हिंदू धर्मात असे मानतात कि एखाद्याच्या पूर्वजांच्या तीन आधीच्या पिढ्यांचे आत्मे पितृलोकामध्ये राहतात. पितृलोक हे
स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील एक क्षेत्र असते ज्यावर यमाचा अधिकार असतो.
म्हणजे समजा आता एखादा क्ष नावाचा व्यक्ती पृथ्वीवर जिवंत असेल तेव्हा त्याचे वडील, आजोबा आणि पणजोबा या पिढीतील आत्मे या पितृलोकात असतील. जेव्हा क्ष मरण पावेल आणि त्याचा आत्मा या पितृलोकात येईल तेव्हा त्याच्या पणजोबाच्या पिढीतील आत्मे आपापल्या कर्मानुसार जे देवाने ठरवले असेल त्यानुसार स्वर्गात जातील, मोक्ष प्राप्त करतील.
जेव्हा लोक श्राद्ध कर्म करतात तेव्हा त्यावेळी पितृलोकात असणाऱ्या केवळ तीन पिढ्यांनाच श्राद्ध संस्कार दिले जातात.
हे संस्कार पितृलोकात राहिलेल्या आत्म्यांचे दु:ख कमी करतात. काही आत्म्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच दुसरा जन्म घेतला, तर श्राद्ध त्यांच्या नवीन जन्माच्या आनंदात भर घालते.
पितृ पक्षाच्या सुरुवातीला सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो आणि आत्मे पितृलोक सोडतात आणि सूर्य पुढील राशीत प्रवेश करेपर्यंत – वृश्चिक आणि पौर्णिमा येईपर्यंत एक महिना त्यांच्या वंशजांच्या घरी राहतात. त्यामुळे पक्ष पंधरवड्यामध्ये हिंदू लोक पूर्वजांचे पालनपोषण करण्यासाठी श्राद्ध कर्म करून अन्नाचा नैवेद्य दाखवतात.
यासंदर्भातील एक कथा अशी आहे:
दानशूर कर्णाचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात गेला. तिथे गेल्यावर त्याला प्रचंड भूक लागली, पण त्याने जे जे अन्न स्पर्श केले ते लगेच सोन्यात रूपांतरित व्हायला लागले.
ह्यावर मार्ग काढण्यासाठी कर्ण आणि सूर्य इंद्राकडे गेले आणि त्याला या घटनेचे कारण विचारले. इंद्राने कर्णाला सांगितले की, त्याने आयुष्यभर सोने दान केले, पण श्राद्धात आपल्या पितरांना कधीही अन्नदान केले नाही. त्यामुळे पितृलोकात अडकलेल्या कुरु पूर्वजांनी त्याला शाप दिला.
कर्णाने सांगितले की, त्याला त्याच्या वंशाविषयी माहिती नसल्याने त्याने त्यांच्या स्मरणार्थ कधीही काहीही दान केले नाही.
मग यावर उपाय करण्यासाठी, कर्णाला 15-दिवसांच्या कालावधीसाठी पृथ्वीवर परत येण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून तो त्यांना श्राद्ध करू शकेल आणि त्यांच्या स्मरणार्थ अन्न आणि पाणी दान करू शकेल.
हा काळ आता पितृपक्ष किंवा पक्ष पंधरवडा म्हणून ओळखला जातो.