You are currently viewing दोन संतांची तीर्थयात्रा

दोन संतांची तीर्थयात्रा

ज्ञानेश्वरांमुळे नामदेवांच्या आयुष्यात फार बदल घालून आला होता. त्यांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला होता, आपल्या ज्ञानातली कमतरता दूर केली. 

ज्ञानेश्वरांनी नामदेवांना सोबत घेऊन पंढरपूरातून तीर्थयात्रा सुरु केली. भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना, पवित्र स्थळांना, ज्योतिर्लिंगांना त्यांनी भेटी देणे सुरु केले. 

काही ठिकाणी ह्या दोघांनीच तर काही ठिकाणी इतर भावंडांना आणि साथीदारांना घेऊन तीर्थयात्रा केली असे उल्लेख आहेत. ह्या दोघांनी सोबत यात्रा केली हे मात्र निश्चित. 

हरिनाम घेत घेत, वाटेत अध्यात्मावर चर्चा करत दोघांचा छान प्रवास चालला होता. महाराष्ट्रातल्या दोन महान संतांचा हा सोबतचा प्रवास होता. दोघांनी मिळुन भारतभर लोकांना भेटुन, त्यांच्यात मिसळुन भक्तीचा उपदेश केला. भागवत धर्माचा प्रचार केला. 

एकदा वाटेत त्यांना एक जंगल लागले. पूर्वी आज सारखे मोठ मोठे रस्ते नव्हते. अनेक ठिकाणी कच्चे रस्ते, घनदाट जंगल असायचे. माणसांची वर्दळ नसायची. अशा ठिकाणी दरोडेखोर डाकूंच्या टोळ्या लोकांना अडवुन बळजबरीने त्यांच्याकडुन मिळेल ते धन लुटून न्यायच्या. 

असाच एक दरोडेखोर त्यांच्यासमोर आला. त्याने नेहमीप्रमाणे सुरा काढला आणि समोर आलेल्या प्रवाश्यांकडे त्यांच्याजवळची सगळी संपत्ती द्या नाही तर जीव घेईन अशी धमकी दिली. ज्ञानेश्वर नामदेव काही त्याला नेहमी भेटणाऱ्या प्रवाशांसारखे नव्हते. ते जराही घाबरले नव्हते. 

त्यांनी सांगितलं कि एक देवाचं नाव हीच त्यांची संपत्ती आहे. दुसरं त्यांच्याजवळ देण्यासारखं काही काही. असं म्हणुन ते हरिनामाचा जप करत बसले. अशा प्रकारचे संत पाहुन तो दरोडेखोर चक्रावला. इतक्या भल्या माणसांना लुटायचा प्रयत्न केला म्हणुन त्याला पश्चाताप झाला. 

त्याने दोघांची माफी मागितली. तो त्या दोघांच्या सोबतच चालु लागला. जंगलाच्या शेवटपर्यंत त्याने दोघा संतांची सोबत केली. त्याचा पुनर्जन्मच झाला होता. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी त्याला हरीपाल (हरपाल) असे नाव दिले. 

पुढे एकदा फिरता फिरता त्यांना तहान लागली, जवळ कुठेही पाणी नव्हते. बरेच चालल्यावर एक विहीर लागली तीही जवळपास कोरडी. अगदी तळाशी थोडे पाणी होते. ज्ञानेश्वरांनी सूक्ष्मरूपात खाली जाऊन पाणी पिले आणि थोडे पाणी नामदेवांसाठी घेऊन वर आले. 

नामदेव म्हणाले माझा विठ्ठल देईल कि पाणी. त्यांनी विठ्ठलाची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेमुळे ती विहीर पूर्ण भरली. नामदेवांनी मग पाणी पिले. विहिरीत पाणी मिळाल्यामुळे आसपासचे रहिवासीसुद्धा आनंदित झाले. त्यांनी संतांना नमन केले. त्या विहिरीला नामदेवांचेच नाव पडले. नामदेव विहीर किंवा हिंदीत नामदेव कुआ असे तिला म्हणतात. 

काही दिवसांनी ते तीर्थयात्रा पूर्ण करून पुन्हा पंढरपुरात पोहोचले. त्यानिमित्ताने पंढरपुरात संतांचा आणि भक्तांचा मेळावाच भरला. भजन कीर्तनाला बहार आली. विठोबा रखुमाई सोबतच जमलेल्या लोकांनी ज्ञानेश्वर आणि नामदेवांचा सुद्धा जयजयकार केला. 

संत नामदेवांनी ज्ञानेश्वरांसोबत सुरु केलेला तीर्थयात्रा करून भक्तीच्या प्रसाराचा कार्यक्रम आयुष्यभर सुरु ठेवला. त्यानंतरही त्यांनी भारतात बरीच भ्रमंती केली. त्यांचे भारतभरात अनेक लोक भक्त आहेत. 

प्रतिक्रिया व्यक्त करा