परमेश्वरा महाविष्णू, तुमची कहाणी ऐका.
काशीपूर नगरात सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी. बावन आड.
तिथं एक ब्राह्मण तप करीत आहे. सकाळी स्नान-संध्या करून विभूती लावून तिबोटी लंगोटी घालतो, खांद्यावर कुऱ्हाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पाच भाग करतो. देवाला, अतिथीला, ब्राह्मणाला, गायीला एकेक भाग देतो, उरलं सुरलं आपण खातो.
असं करता-करता तो जटाधारी तपस्वीच बनला. अठ्याऐंशी सहस्र वर्षं तप झाले. एवढं तप महाविष्णू भेटावा म्हणून करतो.
एकदा एक कपोत-कपोती एका वृक्षावर बसली होती. त्यांनी त्याला विचारले, ” तू एवढं तप का करतोस ?”
“महाविष्णू भेटावा म्हणून करतो!”
शेषशयनी, सुवर्णमंचकी महाविष्णू निजले होते. तिथं कपोत-कपोती आले. त्यांनी ब्राह्मणाची दिनचर्या सांगून तो महाविष्णू भेटावे; म्हणून तप करतो, असे सांगितले.
महाविष्णू ‘बरं’ म्हणाले ते पटकन् उठले, पायी खडावा घातल्या, मस्तकी पीतांबर गुंडाळला, आणि ब्राह्मणाजवळ जाऊन उभे राहिले.
‘भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणीवर चालतोस, मुखी नाम वदतोस. एवढे तप कोणत्या कारणास्तव करतोस ?”
“महाविष्णू भेटावा या कारणे करतो.”
तेव्हा “महाविष्णू तो मीच” असं म्हणाले.
“कशानं भेटावा ? कशानं ओळखावा ?”
“असाच भेटेन, असाच ओळखेन.”
शंख-चक्र-गदा-पद्म-पीतांबरधारी अयोध्याचारी माघारी वळला.
तो महाविष्णूची मूर्ती झालेली ती व्यक्ती म्हणाली, “भल्या रे भक्ता, शरणागता, राज्य माग, भांडार माग, संसारीचं सुख माग.”
“राज्य नको. भांडार नको. संसारीचं सुखं नको. तुझं माझं एक आसन. तुझी-माझी एक शेज. तुझी-माझी एक स्तुती.”
“कुठं करावी ?”
“देवाद्वारी, भल्या ब्राह्मणांच्या आश्रमी.” असं त्याला एकरूप केलं.
ब्राह्मण सद्धर्माने वागला, आयुष्यभर सत्कर्म केलं; त्यामुळे त्याला देव भेटला.
जो कोणी महाविष्णूची कहाणी ऐकतो, त्याची सारी पापं दूर होतात. नित्य कहाणी करतात, त्यांना विष्णुलोकाची प्राप्ती होते.
ही साठा उत्तरांची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.श्रीविष्णूची कहाणी