You are currently viewing तेलाची नासाडी

तेलाची नासाडी

एकदा एका श्रीमंत स्त्रीने आपल्या मुलाला बाजारातुन तेल आणायला पाठवले. सोबत पैसेही दिले. 

मुलगा तेलाच्या दुकानात गेला आणि तेलाचा डबा आणि उरलेले पैसे घेऊन घरी निघाला. 

मुलाचे तेलाचा डबा नीट पकडुन चालण्याकडे लक्ष नव्हते, त्यामुळे वाटेत तो डबा त्याच्या हातुन निसटला. थोडे तेल वाया गेले. 

मुलगा परत दुकानात गेला आणि उरलेल्या पैशाचे तेल घेऊन परत घरी गेला. 

तेलाच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे देऊनही मुलाकडे पैसे उरले नव्हते म्हणुन आईने चौकशी केली. मुलाने रस्त्यात घडलेला प्रकार सांगितला. 

आईला वाईट वाटले. ती म्हणाली “अरेरे, बाळा किती तेल वाया गेले असेल. जरा सांभाळुन अशी कामे करत जा रे. नासाडी बरी नव्हे.”

मुलाला एवढ्याशा तेलासाठी आईने आपल्याला बोलणे आवडले नाही. तो म्हणाला, “आई, काय गं एवढ्या तेलाचं घेऊन बसलीस. मी परत जाऊन आणलं ना तू सांगितलंस तेवढं तेल? आपल्याला पैशाची काही कमी आहे का?”

आईने त्याला समजावले. “बाळा, पैशाचा माज करू नये. सगळ्या गोष्टींची तुलना पैशाची करू नये. तु आपल्याला लागतं तेवढं तेल आणलंस हे चांगलं केलंस, आणि आपल्याला तेवढ्या पैशाने झळ बसत नाही हे हि तु म्हणतोस ते बरोबर आहे. तुझे बाबा सहज तेवढे पैसे कमावतील. मोठा होऊन तू पण कमावशील. पण मला सांग तु जे तेल रस्त्यावर सांडलंस ते परत आणू शकतोस का?”

मुलगा खजील झाला. “नाही. रस्त्यावर सांडलेलं तेल कसं आणणार? ते तर आता मातीत गेलं.”

आईने पुढे समजावले. “तेच तर बेटा. आपण पैसे कमावतो म्हणुन अन्नाची, अशा वस्तूंची नासाडी करण्याचा आपला हक्क आहे असं समजु नये. देवाने अशा वस्तु माणसाला उपयोगी पाडाव्यात म्हणुन बनवल्या आहेत. आपल्याकडे तेवढे पैसे जास्त असतील तर ते पैसे किंवा तेल एखाद्या गरिबाला दिले असते तर त्यांच्या वापरात तरी आले असते.”

“हातातुन एखादी गोष्ट निसटणे वगैरे ठीकच आहे. ते कधीपण होऊ शकते. पण हा विचार तु बदल.” 

मुलाला आपली चुक समजली आणि त्याने सर्व कामे काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करायचा निश्चय केला. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा