बकरी ईद या मुस्लिम सणाची पार्श्वभुमी इब्राहिम / अब्राहमशी निगडित आहे. जुडाईसम (ज्यु लोकांचा धर्म), ख्रिस्ती धर्म आणि इस्लाम धर्म या धर्मांना अब्राहमिक धर्म म्हणतात. कारण अब्राहम हा या तिन्ही धर्मांमध्ये पुजला जाणारा आद्यपुरुष आहे.
ज्यु आणि ख्रिश्चन धर्मीय त्याला अब्राहम म्हणतात आणि मुस्लिम लोक त्यालाच इब्राहिम म्हणतात. मुस्लिम धर्मीय येशु ख्रिस्तापर्यंत होऊन गेलेल्या प्रभावी व्यक्तींना प्रेषित म्हणजे देवाचा संदेश जगापर्यंत पोहचवणारा म्हणुन मानतो. मुहम्मद पैगंबर हा त्यांच्यासाठी अखेरचा प्रेषित आहे.
येशु ख्रिस्तापर्यंतचा इतिहास आणि पौराणिक कथा ह्या तिन्ही धर्मांमध्ये थोड्याफार फरकाने मिळत्या जुळत्या आहेत. तर ह्या बकरी ईद सणाशी निगडित असलेली इब्राहिमची कथा अशी.
इब्राहिम हा देवाचा निस्सीम भक्त होता.
तो देव जे म्हणेल ती आज्ञा शिरसावंद्य मानत असे आणि ती पार पाडत असे.
देवाने त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला त्याच्या सर्वात आवडत्या गोष्टीचा त्याग करून संपवायला सांगितले.
इब्राहिमला काही दिवसांपासुन स्वप्न पडत होते कि तो त्याच्या लाडक्या मुलाचा इस्माईलचा शिरच्छेद करतोय.
त्याने देवाला आपण इस्माईललाच मारावे असा संकेत द्यायचा आहे असे ओळखले.
त्याला दुःख झाले. त्याने इस्माईलला हे बोलुन दाखवले.
इस्माईल म्हणाला “तुम्हाला देवानेच असे करायला सांगितले असेल तर ते करणे भाग आहे. तुम्ही ते करायलाच हवे.”
जड अंतःकरणाने इब्राहिम आपला मुलगा इस्माईलला घेऊन एका टेकडीवर गेला.
तिथे त्याने इस्माईलला बसवले आणि शस्त्र उचलुन त्याला मारायला सज्ज झाला.
तेवढ्यात देवाने इस्माईलच्या जागी एक मेंढी हजर केली आणि इस्माईलला जीवदान दिले.
इब्राहीमने देवाचा नजराणा स्वीकारून त्या मेंढीचा बळी दिला.
हि माणसाची पहिली कुर्बानी किंवा बलिदान मानले जाते.
इब्राहिम ज्याप्रकारे अल्लाह म्हणेल ती कुर्बानी द्यायला सज्ज होता, त्याच्या समर्पण वृत्तीची आठवण म्हणुन मुस्लिम लोक या दिवशी मेंढी, बकरी अशा प्राण्यांचा बळी देतात.
यापैकी फक्त एक तृतीयांश भाग बळी देणारे कुटुंब स्वतः सेवन करते, उरलेला दोन तृतीयांश भाग हा गरीब आणि गरजु लोकांमध्ये वाटण्यासाठी असतो. ह्या दिवशी दानधर्मसुद्धा केला जातो.
ह्याच ईदला ईद-अल-अझा म्हणजे बलिदानाची ईद असेही म्हणतात.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take