You are currently viewing चहा

चहा

चहा. ज्यांना चहा फार आवडतो, त्याची सवय असते त्यांना चहाचं नाव काढलं तरी छान वाटतं आणि ते स्वतः उठसूट चहाचं नाव काढत राहतात. माझं कुटुंब फार चहाप्रेमी आहे (मी सोडून, मी कधीतरीच पितो), त्यामुळे मी चहाचं वेड फार जवळून पाहिलंय.

सकाळी उठल्या उठल्या, थोडं आवरल्यावर, जेवल्यावर थोड्यावेळाने, चार वाजता, कोणी आलं म्हणून, कधी आलं घालून, ऑफिसातून आल्यावर, फार आवराआवरी झाल्यावर, बाहेरून आल्यावर, बाहेर जाण्याआधी असं कधीही आमच्याकडे चहा पितात. उठसूट चहाची फर्माईश होते, मग तू कर, तुझ्याच हातचा प्यायचाय, तुझा फारच छान असतो, फार दिवस झाले हिच्या हातचा नाही पिला, आज मी नाही करणार, आज ह्यांनाच सांगा चहा करून मला पाजायला, अशी एकमेकांना विनंती, खुशामत, विनंतीवजा आदेश असं सुरु असतं.

दुसरं एक आईस्क्रीम सुद्धा फार आवडत सगळ्यांना पण घरातले कट्टर चहा पिणारे आईस्क्रीम कुल्फी खाऊन त्यावर सुद्धा काही मिनिटात चहा हवा म्हणतात.

सध्या जी अमृततुल्य दुकानांची लाट निघाली आहे त्यात एक वाक्य लिहिलेलं असतं. चहाची वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो. ते आमच्याच घरी पाहून बनवलं असेल कारण आमच्या घरी प्रत्येक वेळेला चहा लागतो.

आमच्या घरासारखी भारतात असंख्य कुटुंबे असतील जिथे चहा नेहमी पिला जातो. चहाचं सुद्धा व्यसन असतं. हा चहा भारतात इतका लोकप्रिय आहे कि आता आपल्या संस्कृतीचा भाग झाला आहे.

घरी आलेल्या पाहुण्यांचा बाकी काही होवो न होवो पण किमान चहाने पाहुणचार होतोच होतो. चहापाणी (हिंदीत चायपानी) हा एक रुळलेला वाक्प्रचार झाला आहे. जरा ह्यांच्या चहापाण्याचं बघा, त्यांच्याकडे आम्हाला साधं चहापाणीसुद्धा विचारलं नाही अशा अनेक अर्थाने आपण तो वापरतो. भ्रष्टसंस्कृती मध्ये सुद्धा उघड उघड लाच न मागता आमच्या चहापाण्याचं तेवढं बघा असं आडून मागतात.

घरात किती काम येत याच एक प्रमाण सुद्धा चहाच आहे. मला चहा करता येतो, ह्याला चहासुद्धा करता येत नाही, बाकी काही नाही पण मी चहा फार छान करतो, बाकी स्वयंपाक छान आहे पण चहाला काही मजा नाही, अशा वाक्यातून आपल्या कौशल्याची पातळी दर्शवली जाते.

चहा पिऊन आपल्याला तरतरी येते. त्यामुळे कोणी जरा थंड पडलं असेल, पटापट काम करत नसेल तर अरे जरा चहा पाजा ह्याला असं म्हणतात.

भारतातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, प्रत्येक रस्त्यावर बाकी खाण्यापिण्याची सोय असो नसो, चहाच्या टपऱ्या असतातच आणि त्यावर वर्दळ असतेच. कटिंग चाय, स्पेशल चाय, गोल्डन चाय हे खास टपऱ्यांवरचे प्रकार. आणि अशात तंदुरी चहा आणि बासुंदी चहा असेसुद्धा प्रकार आलेत.

भारताबाहेरसुद्धा चहा आधीपासून लोक पीत असले तरी आपण बनवतो तसा पाणी दूध चहा पावडर/मसाला, साखर, आलं हे सगळं घातलेला चहा सुद्धा लोकप्रिय झालेला आहे. तिथल्या टी/कॉफी हाऊसेस मध्ये चाय टी, चाय लाटे, मसाला चाय अशा नावांनी तो मिळतो.

हा चहा मूळचा चीनमधला आहे आणि तो आपल्याकडे इंग्रजांनी आणला असं म्हणतात हे पूर्णतः सत्य नाही.

चहा आपल्याकडे आधीपासून होता पण आतासारखं एक सहज प्यायचं पेय म्हणून तो घेत नव्हते. मुख्यतः आयुर्वेदातल्या औषध, काढे ह्यांच्यात तो घेत असत. काही औषधे फार कडू किंवा तीव्र असतात ती घ्यायला मदत व्हावी म्हणून त्यात चहा घालायचे. भारतात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या नोंदींमध्ये तसे उल्लेख आहेत.

आसाममध्ये चहा नैसर्गिकरित्या अनेक शतकांपासून उगवतो. तिथली सिंगफो नावाची जमात आधीपासून नियमितपणे चहाचे सेवन करत असे.

चहा एक पेय म्हणून प्यायची सुरुवात मात्र चीन मधेच झाली. ती कशी सुरू झाली याच्या वेगवेगळ्या लोककथा आहेत.

एका राजासाठी प्यायला म्हणून पाणी उकळत ठेवलं होतं. त्यात जवळच्या झाडाची पाने येऊन पडली आणि पाण्याला वेगळाच रंग आणि चव आली. राजाला ते पाणी पिऊन छान वाटलं आणि चवही आवडली. त्याने ते झाड बघून त्याचा अभ्यास केला आणि चहाला सुरुवात झाली.

दुसरी कथा अशी आहे कि एकदा एक माणूस जंगलात हरवला होता. त्याला फार भूक लागली होती. जवळ फळांची सुद्धा झाडे नव्हती. तो फार थकला होता. त्याने आसपासच्या झाडांची पाने खाऊन बघायला सुरु केलं. त्यात त्याला चहाची पाने खाऊन तरतरी आली. त्याला जरा बरं वाटलं. त्याने ती पाने सोबत नेली आणि पाण्यात टाकून प्यायला सुरु केली.

चहा मग तिथून चहा बुद्ध भिक्खुंद्वारे जपान कोरिया सारख्या दक्षिण पूर्वेतल्या आशियायी देशांमध्ये पसरला. पोर्तुगीज आणि युरोपीय व्यापाऱ्यांद्वारे सोळाव्या शतकानंतर युरोपात पसरला. सतराव्या शतकात हे पेय इंग्लंडमध्ये फार लोकप्रिय झाले. चिनी भाषेत याला टी किंवा चा म्हणतात, त्यावरूनच टी, चाय, चहा अशी इतर भाषेतली नावे आली.

सुरुवातीला आयात करूनच मिळत असल्यामुळे जवळपास सर्व ठिकाणी चहा आधी उच्चवर्गीयात रूढ झाला. मग जशी उपलब्धता वाढली तसतसा तो तिथल्या सामान्य लोकांमध्ये सुद्धा पसरला.

चहा हे ब्रिटिशांचे अतिशय आवडते पेय. आणि ते त्यांना फक्त चीनमधून मिळत असे. इंग्लंडमध्ये सुरुवातीला जितका चहा वापरला जात असे तो बहुतांश चीनमधून आयात केलेला असे. ब्रिटिश भारतात आले तेव्हा चीनची चहामधली मक्तेदारी संपवायचा प्रयत्न करत होते.

नुकताच आसामचा ताबा ब्रिटिशांना मिळाला होता त्यामुळे तिथे चहाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे त्यांचे बेत होते. त्यांनी चीनमधून लपून छपून आणलेला चहा आसाममध्ये, बंगालमध्ये दार्जिलिंगच्या भागात लावायला सुरु केले.

तेव्हा आसामच्या राजदरबारात आणि ब्रिटिशांच्या सेवेत उच्चपदावर काम करणाऱ्या मणिराम दत्त बरुआ यांनी त्यांना चहा तर आमच्या जंगलात पण उगवतो, आमच्याकडे आदिवासी नेहमी पितात असे सांगून आसामचा स्थानिक चहा दाखवला.

चीनमधून आणलेला चहा दार्जिलिंग मध्ये चांगला रुजला पण आसाम मध्ये मात्र आसामचा स्थानिक चहाच जास्त चांगला रुजला. आजही जो चहा दार्जिलिंग टी म्हणून ओळखला जातो तो मूळच्या चीनच्या जातीचा आहे आणि आसाम टी हा भारतातीलच जातीचा आहे.

इंग्रजांनी आपल्या सत्तेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर चहाचे मळे तयार केले. स्थानिकांना चहाची शेती करायला भाग पाडले. हा चहा इंग्लंड आणि युरोपात निर्यात करून तिथली चीनची मक्तेदारी मोडून काढली. इंग्रज लोक आपल्या स्वतःच्या साम्राज्यातील चहा म्हणून आवर्जून भारतातला चहा घ्यायला लागले.

आसामचा चहा दाखवणारे मणिराम बरुआ यांनीं स्वतः सुद्धा चहाचा मळा सुरु केला. तसे करणारे ते पहिले भारतीय ठरले.

लवकरच भारतात निर्यातीसाठी लागत होतं त्यापेक्षा चहाचं उत्पादन व्हायला लागलं. मग चहा भारतात सुद्धा विकला जावा म्हणून त्यांनी चहाची प्रसिद्धी सुरु केली.

ब्रुक बॉण्ड सारख्या कंपन्यांनी गावे आणि शहरांमध्ये घोडागाडीतून फुकट चहाचे वाटप केले. कारखान्यांना आपल्या कामगारांना टी ब्रेक द्यायला उद्युक्त केले.

हळू हळू चहा भारतीय लोकांमध्ये लोकप्रिय झाला. इंग्रज लोक चहा पिताना उकळलेलं पाणी, दूध, साखर, चहापत्ती असं सगळं वेगळं ठेवून पितानाच आपल्या पसंतीने एकत्र करून पीत असत. आपण जे इतर सर्व पदार्थांचं करतो तेच आपण चहासोबत केलं. म्हणजेच भारतीयीकरण केलं. आपण सगळं एकत्र करून बनवण्याची पद्धत सुरु केली. आपल्याकडे असाच चहा लोकांना आवडायला लागला.

मी एकदा एक गमतीशीर किस्सा वाचला होता. एक चिनी मुलगी भारतात काही कामानिमित्त आली होती. तिला तिच्या कंपनीतल्या एका भारतीय मुलीने घरी बोलावले. सुरुवातीला चहा विचारला, आणि ती हो म्हणल्यावर तिला करून दिला.

तिला तो चहा फार आवडला पण चहा आहे कळले सुद्धा नाही. तिला तोच चहा आहे हे सांगितल्यावर ती चमकली. तिने विचारले मग यात दिसला कसा नाही चहा? तिने स्वयंपाक घरात येऊन चहा केलेलं पातेलं बघितलं, त्यात उरलेली चहा पावडर पाहिली तेव्हा तिचा विश्वास बसला.

तिने विचारले हा काही खास प्रकारचा चहा आहे का, कि जो पाहुणे आल्यावर करतात? तेव्हा भारतीय मुलगी म्हणाली पाहुणे आले तरी करतात आणि आम्ही घरी नेहमी असाच चहा पितात. त्यांच्याकडे फक्त चहा उकळत्या पाण्यात टाकून त्याचा फ्लेवर आला कि तसा पितात.

आज भारत जगातल्या सर्वात मोठ्या चहा उत्पादक देशांमध्ये आहे. आपण मोठ्या प्रमाणावर निर्यात सुद्धा करतो, पण आपण उत्पादन केलेला बराचसा चहा देशातच संपवतो सुद्धा.

जगभरात चहा हे सतत घेतले जाणारे पेय आहे. या चहामुळे भरपूर मोठे उद्योग चालतात. लाखो लोक चहाच्या व्यवसायाशी निगडित असतात. त्यामुळेच २१-मे या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा होतो.

चहाचा इतिहास वाचून चहाप्रेमींना चहाची तल्लफ लागली असेलच, तर होऊन जाऊद्या एक कप. कारण चहाची वेळ नसते, पण वेळेला चहाच लागतो.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा