You are currently viewing अंगारकी चतुर्थीची कहाणी

अंगारकी चतुर्थीची कहाणी

अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी राहत होते. त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. ते गणेशाचे निस्सीम भक्त होते. आश्रमात येणाऱ्या मुलांना ते गणेशाची आराधना शिकवत असत. त्यांना मूलबाळ नव्हते.

एके दिवशी भारद्वाज मुनी नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करीत बसले. त्या वेळी नारदांची स्वारी तेथे आली. नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले आणि म्हणाले, “हे बघा, गणेशदेव तुम्हाला प्रसन्न झाला आहे. तुमच्यासमोर जे तान्हं बाळ आहे, तो गणेशानंच तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आहे. ” 

भारद्वाजमुनींना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या मुलाला मांडीवर घेतले. लाल लाल जणू अंगारच. ते म्हणाले, ” या बाळाचे नाव अंगारक पुत्र. मला भूमीने दिला; म्हणून याला भीम म्हणूया.”

मुनींनी त्या बाळाला आपल्या आश्रमात नेले. मोठ्या प्रेमाने त्याचं लालन पालन केलं. बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकविली. तो गणेशाची आराधना करू लागला. 

एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला. त्याने नर्मदेची परिक्रमा केली. तेथील एका निवांत जागी त्यांनी गणेशाची कठोर आराधना केली. संकष्टी चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या ध्यानात मग्न झाला. 

त्याची कठोर साधना फळास आली. गणेश प्रगट झाले. ते म्हणाले, “वत्सा, तुझे कल्याण असो. तुला काय हवं ते मागून घे.”

“मला धन, मान काहीच नको. कीर्ती नको. तुमच्या रूपात मला विलीन करा. मुक्त करा.” 

बाळाची मागणी ऐकून श्री गणेश म्हणाले, “तथास्तु! अंगारका, तू भूमीपुत्र मंगळ आहेस. आज मंगळवार आहे. संकष्टी चतुर्थीही आहे. ही माझी आवडती तिथी आहे. आज तू माझ्याशी एकरूपता प्राप्त तू केलीस. तुझ्यामुळे मी मंगलमूर्ती झालो. आजच्या मंगळवारी संकष्टी चतुर्थीला ‘अंगारकी चतुर्थी’ हे नाव दिले जाईल. अशा या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य लाभतं.” 

बाळ अंगारक गणेशमूर्तीत विलीन झाला. पुढं अंगारकी चतुर्थीचे व्रत सारेजण निष्ठेने करू लागले. त्यांना गणेश देवता प्रसन्न होऊ लागली. 

ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा