You are currently viewing अक्षय्य पात्र

अक्षय्य पात्र

पांडव जेव्हा द्युतात दुर्योधन आणि शकुनीकडुन हरले तेव्हा त्यांना आपले राज्य सोडुन १२ वर्षे वनवासात जावे लागले. पाचही भाऊ आणि त्यांची पत्नी द्रौपदी साध्या वेशात वनात फिरत होते. 

त्यांच्याकडे भेटायला बरेच लोक यायचे. राजे स्वतः किंवा त्यांचे प्रतिनिधी येऊन त्यांना सहानुभुती आणि पाठिंबा दर्शवायचे. जनतेतले लोक येऊन प्रेमाने भेटून जायचे. युधिष्ठिराला धर्मशास्त्र, तत्वज्ञानाची आवड होती आणि त्याला चर्चा करायला आवडायचे म्हणुन ऋषी मुनीही त्यांना भेट द्यायला यायचे. 

तेव्हा आलेल्या अतिथीचा मानाने पाहुणचार करून त्यांना जेवायला वाढावे अशी पद्धत होती. कोणीही आपल्या घरून उपाशीपोटी जाऊ नये अशी सर्वांची इच्छा असायची. 

परंतु जंगलात असल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्याकडे पुरेसे अन्न नसायचे. त्यामुळे स्वतः पांडवांची आणि त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची जेवणाची व्यवस्था करणे जिकिरीचे काम होते. द्रौपदीची यात तारांबळ व्हायची. 

युधिष्ठिराने सूर्याची प्रार्थना केली, आणि सूर्यदेवाने त्यांना एक जादूचे पात्र दिले. त्या पात्राचे नाव होते “अक्षय्य पात्र”. अक्षय्य म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे. 

सूर्यदेवाने युधिष्ठिराला सांगितले कि “द्रौपदी या पात्रातुन ज्या अन्न पदार्थाची कामना करेल ते ह्या पात्रात हजर होईल आणि काही कमी पडणार नाही. जोपर्यंत द्रौपदी सगळ्यांना वाढुन शेवटी स्वतः जेवत नाही तोपर्यंत त्या पात्रातुन अन्न उपलब्ध होत राहील. द्रौपदीचे स्वतःचे जेवण झाल्यावर मात्र त्या पात्रातुन पुढच्या दिवशीपर्यंत काही येणार नाही.”

देवाच्या कृपेने पांडवांना आपल्या स्वतःच्या अन्नाची आणि आलेल्या अतिथींच्या पाहुणचाराची काळजी राहिली नाही. त्यांच्याकडे आलेले सर्व अतिथी तृप्त मनाने परत जाऊ लागले. 

हि वार्ता हस्तिनापुरात दुर्योधनापर्यंत जाऊन पोहोचली. त्याला वनवासातही देवाच्या कृपेने पांडवांची इतकी चांगली सोय झालेली पाहुन मत्सर वाटायला लागला. काही दिवसांनी हस्तिनापुरात दुर्वास मुनी आपल्या हजार शिष्यांसह आले. सर्वत्र फिरत असणाऱ्या ज्ञानी ऋषी मुनींचे सर्वच राज्यात स्वागत आणि आदरातिथ्य होत असे. 

त्यात दुर्वास मुनी आपल्या कोपिष्ट स्वभावामुळे आणि क्रोधात कठोर शाप देण्याच्या सवयीमुळे प्रख्यात होते. दुर्योधनाने त्यांच्या व्यवस्थेत कुठलीही कमी सोडली नाही. दुर्वास मुनी प्रसन्न झाले. दुर्योधनाने त्यांना आपल्याप्रमाणेच वनवासात असलेल्या पांडवांनाही आपल्या दर्शनाचा आणि सेवेच्या संधीचा लाभ द्यावा अशी विनंती केली. आणि पांडव द्रौपदीचे जेवण झाल्यावरही तितक्याच उत्साहाने स्वागत करतात का हे पाहायला सांगितले. 

दुर्वास मुनींनी त्याची विनंती मान्य केली आणि सर्व शिष्यांसहित वनात गेले. मुद्दाम द्रौपदीचे जेवण झाल्यावरच ते पांडवांच्या कुटीसमोर हजर झाले. कोपिष्ट दुर्वास मुनी आणि त्यांच्या इतक्या शिष्यांना अचानक समोर पाहुन पांडव पेचात पडले. द्रौपदीचे नुकतेच जेवण झाले आहे आणि आता अक्षय्य पात्रातुन काही मिळणार नाही हे त्यांना माहित होते. द्रौपदीने सर्वांना आपला प्रवासाचा थकवा घालवायला घालवण्यासाठी नदीवर जाऊन स्नान करून येण्याची विनंती केली. त्याप्रमाणे दुर्वास मुनी आणि शिष्यगण नदीवर गेले. 

इकडे द्रौपदीने मनोमन श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्णाने तुझ्या मदतीला नेहमीच येईन असे वचन तिला दिले होते. त्याप्रमाणे तो क्षणार्धात तिथे प्रकट झाला. 

श्रीकृष्णाने द्रौपदीची थोडी मस्करी करायचे ठरवले. तो म्हणाला “द्रौपदी मला फार भुक लागली आहे. मला पटकन काहीतरी खायला दे.”

द्रौपदी त्याला म्हणाली, “अरे कृष्णा, माझे जेवण झाल्यामुळे अक्षय्यपात्र आता काही देऊ शकत नाही. तिकडे दुर्वास मुनी आणि त्यांचे हजार शिष्य लवकरच नदीवरून परततील. त्यांना जेवायला काय आणि कसे वाढु  हीच तर माझ्यापुढे मोठी समस्या होती. त्यांचं आदरातिथ्य करू शकलो नाही तर ते आम्हाला शाप देतील. आम्ही आधीच वनवासात आहोत, त्यांचा शाप आम्हाला अजुन क्लेश देईल. त्यामुळे तर मी तुझा धावा केला आणि तुही मला जेवायलाच मागतोस. मी काय करू?”

कृष्ण म्हणाला, “वा रे वा. आलेल्या अतिथीशी असे बोलण्याची पद्धत आहे कि काय तुमच्या कुरुकुलाची? दुर्वास मुनी येतील तेव्हा येतील. आधी मला भोजन दे. तुमच्या अक्षय्य पात्राची तर सर्व जण स्तुती करतात. आणि तुझ्याकडे मला द्यायला काही नाही?”

“अरे कृष्णा, माझे जेवण झाल्यावर अक्षय्य पात्रात पदार्थ येणे बंद होतात. आता आमच्या कुटीत काहीच शिल्लक नाही. हे बघ आमचं रिकामं अक्षय्य पात्र.” असं म्हणुन द्रौपदीने त्यांच्यासमोर ते पात्र आणुन ठेवले. 

श्रीकृष्ण ते पात्र बघुन हसले. “रिकामं कसं? हे बघ मला हे एक भाताचं शीत दिसतंय.” असं म्हणुन त्यांनी द्रौपदीच्या जेवणानंतर उरलेलं भांड्याला चिटकलेलं एकमेव भाताचं शीत उचललं आणि खाल्लं आणि मोठ्या समाधानाने म्हणाले “व्वा. माझं तर पोट भरलं. आणि त्या पाहुण्यांचंही पोट भरलं असेल.”

तिकडे खरंच दुर्वास आणि त्यांच्या सर्व शिष्यांची भुक आपोआप शांत झाली. त्यांना आता एक कणही खाण्याची क्षमता उरली नाही. आता पांडवांनी आपल्या जेवण्याची चोख व्यवस्था केली तर काही न खाता उठून त्यांचा अपमान कसा करायचा असा विचार करून ते पुन्हा कुटीवर न येताच परत गेले. दुर्वास मुनींना मात्र यामागे देवाचाच हात असणार हे लक्षात आले होते. त्यांनी पांडवांची परीक्षा पाहण्याचा विचार सोडून दिला. 

आपल्या भक्ताच्या घरी फक्त एक कण भाताच्या बदल्यात श्रीकृष्णाने त्यांना मोठ्या संकटातुन लीलया सोडवले. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा