नारद मुनी हे भगवान विष्णूंचे परमभक्त म्हणुन ओळखले जातात. चालता बोलता सतत “नारायण नारायण” जप सतत करणारे नारद मुनी यांना देवर्षीसुद्धा म्हटले जाते.
नारद मुनी एकदा तपश्चर्येला बसले. त्यांनी अनेक वर्षे कठोर तप केले. आणि कोणी तपाला बसले रे बसले कि नेहमीप्रमाणे देवराज इंद्राला भीती वाटू लागली. कोणीही तप केले कि इंद्राला तप करणारा वर मागताना मोठी शक्ती मागुन स्वर्गातली आपली सत्ता हिरावुन घेईल असे वाटायचे. मग तो ते तप भंग करून पूर्ण होऊ नये म्हणुन प्रयत्न करायचा.
त्याने कामदेवाला नारदाचे तप भंग करायला पाठवले. कामदेवाने अनेक प्रयत्न केले, नारदाजवळ सुंदर स्त्रीला पाठवले. पण नारदाने आपली तपश्चर्या भंग होऊ दिली नाही. आपले लक्ष विचलित न होऊ देता तपावरच केंद्रित केले. शेवटी कामदेवाने हार मानली आणि नारदासमोर हात जोडले.
तो म्हणाला “हे मुनीवर तुम्ही धन्य आहात. माझ्या कुठल्याही प्रयत्नाला तुम्ही यश लाभु दिले नाहीत. आपल्या ध्यानात इतके मग्न मी आजवर केवळ महादेवांनाच पाहिले आहे, कि ज्यांचे ध्यान कोणीही भंग करू धजत नाही.”
नारद हे ऐकुन प्रसन्न झाले आणि स्वतःबद्दल त्यांना अभिमान वाटला. त्यांनी कामदेवाला उत्तर दिले. “कामदेवा, आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि एवढी एकाग्रता असलेले काही एकटे महादेवच नाहीत, जाऊन सांगा तुमच्या देवराज इंद्रांना, कि नारदाचे तप कोणीही भंग करू शकत नाही.”
देवर्षी असल्यामुळे त्यांना मनात येईल त्या ठिकाणी प्रकट होण्याची सिद्धी प्राप्त होती. महादेवासारखी पातळी गाठल्याबद्दल त्यांना लगेच महादेवांसमोर जाऊनच सांगावे वाटले. ते ताबडतोब कैलासावर जाऊन महादेवांना भेटले. आनंदाने त्यांनी घडलेली घटना महादेवांना सांगितली. महादेवांना नारदाला थोडा गर्व झाल्याचे लक्षात आले पण त्यांनी तसे काही न दाखवता नारदाचे अभिनंदन केले.
“वाह देवर्षी, खुप छान. तुम्ही कमाल केलीत.”
“धन्यवाद प्रभु. आता मला कधी एकदा माझ्या प्रभु विष्णूंना हे सांगतोय असं झालंय.”
“त्यांना सर्व समजलंच असेल. तुम्ही जाऊन सांगण्याची आवश्यकता नाही.” असे महादेवाने त्यांना सांगितले.
महादेवाचे म्हणणे नारदाला समजले नाही. आपण भक्तीची एवढी परिसीमा गाठली असताना आपल्याच प्रभुंना का सांगु नये असे त्यांना वाटले. त्यांना अपेक्षा होती कि हा वृत्तांत ऐकुन भगवान विष्णु तर अत्यंत खुश होतील. ते तिथुन तडक वैकुंठात गेले आणि अभिमानाने विष्णूदेवांसमोरही त्या घटनेबद्दल सांगितले.
महादेवांनी सांगितल्याप्रमाणे श्री विष्णुंना त्रिकालदर्शी असल्यामुळे सर्व काही माहीतच होते. आणि आता नारद बढाई मारण्यासाठी आपल्यासमोर आले आहेत हे हि समजले. त्यांनी एक स्मितहास्य केले आणि नारदांना सांगितले.
“वाह मुनीवर, यापुढेही असेच सावधान रहा.”
नारद मुनींना हवी तेवढी प्रतिक्रिया न मिळाल्यामुळे ते थोडे नाराज झाले. भगवंतांना नमस्कार करून ते निघाले. त्यांचा जगात सर्वत्र संचार असे. ते फिरता फिरता एका राज्यात गेले. तिथल्या राजकन्या श्रीमतीचे स्वयंवर होऊ घातले होते. राजाने नारदाला आदराने बोलावले, पाहुणचार केला. राजपरिवारातल्या सर्वांनी नारदाचा आशीर्वाद घेतला.
श्रीमती अत्यंत सुंदर होती. तिला पाहुन नारदाला साक्षात देवी लक्ष्मी पाहिल्याचा भास झाला. नारदाला तिच्या स्वयंवराबद्दल ऐकुन त्यात भाग घेऊन तिच्याशी लग्न करण्याची इच्छा झाली. पण त्यांना वाटायला लागले कि देवी लक्ष्मी सारखी सुंदर असणारी राजकन्या आपला वरही नारायणाइतकाच सुंदर निवडेल.
ते पुन्हा वैकुंठात गेले आणि त्यांनी भगवंतांना आपल्यास हरिरूप देण्याची विनंती केली. हरी म्हणजेच विष्णु. भगवंतांनी तथास्तु म्हटले.
नारद स्वयंवरात पोहोचले. त्यांच्याकडे पाहुन सर्व जण गालातल्या गालात हसत होते. नारदांना आश्चर्य वाटले पण त्यांनी दुर्लक्ष केले. स्वयंवर सुरु झाले. राजकन्या सर्व हातात हार घेऊन एक एक इच्छुकाकडे बघत सभेतुन फिरत होती. नारदाकडे आल्यावर तिला एकदम हसु आले, आणि ती तशीच पुढे गेली.
आता मात्र नारदाला काही कळेना. साक्षात भगवंतांकडून हरिरूप मिळवूनही आपले हसे व्हावे याचे त्यांना वाईट वाटले. त्यांनी जवळ एका जलपत्रात स्वतःचे रूप पाहिले आणि ते चमकले. त्यांचे रूप माकडाचे दिसत होते. हरी या शब्दाचा एक अर्थ माकड असाही होतो. भगवंतांनी त्यांना हरीरूप मागितल्यावर सर्वकाही माहित असूनही त्या शब्दाचा हा अर्थ काढुन माकडाचे रूप देऊन भर सभेत आपला अपमान केल्याबद्दल त्यांना राग आला.
तेवढ्यात सभागृहातुन जल्लोषाचा आवाज झाला. त्यांचे तिकडे लक्ष गेले, श्रीमतीने ज्याच्या गळ्यात माळ घातली ते स्वतः भगवान विष्णूच होते. आपली अशी फसवणुक पाहुन नारद अत्यंत संतापले.
त्यांनी साक्षात भगवंताला शाप दिला. “प्रभु, तुमचे तप करता करता मी प्रत्यक्ष कामदेव समोर येऊनही त्याच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. मी नेहमी तुमचे नाव घेत राहतो. तरीही तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करण्याऐवजी माझा असा अपमान केलात. माझ्या मनात भरलेल्या स्त्रीशी स्वतः लग्न केलेत. माझा तुम्हाला शाप आहे कि एक दिवस तुम्हाला तुमच्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल आणि ज्या प्राण्याचे रूप देऊन तुम्ही माझा अपमान केलात, त्या माकडालाच मदत मागावी लागेल आणि त्याशिवाय तुमचं कार्य पुर्ण होणार नाही.”
ते हे बोलत असतानाच आजूबाजूचा राजमहाल, सर्व लोक गायब झाले. नारद, भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मी आता वैकुंठात होते. आतापर्यंतची सारी माया असल्याचे नारदाच्या लक्षात आले.
भगवंत म्हणाले, “हे नारदा, तुझ्या भक्तीचा मी नेहमीच आदर करतो. आणि माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेमच आहे. तू केलेल्या तपाचं कौतुकही आहे. पण कामदेवाने थोडीशी स्तुती करताच तुझ्या मनात अहंकार उत्पन्न झाला.
तुला हे चांगलेच माहित आहे कि मी काय आणि महादेव काय आम्ही त्रिकालदर्शी आहोत. आम्हाला सर्व काही समजतं. पण याचा तुला तुझ्या अहंकारामुळे विसर पडला. आणि तु स्वतःला महादेवांशी तुलना झाल्यामुळे त्यांच्या बरोबरीचा समजुन त्यांच्यासमोर आपली प्रशंसा करण्यासाठी गेलास.
त्यांनी मोठ्या मनाने तुझं कौतुक केलं आणि मला हे सर्व सांगण्याची गरज नाही हेही सांगितलेस. तरीही तु माझ्यासमोर येऊन स्वतःची कथा सांगितलीस. मीसुद्धा तुला यापुढे सावधान रहा असा इशारा दिला. पण तिथुन निघाल्यावर तु मोहात पडलासच. कामदेवाच्या पाशात न अडकल्याचा अभिमान बाळगलास, पण आपले ब्रह्मचर्याचे व्रत विसरून राजकुमाराच्या मोहात पडलास आणि मला माझ्यासारखे रूप मागण्यास आला. एरवी मी तुला मोठ्या आनंदाने ते बहाल केले असते, पण मला तुझ्या मोहासाठी तुझे सहाय्य्य करून तुझे व्रत तोडायचे नव्हते.
हि सगळी माझीच माया होती. मी तुझी परीक्षा पाहत होतो. पण तु मोहात पडुन या परीक्षेत अपयशी ठरल्यास.”
नारदाला आता आपली चुक समजली आणि आपण मोहाच्या रागाच्या भरात आपल्याच प्रभुला शाप देऊन बसलो याची जाणीव झाली. त्याने लोटांगण घालत भगवंतांची क्षमा मागितली.
भगवंतांनी नारदाला क्षमा केली आणि स्वतःवर संयम ठेवण्यास सांगितले. ते आपल्या भक्ताचा नेहमी मान राखतात. शापाच्या रूपात का असेना पण नारदाचे शब्द भगवंतांनी खरे केले. राम अवतारात त्यांना सीतेचा विरह सहन करावा लागला. तिला शोधताना त्यांना हनुमान, सुग्रीव, अंगद आणि समस्त वानरसेनेची फार मदत झाली.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take