आहेत आणि आम्ही म्हणतो तोच खरा शीख धर्म असा प्रचार सुरु केला. 

तोवर शिखांच्या गुरूंनी दिलेली शिकवण, त्यांचे विचार हे पद्धतशीरपणे संकलित केलेलं नव्हते. त्यामुळे साधे भोळे भाविक भरकटण्याची, त्यांना चुकीची शिकवण मिळणे, गैरसमज होण्याची शक्यता होती. 

त्यामुळे अर्जुन देवांनी आधीच्या सर्व गुरूंच्या कार्याचा अभ्यास केला. त्यांनी लिहिलेले श्लोक एकत्र केले. जे श्लोक चुकीचे वाटले, इतर लोकांनी मध्ये घुसवलेले, किंवा मुद्दाम अपप्रचार करण्यासाठी लिहिलेले असे श्लोक वगळले. इतर हिंदू संत आणि मुस्लिम संत यांच्याही विचारांचा अभ्यास केला. 

ह्या सर्व अभ्यासाचा परिपाक म्हणून त्यांनी शिखांचा पहिला अधिकृत धर्मग्रंथ “आदी ग्रंथ” लिहिला. १६०४ मध्ये त्यांनी तो अमृतसरच्या हरमंदिर साहिब गुरुद्वाऱ्यामध्ये स्थापन केला. ह्याच धर्माचा पुढे विस्तार होऊन “गुरु ग्रंथसाहिब” तयार झाला. ह्यातल्या श्लोकांपैकी अर्ध्याहुन अधिक श्लोक एकट्या गुरु अर्जुनदेवांनी लिहिले आहेत. 

त्यांनी शिखांना आपल्या उत्पन्नाच्या एक दशांश हिस्सा शीख धर्मसंस्थेला अर्पण करण्यासाठी प्रवृत्त केले. ह्याच निधीतुन गुरुद्वाऱ्याची बांधणी, त्यातली पूजा अर्चा, लंगर, भाविकांची सेवा असे होत असे. अर्जुनदेवांनी अनेक शीख धार्मिक वास्तू बांधल्या, त्यांचा विकास केला. 

शिखांचा उत्तर भारतातला वाढता प्रभाव मोगलांच्या डोळ्यात भरत होता. हाच समुदाय एक होऊन आपल्या सत्तेला आव्हान देईल असे त्यांना वाटत होते. मोगल बादशाह जहांगीरच्या आदेशावरून गुरु अर्जुनदेव यांना अटक झाली. 

त्याने अर्जुनदेवांना आपला धर्म सोडुन इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. शिखांच्या गुरुनेच असे केले असते तर त्या पंथाचे अस्तित्व संपले असते. अर्जुनदेवांनी यास ठाम नकार दिला. त्यामुळे त्यांना छळ करून ३० मे १६०६ रोजी देहदंड देण्यात आला. 

अशा प्रकारे शहिद होणारे ते पहिले शीख धर्मगुरू ठरले. त्यांच्या मृत्यूमुळे शीख समाज पुढील काळात सैनिकी मार्गावर वळला. त्यांचे पुत्र हरगोविंद हे पुढचे सहावे गुरु झाले. त्यांनी आपल्या वडिलांचे कार्य पुढे चालु ठेवले. त्यांनी आणि पुढच्या गुरूंनी आपल्या धर्माची संस्कृतीची रक्षा करण्यासाठी सशस्त्र होऊन लढण्यासाठी शिखांना प्रोत्साहन दिले. 

अर्जुनदेवांची पुण्यतिथी शिखांच्या नानकशाही दिनदर्शिकेनुसार ज्या दिवशी येते तेव्हा “शहीदि दिवस” पाळतात. आज अर्जुन देवांच्या जन्मस्थळी गुरुद्वारा चौबारा साहिब येथे त्यांचे स्मारक आहे. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा