You are currently viewing गरज आणि उधळपट्टी

गरज आणि उधळपट्टी

महात्मा गांधी एकदा अलाहाबादला (आताचे प्रयागराज) काही कार्यक्रमानिमित्त गेले होते. 

तिथे ते पंडित नेहरूंच्या घरी मुक्कामी होते. 

सकाळी उठल्यावर त्यांची सकाळची नित्यकर्मे चालु होती. 

तेव्हाच पंडित नेहरू त्यांच्याशी गप्पा मारायला आले. 

त्यावेळी एका तांब्यात पाणी घेऊन ते तोंड धुत होते. 

गप्पा मारता मारता त्यांचे पाणी संपले. त्यांचा चेहरा पडला. 

नेहरूंना समजले नाही कि अचानक बापूंना काय झाले. 

त्यांनी विचारले, “काय झाले बापु?”

“आज बोलताना माझे पाण्याकडे दुर्लक्ष झाले आणि मी नेहमी एवढे पाणी घेतले होते तरी ते आधीच संपले.”

नेहरूंना हे ऐकुन हसु आले. 

“असे काय करता बापु? त्यात काय एवढं? या शहरात गंगा यमुना दोन्ही वाहतात. हवे तेवढे पाणी वापरा.”

बापु म्हणाले, “त्या नद्या काही माझ्या एकट्यासाठी वाहत नाहीत. पृथ्वीवरच्या सगळ्यांसाठीच देवाने या नद्या बनवल्या आहेत. नदी माझ्या जवळ आहे म्हणुन मी विनाकारण मला लागते तेवढ्यापेक्षा जास्त पाणी वापरणे चुक आहे. आपण आपल्याला खरी गरज आहे तेवढ्याच वस्तु वापरल्या पाहिजेत.” 

मित्रांनो विचार करा, हि गोष्ट त्या काळची आहे, जेव्हा पर्यावरण, नैसर्गिक संसाधनांची मर्यादितता, त्यांना जपुन वापरण्याची आवश्यकता यावर कोणी फारसे बोलत नव्हते. 

महात्मा गांधींचे अगदी साधे कपडे वापरणे, फक्त धोतर आणि पंच्यात राहणे, खादीचा प्रचार करणे हे सर्व या जाणिवेतून आले होते कि आपल्या आजूबाजूला अनेक बंधुभगिनी आपल्या एवढे नशीबवान नसतात, त्यांना अगदी आवश्यक तेवढ्याही गोष्टी मिळत नाहीत. 

तेव्हा आपण आवश्यकतेपेक्षा जास्त उधळपट्टी करणे हे असंवेदनशील आहे. 

महात्मा गांधी एवढ्या बारीकसारीक गोष्टींचाही सखोल विचार करून आपल्या आचरणात आणायचे म्हणूनच त्यांना महात्मा म्हणजेच महान आत्मा म्हटले जायचे. आपल्यासारख्या सामान्य लोकांना कदाचित त्यांच्याएवढे टोकाचे विचार झेपणार नाहीत, पण त्या दिशेने प्रवास करणे आवश्यक आहे. 

कुठलीही गोष्ट घेताना, वापरताना गरज आणि उधळपट्टी याचा विचार करा आणि निर्णय घ्या. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा