अकबर बिरबलाची पहिली भेट कशी झाली याचा हा उत्तरार्ध आहे. यापूर्वीची गोष्ट वाचा इथे: अकबर बिरबलाची पहिली भेट.
महेशदास दुसऱ्या दिवशी दरबारात पोहोचला. तो दाराशी असतानाच कालचा बहुरूपी मान खाली घालुन तिथुन परत येत होता.
महेशदासने त्याला त्याला काय झाले असे विचारले.
बहुरुप्याने सांगितले कि त्याला दरबारात बादशहाची भेट घ्यायला जायला जमलेच नव्हते. दरबाराच्या रखवालदाराने त्याला आत न जाऊ देता दारातूनच हाकलले होते. त्याला बादशहाने स्वतः बोलावले आहे हे म्हणणे ऐकूनच घेतले नव्हते.
महेशदास त्याला घेऊन दारापाशी गेला. पुन्हा त्या रखवालदाराने त्यांना अडवले.
महेशदासने त्याला धिटाईने सांगितले कि अकबर बादशहा काल स्वतः शहरात आले होते आणि त्यांच्यवर खुश होऊन बक्षीस देण्यासाठी दरबारात बोलावले होते. बक्षिसाचे नाव ऐकताच रखवालदाराचा विचार पालटला.
त्याने त्यांना आत सोडायचे एका अटीवर कबुल केले. बादशहा बक्षीस म्हणुन जे काही देईल त्यातला अर्धा वाटा त्याला द्यायला हवा. नाही तर त्यांना परत फिरावे लागेल.
महेशदास आणि तो बहुरूपी याला कबुल झाले. नाही म्हटले तर काहीच मिळाले नसते त्यापेक्षा अर्धे बक्षीस तरी मिळेल ह्या विचाराने ते आत गेले.
त्यांना पाहुन बादशहा खुश झाला. त्याने दरबारातल्या लोकांना कालचा किस्सा सांगितला. तो हुन्नरी कलावंत आणि बारीक निरीक्षणशक्ती असणारा महेशदास दोघांचे कौतुक केले.
त्यांना पुढे बोलावले आणि सेवकाच्या हातुन मोहरांची थैली घेऊन आधी बहुरुप्याला दिली. बहुरुप्याने थैली घेतली आणि बादशहाला कुर्निसात करून आभार मानले आणि मागे सरकला.
बादशहा महेशदासला सुद्धा मोहरांची थैली देणार असताना महेशदास म्हणाला “माफी असावी हुजूर. पण मला मोहरांची बक्षीस नको.”
अकबराला आश्चर्य वाटले. एवढे पैसे मिळत असताना कोण नाही म्हणेल. पण त्याला वाटले कि आहे मुलगा अजून काही तरी मूल्यवान मागेल. त्याने विचारले “मग काय बक्षीस हवे तुला?”
“हुजूर मला १०० चाबकाचे फटके द्या.”
दरबारातले सगळेच चमकले. काही लोक हसायला लागले. अकबराने हुशार म्हणून कौतुक केलेला मुलगा मुर्खासारखे बोलत होता. पैशांना नाही म्हणुन फटके द्या म्हणत होता.
“चाबकाचे फटके आणि मोहरा यातला फरक कळत नाही कि काय तुला? किती वेदना होती काही अंदाज आहे का? आम्ही तुला हुशार समजुन बक्षीस द्यायला बोलावले पण तू तर मूर्ख दिसतोस.”
“हुजूर तुम्हाला बक्षीस द्यायचे नसेल तर हरकत नाही. मी तसाच परत जाईन.”
“माझ्या दरबारातून कोणी रिकाम्या हाताने गेलेलं मला आवडत नाही. आणि मी स्वतः बोलावलेलं असताना तर अजिबात नाही. पण मला ह्याचं कारण तरी सांग. का हवेत तुला चाबकाचे फटके.”
“हुजूर, दरबाराच्या पहारेकऱ्याने जे काही बक्षीस मिळेल त्याच्या अर्धे त्याला मिळायला हवे ह्या अटीवर आम्हाला आत सोडले. तुमच्या दरबारात सामान्य लोक आपल्या तक्रारी अडचणी घेऊन येतात, त्यांची अशी लूट होत असेल, तर मला पैसे मिळाले नाही तरी चालेल, पण अशा माणसाला लोकांचे दुःख समजावे म्हणुन मी हे बक्षीस मागितले. माझ्या बक्षिसाच्या अर्धे फटके त्याला द्यावेत.”
आपल्या रखवालदाराच्या लाचखोरपणाबद्दल ऐकून अकबर संतापला. त्याने त्या रखवालदाराला बोलावुन घेतले.
अकबर म्हणाला “हा मुलगा म्हणतोय कि त्याला मी जे काही बक्षीस देईन त्याच्या अर्धे तुला द्यावे ह्याच अटीवर तू आत सोडले आहेस. हे खरंय का?”
रखवालदार घाबरला. पण त्याला आता खोटं बोलुन चालणार नव्हतं. अकबरासमोर खोटं बोलण्याची त्याची हिंमत नव्हती. त्याने मान खाली घालुन म्हटले “होय हुजूर.”
अकबर म्हणाला “मला दरबारात सोडण्यासाठी तू लाच घेतलीस हे अजिबात आवडलं नाही. पण तू आता खरं बोललास ते चांगलं केलंस. तुला आता मी ह्याचं अर्ध नाही पूर्ण बक्षीस देतो.”
रखवालदार खुश झाला. त्याने अत्यंत आनंदाने बादशहाचे आभार मानले. “बडी मेहेरबानी आपकी हुजूर.”
“अरे बक्षीस काय आहे ते तरी विचार. ह्या मुलाने बक्षीस म्हणुन १०० चाबकाचे फटके मागितले आहेत. ते आम्ही पूर्ण तुला देणार.”
आता रखवालदाराला चेहरा पांढराफटक पडला. त्याने अकबरासमोर लोटांगण घालुन माफी मागितली.
अकबर संतापाने ओरडला “घेऊन जा ह्याला आणि चौकात नेऊन सगळ्यांसमोर १०० फटके मारा. माझ्या जनतेला लुटणाऱ्याची काय शिक्षा असते हे सगळ्यांना कळू देत.”
इतर शिपाई त्याला पकडून घेऊन गेले.
अकबराने महेशदासला पुन्हा जवळ बोलावले आणि त्याने नाकारलेली मोहरांची थैली दिली. आणि म्हणाला “हि तुझ्या कालच्या हुशारीबद्दल.” अजून एक थैली त्याला देत म्हणाला “आणि हि तू आज आमच्याच दरबारात असले वाह्यात काम करणाऱ्याला पकडून दिल्याबद्दल.”
महेशदासने बादशहाला मुजरा करून आभार मानले.
अकबराने त्याला नोकरीत ठेवून घेतले. महेशदासने आपल्या हुशारी, चातुर्य आणि हजरजबाबीपणामुळे बादशहाचे मन जिंकुन घेतले. तो पुढे जाऊन अकबराचा वजीर म्हणजे एक मुख्य मंत्री बनला. अकबराला प्रतिभावान लोकांची कदर होते. त्याच्या दरबारात नवरत्ने होती. म्हणजे नऊ मौल्यवान रत्ने. बिरबल त्या नवरत्नांपैकी एक होता.
त्याकाळात चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना बादशहाकडून वेगवेगळे किताब आणि उपाध्या मिळत असत. अकबराने महेशदासला “राजा बिरबल” असा किताब दिला. बिरबल हा वीरबळ किंवा वीरवर ह्याचा अपभ्रंश असल्याचे सांगतात. त्याचा अर्थ मोठा वीर. किंवा हजरजबाबी असाही होतो.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take