You are currently viewing शुक्रवारची (देवीची) कहाणी

शुक्रवारची (देवीची) कहाणी

एक आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. 

त्याची पत्नी शेजारणीकडे गेली. आपल्या गरीबीबद्दल सांगितलं. तेव्हा शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. 

“श्रावणातील शुक्रवारपासून हे व्रत धर. दिवसभर उपास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत. हळदी कुंकू देऊन ओटी भरावी. दूध-साखर प्यायला द्यावी. भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणे वर्षभर करून व्रताचं उद्यापन करावं.” 

त्याप्रमाणे ब्राह्मण स्त्री शुक्रवारचं व्रत करू लागली.

त्याच गावात तिचा भाऊ राहत होता. एके दिवशी त्यानं गावाला सहस्रभोजन घातलं; पण बहिणीला बोलवलं नाही. त्याला वाटलं, बहिणीला बोलावलं, तर गरीब म्हणून सारे हसतील. अनेक मंडळी येऊन भोजन करून जात होती. 

बहिणीनं विचार केला, भाऊ आपल्याला बोलवायला विसरला असेल. भावाच्या घरी जायला काय हरकत आहे ? ती मुलांना घेऊन भावाच्या घरी गेली व पानावर बसली. शेजारच्या पानांवर मुलांना बसवलं. 

भाऊ वाढता वाढता तिच्या पानाशी आला. तिला म्हणाला, “ताई, तू गरीब. तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दागदागिने नाहीत. तुझ्याकडे पाहून सगळे हसतात. मी तुला बोलावलं नाही. आज तू आलीस. आता उद्या येऊ नकोस.” 

हे ऐकून ती हिरमुसली होऊन जेवली. मुलांना घेऊन घरी आली.

दुसरे दिवशी मुलांनी मामाकडे जेवायला जाण्याचा हट्ट केला. तिनं विचार केला, “कसाही असला, तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं?” ती मुलांना घेऊन जेवायला गेली. तेव्हा पहिल्या दिवशीप्रमाणेच तो तिला बोलला. 

तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं तिला हात धरून घालवून दिलं. ती खूप दु:खी-कष्टी झाली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची दया आली. नंतर तिला सुखाचे दिवस आले.

एक वर्ष निघून गेले. तशी तिची गरीबी गेली. ती श्रीमंत झाली. देवीची तिजवर कृपा झाली. शुक्रवारचं उद्यापन करायचं; म्हणून भावाला जेवायल बोलावलं.

भाऊ मनात ओशाळला व म्हणाला, “ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. तू नाही आलीस, तर मी काही तुझ्या घरी येणार नाही.” ती ‘हो’ म्हणाली. 

भावाच्या मनातलं कारण तिने ओळखलं. दुसऱ्या दिवशी दाग-दागिने घालून, उंची पैठणी नेसून भावाकडं जेवायला गेली. 

भावानं मोठ्या प्रेमाने व आदराने तिला पानावर बसवलं. ताईनं आपली शालजोडी काढली व बसल्या पाटावर ठेवली. भावानं विचार केला, उकडत असेल. नंतर दागिने काढून पाटावर ठेवले. भावानं विचार केला, जड म्हणून काढत असेल. नंतर ताईनं भात कालवला. मोठा घास उचलून सरीवर ठेवला. एकेक पक्वानाचा घास एकेका दागिन्यावर ठेवत गेली. 

आता मात्र भावानं विचारलं, “ताई, हे काय करते आहेस ?” 

ती म्हणाली, “दादा, मी करते, हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस, तिला मी भरवते आहे.” 

भावानं तिला पुन्हा जेवावयास सांगितलं. 

तेव्हा ती म्हणाली, “हे माझं जेवण नाही. हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं, ते मी सहस्रभोजनाचे दिवशी जेवले.” 

हे ऐकताच भाऊ अतिशय खजील झाला. उठून त्याने बहिणीचे पाय धरले. झालेल्या अपराधाची क्षमा मागितली. बहीण मोठ्या मनाची; तिने क्षमा केली. एकमेकांबद्दल मनात असलेला गैरसमज दूर करून दोघं प्रेमाने जेवले. 

दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला खूप आनंद झाला. 

तिनं शुक्रवारचे देवीचे व्रत केले; त्यामुळे ती श्रीमंत व सुखी, आनंदी झाली. तसं तुम्हा-आम्हां करो. 

ही साठा उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा