आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता.
त्याला दोन आवळे-जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आई-वडील वारले. भाऊबंदानी त्याचं सगळं हिरावून घेतलं.
पुढं ती मुलं जाता-जाता एका नगरात आली. दोन प्रहराची वेळ झाली. चालून-चालून ते दमून गेले. भुकेने व्याकुळ झाले.
त्याच वेळी एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणाला त्यांची दया आली. त्याने त्यांना घरी नेलं. आणि खाऊ घातलं. ब्राह्मणानं त्यांना ठेवून घेतलं व वेदाध्ययन शिकवू लागला. पुढं काही दिवसांनी तो ब्राह्मण ललितापंचमीचं व्रत करू लागला.
तेव्हा शिष्यांनी गुरुजींना विचारलं, “हे आपण काय करता ?”
तेव्हा गुरुजी म्हणाले, ” हे उपांगललितापंचमीचं व्रत आहे. ह्यानं द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते आणि इच्छित हेतू प्राप्त होतात.”
शिष्यांनीही यथाशक्ती व्रत केले. त्यांना लवकर विद्या आली. त्यांचे विवाह झाले. ते आपल्या नगरात आले. श्रीमंत झाले. त्यांना कीर्ती मिळाली आणि ते सुखा-समाधानानं राहू लागले. याप्रमाणे काही दिवस गेले.
पुढे दोघे भाऊ वेगळे निघाले.
मोठा भाऊ दर वर्षी ललितापंचमीचं व्रत करी; त्यामुळे त्याची धनसंपत्ती कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली. देवीला राग आला; त्यामुळे त्याला दारिद्र्य आलं.
पुढं ती पति-पत्नी मोठ्या भावाकडे राहावयास गेली. एके दिवशी मोठ्या भावाची पत्नी दिराला काही बोलली.
त्याला राग आला व पश्चात्ताप झाला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, “मी उपांगललितेचं व्रत टाकलं. त्याचं मला हे ॥ फळ आलं. अपमान सहन करून इथं राहणं चांगलं नाही. मी देवीला प्रसन्न करीन, तेव्हाच घरी येईन,” असं बोलून तो गेला.
हिंडता हिंडता त्याला एक नगर लागले. त्या नगराचे नाव उपांग व राजाही उपांगच होते.
तिथं ललितेचं एक देऊळ होतं. त्यानं देवीचं दर्शन घेतलं. मनोभावे पूजा करून अनन्यभावानं तिला शरण गेला. रात्री देवळातच निजला. देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला “राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग. त्याची नेहमी पूजा कर; म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील.”
त्या दृष्टांताप्रमाणे तो राजाकडे गेला. झाकणं मागितलं. राजानं ते दिलं. ते घेऊन आपल्या गावी घरी येऊन त्याची पूजा करू लागला. ललितादेवीचं व्रत करू लागला. त्याला पुनः सुखाचे दिवस आले. मनोरथ पूर्ण झाले.
पुढं देवीच्या आशीर्वादानं त्याला एक मुलगी झाली. मैत्रिणीबरोबर ते झाकण घेऊन ती मुलगी नदीवर खेळायला गेली. तिथं जाऊन आंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडविलं, तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं सुंदर रूप प्राप्त झालं.
ते पाहून आपला हा पती असावा, असं तिला वाटलं. आपला हेतू त्याला कळविला.
“पण हे घडणार कसं?” त्यानं विचारलं.
तेव्हा ती म्हणाली, “मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते. जेवायच्या वेळेस अपोषणी हातात घ्या आणि अडून बसा. म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील, ‘भटजी, उपोषणी का घेत नाही ?’ तेव्हा सांगा की, आपली कन्या मला द्याल, तर जेवतो; नाही तर असाच उठतो. म्हणजे ते देतील.”
त्याप्रमाणं घडलं. चांगला मुहूर्त पाहून मुलीचा विवाह करून दिला. मुलीने जातेवेळी प्रसादाचं झाकण नेलं; त्यामुळे वडिलांच्या घरातील सगळं द्रव्य गेलं. तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं. मुलीनं ते दिलं नाही.
बायकोनं तोच राग मनात ठेवला. एके दिवशी आई मुलीच्या घरी निघाली. वाटेत जावई भेटला. सासूनं त्याला ठार मारलं. झाकण घेऊन ती घरी आली.
इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्याईनं जावई जिवंत झाला. घरी येऊन बायकोला झालेली हकीगत सांगितली. तिला मोठा आनंद झाला.
पुढं ही सगळी हकीगत सासूला समजली. तशी ती जावयाच्या घरी आली व क्षमायाचना केली. तिच्या अशा कर्मामुळे तिला गरीबी आली.
असं का व्हावं, याचं कारण त्याच्या लक्षात येईना. तो मोठ्या भावाकडे गेला. त्याला सगळी हकीगत सांगितली.
तो म्हणाला, “तू ललितापंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस; त्याच्यामुळे असं होतं. व्रत नेम व्यवस्थित कर. देवीची पूजा कर. तिला शरण जा; म्हणजे तुझे कल्याण होईल.”
तो घरी आला. व्रत करू लागला. देवीची पूजा करू लागला. त्यामुळे काही दिवसांतच त्याची गरीबी दूर झाली. मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले. तसे तुमचे-आमचे होवोत.
ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.