You are currently viewing दानशूराची विनम्रता

दानशूराची विनम्रता

अब्दुल रहीम खान-ई-खानान (खानांचे खान) हे अकबराच्या काळातले प्रसिद्ध कवि होते. त्यांना नुसत्या रहीम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यांचे दोहे प्रसिद्ध आहेत. 

ते अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होते. ते सढळ हस्ते गोरगरिबांना दानधर्म करत असत. 

दान देताना त्यांची एक विचित्र पद्धत होती. दान देताना ते कधीच दान घेणाऱ्यांच्या डोळ्यात पाहत नसत. स्वतः खाली बघत ते दान देत असत. 

त्यांच्या ह्या पद्धतीबद्दल तुलसीदासांना कळले. “रामचरितमानस”साठी प्रसिद्ध असलेले तुलसीदास हे त्यांचे समकालीन होते. 

तुलसीदासांनी रहीम यांना एका पत्रात खालील ओळी लिहुन पाठवल्या. 

ऐसी देनी देंन ज्यूँ, कित सीखे हो सैन
ज्यों ज्यों कर ऊंच्यो करो, त्यों त्यों निचे नैन

अर्थ: दान देताना हात उंच पण नजर खाली अशी हि अनोखी पद्धत तुम्ही कुठे शिकलात?

रहीम यांनी त्यांना खालील ओळी लिहुन उत्तर पाठवले. 

देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन
लोग भरम हम पर करे, तासो निचे नैन

अर्थ: देणारा कोणीतरी वेगळाच आहे. तो दिवस रात्र काहीतरी पाठवत राहतो. लोकांना भ्रम होतो कि देणारा मी आहे म्हणुन मी मान खाली घालुन पाहतो. 

एका दानशुर कविचे दुसऱ्या कविने कवितेत केलेले कौतुक आणि त्याला त्या कवीने कवितेतच दिलेले उत्तर, यामागची भावना किती सुंदर आहे. 

जेव्हा आपण दुसऱ्यांची मदत करतो तेव्हा आपल्या मनात अहंकार डोकावतो कि मी किती छान कार्य करतोय, पण हे विसरतो कि आपल्याला हि क्षमता देणारा तो ईश्वरच असतो. त्याची इच्छा असते कि आपल्यापेक्षा कठीण परिस्थितीमध्ये असणाऱ्यांना मदत मिळावी म्हणुन आपल्याहस्ते मदत होते. आपण फक्त निमित्त असतो. 

गेल्या वर्षी पासून लॉकडाऊन झाले आणि अनेक गरिबांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. हि गोष्ट कौतुकास्पद आहे. 

पण त्यातल्या अनेकांनी अन्नधान्य, कपडे इत्यादी वस्तु गरजवंतांना देताना त्यांना कॅमेऱ्यात बघायला सांगुन फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. 

यावर प्रचंड टीका झाली. काही अपवाद वगळता अशी मदत घ्यावी लागणे हा बहुतेकांच्या आयुष्यातला फार कठीण प्रसंग असतो. त्यांच्या स्वाभिमानाला मुरड घालुन त्यांना हे करावं लागतं. अशा वेळेस त्यांना फोटो काढायला लावुन तो क्षण आपल्या प्रोफाईलवर साजरा करणे हे त्यांच्यासाठी आणखी अपमानकारक असतं. 

अशावेळेस गरजूला मदत करताना स्वतः मान खाली घालुन बघणाऱ्या रहीमकडुन फार शिकण्यासारखे आहे. 

आपल्याकडे एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला कळु नये अशी शिकवण आहे. हे एक टोक झाले. आपण केलेल्या मदत कार्याची माहिती इतरांना देणे याचे अनेक फायदे सुद्धा असतात. 

आपल्यातल्या अनेकांना काही तरी चांगलं काम करण्याची इच्छा असते, त्यात हातभार लावण्याची इच्छा असते. पण त्यांना पुरेशी माहिती नसते, कशी मदत करावी याची खात्री नसते. 

त्यांना आपल्यातल्या कोणी चांगले काम करतोय हे पाहिल्यावर प्रेरणा मिळते, माहिती मिळते, आणि त्यांचा पाठिंबा मिळतो. त्यासाठी अशी माहिती पसरवणे हि चांगली गोष्ट आहे. 

पण हे करताना गरजवंतांना अपमानकारक असे काही आपल्या हातून होऊ नये याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा