You are currently viewing अनोखे श्राद्ध

अनोखे श्राद्ध

रेड्याच्या तोंडुन वेद वदवण्याच्या चमत्कारानंतर काही लोकांना हि भावंडे दैवी सामर्थ्य असलेली आहेत हे लक्षात आले. ते त्यांना पाठिंबा देऊ लागले. एका ब्राह्मणाने त्यांना आदराने आपल्या घरी नेले. तिथेच त्यांच्या भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था केली. 

काही लोकांनी मात्र हा चमत्कार पाहूनही ज्ञानेश्वरांविषयी अपप्रचार सुरु केला. संन्याशाची पोरे आहेत. ते तांत्रिक विद्या शिकलेले आहेत, ते काळी जादू करतात. जादूटोणा करून त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले. हा वेदांचा अपमान आहे अशा गोष्टी ते पसरवु लागले. 

त्यामुळे पैठणमध्ये त्यांना आश्रय देणाऱ्या ब्राह्मणाचे घर लोकांनी वाळीत टाकले. त्याच्या घरी येणे जाणे बंद झाले. त्याची ज्ञानेश्वर आणि भावंडांवर श्रद्धा होती म्हणुन त्याने हे सहन केले. 

काही दिवसांनी त्याच्या घरी श्राद्ध करायचे होते. श्राद्ध म्हणजे आपल्या मृत्यू पावलेल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलेली पूजा. यात आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना आवाहन करतात आणि जेवण्यासाठी बोलावतात. पितरांचे प्रतीक म्हणून घरी ब्राह्मणांना बोलावुन जेवायला घालतात. त्यांच्या रूपाने आपल्या पितरांना घरचं जेवण मिळतं आणि ते समाधानी होतात असे मानले जाते.  

साहजिकच त्याकाळच्या धर्मनिष्ठ ब्राह्मणांसाठी हि गोष्ट किती महत्वाची असेल. त्या ब्राह्मणाला कोणीही श्राद्धासाठी सहकार्य केले नाही. कोणीही त्याच्या घरी यायला तयार झाले नाही. 

संन्याशाच्या पोरांना आश्रय देतोस काय, भोग आता आपल्या कर्मांची फळे, आणि तुझ्या पितरांनाही समजेल आपल्या वंशजांचे प्रताप अशा प्रकारे टोमणे मारले.  

तो ब्राह्मण फार दुःखी झाला. ह्यावर्षी पहिल्यांदा त्याला आपल्या पूर्वजांसाठी रीतसर श्राद्ध घालणे जमणार नव्हते. 

ज्ञानेश्वरांना आपल्या यजमानांची हि अवस्था बघवली गेली नाही. त्यांनी सांगितले तुम्ही श्राद्धाची तयारी करा. सगळे व्यवस्थित होईल. 

श्राद्धाच्या दिवशी गावातले लोक आडून असून श्राद्ध होते कसे, कोण ह्यांच्या घरी जाते हे पाहायला उत्सुक होते.  

चारही भावंडांच्या सहकार्याने पूजा झाली. त्या दिवशी चक्क त्या ब्राह्मणाचे पूर्वज स्वतः श्राद्धाचे जेवण जेवायला प्रकट झाले. समाधानाने पोटभर जेवले आणि जेवणानंतर आशीर्वाद देऊन अदृश्य झाले. 

आता मात्र गावकऱ्यांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. हळूहळू त्या भावंडांचे पाठीराखे अनुयायी वाढायला लागले. 

चारही भावंडे बरेच दिवस पैठणला राहिले. तिथे त्यांनी वेद, शास्त्रे, पुराणे, रामायण, महाभारत, गीता या सर्वांचा सखोल अभ्यास केला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा