You are currently viewing ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरी

निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई हि भावंडे पैठणला मुक्कामी असताना त्यांनी धर्मशास्त्रांचा सखोल अभ्यास केला. ते पैठणला धर्माने त्यांना स्वीकारावे, मुंजीची परवानगी द्यावी म्हणुन. आता ते याच्या पलीकडे गेले होते. 

त्यांनी स्वतः धर्माचे ज्ञान प्राप्त केले. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती कि देवधर्म त्यांच्या काळात एका साच्यात बांधला गेला होता. संस्कृत ग्रंथांमध्ये लिहिलेले तत्वज्ञान फक्त पंडितांना वाचता येत असे. माणसाच्या चांगल्या जीवनासाठी उपयुक्त असलेला हा अमूल्य ठेवा असा बंदिस्त होता. 

सामान्य लोकांना ते कळतही नसे आणि पंडित लोक जे सांगतील तेच खरं मानुन भोळे लोक ते म्हणतील तसं जगत असत. 

या भावंडांनी लोकांना उपदेश द्यायला सुरु केले. सर्वांमध्ये ईश्वर आहे, ईश्वरासाठी सर्व सारखे आहेत. सर्वांनी मिळुन मिसळून राहावे, कर्मकांडे करत राहण्यापेक्षा देवाची मनापासुन भक्ती करावी. भक्तीच्या मार्गाने सर्वांची उन्नती होऊ शकते असा संदेश ते लोकांना देत असत. 

आपले विचार ते अभंग ह्या आणि ओवी ह्या काव्याच्या प्रकारातून व्यक्त करत असत. 

पैठणहून ते बाहेर निघाले आणि आळंदीच्या दिशेने निघाले. आता त्यांची कीर्ती ठीकठिकाणी पसरत होती. त्यांना श्रद्धाळू लोक येऊन भेटत असत. वाटेत त्यांना नेवासा गाव लागले. 

नेवासा गावातल्या लोकांनी त्यांचे आपुलकीने स्वागत केले. फार प्रेमाने वागवले. एवढी ममता त्यांच्या वाट्याला कधीच आली नव्हती. त्यांनी नेवासा गावात बरेच दिवस मुक्काम केला. 

तिथेच त्यांच्या कृपेने एका भक्ताला दुसरं आयुष्य मिळालं होतं. ते खरं तर मृत्यू पावले होते. त्यांची पत्नी फार शोक करीत होती. ज्ञानेश्वरांना तिच्याबद्दल करुणा दाटुन आली आणि त्यांनी आपला हात मृत शरीरावर फिरवुन पुन्हा जिवंत केले. त्यांना लोक सच्चिदानंद बाबा म्हणुन ओळखतात. ते ज्ञानेश्वरांचे भक्त बनले. 

इथे मुक्कामाला असताना निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांनी आपल्या प्रतिभेचा उपयोग करून गीतेचे तत्वज्ञान लोकांना सहज समजेल असे लिहावे असे सुचवले. आपल्या गुरुची आज्ञा ज्ञानेश्वरांना शिरसावंद्य होती. 

ते रोज गीतेवर प्रवचने देऊ लागले. आपलं काव्य लोकांना सहज समजावं आणि गीतेचा उपदेश त्यांना आयुष्यात आचरणात आणता यावा यासाठी त्यांनी मुद्दाम ते मराठीत लिहिलं. 

ते एका खांबाला टेकून बसत आणि रोज नवीन श्लोक सांगत असत. त्यांचा भक्त सच्चिदानंद त्यांनी सांगितलेले श्लोक लिहुन घ्यायचा. मग ते लोकांना त्याचा अर्थ सोप्या भाषेत समजावुन सांगायचे. अशी नेवास्याच्या लोकांसमोर ज्ञानेश्वरांनी लिहिलेली गीतेवरची टीका (नाव ठेवण्याच्या अर्थाने नव्हे. टिप्पणी किंवा त्यांच्या पद्धतीने मांडलेली) तयार झाली. 

ह्याचे नाव भावार्थ दीपिका असे ठेवले असले तरी ती ज्ञानेश्वरी याच नावाने ओळखली जाते. 

ज्ञानेश्वरी हा अनेक अर्थाने मैलाचा दगड ठरला. ती मराठीमध्ये लिहिल्या गेलेल्या आणि आज उपलब्ध असलेल्या सर्वात जुन्या साहित्यापैकी एक आहे. बुद्ध आणि महावीरानंतर लोकांपर्यंत ज्ञान पोहचावे म्हणुन संस्कृतऐवजी त्यांच्या भाषेत मिळावे म्हणुन मोठ्या कालखंडांनंतर केलेला हा प्रयत्न होता. 

त्यांच्यापासुन प्रेरणा घेत पुढे अनेक संतांनी विविध भाषेत लोकांसाठी साहित्य निर्मिती केली. ज्ञान आणि तत्वज्ञान यामध्ये असलेली पंडितांची मक्तेदारी त्यांनी मोडून काढली. 

नेवाशामध्ये एक सुंदर मंदिर आहे आणि तिथे ज्ञानेश्वर ज्या खांबाला बसुन ज्ञानेश्वरी सांगायचे तो आजही बघायला मिळतो. 

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा