पितामह भीष्मांनी हस्तिनापूरच्या लहान राजकुमारांना सर्व शस्त्रे चालवणे शिकवण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांना नेमले होते.
१०० कौरव, ५ पांडव आणि स्वतः द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा असे सर्वजण द्रोणाचार्यांच्या हाताखाली शिकत होते.
एक दिवस द्रोणाचार्यांनी आपल्या शिष्यांची धनुर्विद्येची म्हणजे धनुष्य बाण चालवण्याची परीक्षा घ्यायचे ठरवले.
त्यांनी सर्व शिष्यांना गोळा केले. समोर काही अंतरावरच्या झाडाच्या फांदीवर त्यांनी एक खोटा पक्षी ठेवला.
शिष्यांना सांगितले कि आज तुमच्या धनुर्विद्येची परीक्षा आहे. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला ह्या पक्ष्याच्या डोळ्यावर नेम धरून मारावा लागेल. पण मी सांगितल्याशिवाय कोणीही बाण मारायचा नाही. मी एकेकाला समोर बोलावेल आणि नेम धरायला सांगेल, मी बाण मारायला सांगितल्यावरच बाण मारायचा.
त्यांनी पहिले युधिष्ठिराला बोलावले आणि नेम धरायला सांगितले. त्याला विचारले कि हे युधिष्ठिरा, सांग तुला काय काय दिसतंय.
त्याला वाटले गुरुजी आपल्या दृष्टीची पण परीक्षा घेत आहेत. युधिष्ठिराने सांगितले, “गुरुजी, मला तुम्ही दिसताय, तुम्ही सांगितलेले झाड, त्यावरचा पक्षी, फांद्या, पाने वगैरे सर्व व्यवस्थित दिसतेय.”
द्रोणाचार्यांनी युधिष्टिराला पुन्हा मागे जायला सांगितले, आणि दुर्योधनाला बोलावले.
दुर्योधनाला तेच विचारले. दुर्योधनाला वाटले युधिष्ठिराने सांगितलेल्या गोष्टींनी गुरुजींचे समाधान झाले नाही. त्याने युधिष्ठिराने सांगितलेल्या गोष्टींचा उल्लेख केलाच, पण त्यासोबत आजूबाजूला उभ्या असलेल्या भावांचीही नावे सांगितली आणि म्हणाला मला हे सर्व दिसतेय.
द्रोणाचार्यांनी त्यालासुद्धा मागे जायला सांगितले, आणि भीमाला बोलावले.
भीम सर्वात उंच आणि धिप्पाड होता. त्याने दुर्योधनाने सांगितले त्यात भर घालुन त्या पक्ष्याच्या पलीकडच्या झाडांची सुद्धा नावे सांगितली आणि म्हणाला मला हे सर्व दिसतेय.
द्रोणाचार्यांनी त्यालासुद्धा मागे जायला सांगितले, आणि अर्जुनाला बोलावले.
अर्जुनाने नेम धरला. गुरुजींनी तोच प्रश्न विचारला. अर्जुन म्हणाला “गुरुजी मला फक्त त्या पक्ष्याचा डोळाच दिसतोय, बाकी काहीही दिसत नाही.”
आता द्रोणाचार्य प्रसन्न झाले. त्यांनी अर्जुनाला बाण मारायला सांगितले आणि अर्जुनाने बिनचूक पक्ष्याच्या डोळ्यावर बाण मारला आणि तो पक्षी खाली पडला.
द्रोणाचार्यांनी सर्वांना सांगितले. “धनुष्य बाण चालवणे हे एक कौशल्याचे काम आहेच, पण त्याइतकीच महत्वाची आहे एकाग्रता. एकाग्र होणे म्हणजे एकाच गोष्टीवर सगळे लक्ष केंद्रित करणे. कुठलीही गोष्ट अचुक आणि उत्तम पद्धतीने करण्यासाठी एकाग्रता फार आवश्यक असते. एकाग्रतेने सराव करत राहिले तर सर्व प्रकारची कौशल्ये उत्तम पद्धतीने आत्मसात होतात. कमी श्रमात जास्त परिणाम साधता येतो.
आज फक्त अर्जुनाने मला हवी तशी एकाग्रता दाखवली त्यामुळे मी त्याला बाण मारायची परवानगी दिली. इतर सर्वांनी अशाच एकाग्रतेने सराव करा.”
पुढे अर्जुन द्रोणाचार्यांचा लाडका शिष्य बनला. आणि त्याकाळच्या सर्वोत्तम धनुर्धरांपैकी एक बनला.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take