गजानन महाराज एकदा फिरायला निघाले होते.
कडक उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य प्रचंड तापला होता.
महाराजांना तहान लागली होती.
त्यांना समोरच्या एका शेतात एक शेतकरी दिसला.
त्यांनी शेतकऱ्याला पाणी मागितले. “बाबा रे, फार तहान लागली आहे. पाणी देतोस का जरा? जलदानाचे पुण्य होईल.”
शेतकऱ्याने स्वतःसाठी काम करताना पाणी लागेल म्हणुन घरून एक कळशी भरून पाणी सोबत आणले होते.
शेतकरी महाराजांना ओळखत नव्हता. महाराज दिगंबर अवस्थेत (म्हणजे एकही कपडा न घालता) फिरत असत.
महाराजांकडे पाहुन शेतकऱ्याला वाटले “मी एवढ्या उन्हाचे घरून पाणी डोक्यावर वाहुन आणले. दिवसभर काम करून माझा थकवा घालवण्यासाठी मला पाणी लागते. आणि हा रिकामटेकडा नागडा वेडसर मनुष्य काहीही न करता माझ्या वाटचे पाणी मागतोय.”
असा विचार करून शेतकऱ्याला राग आला.
तो महाराजांना म्हणाला “तुझ्या सारख्या धडधाकट नागड्याला पाणी देऊन कसले आलेय पुण्य? दान सत्पात्री असावे. एखाद्या दुर्बल, अपंग, असहाय्य व्यक्तीने मागितले असते तर दिले तरी असते. तु काही लोकांच्या भल्याचे काम करत असतास तर त्याबद्दल तरी द्यावे वाटले असते. तु निघ इथुन.”
महाराजांनी त्याचे बोलणे ऐकुन मंद स्मित केले आणि तिथुन पुढे एक विहीर दिसत होती तिकडे निघाले.
शेतकरी ओरडला, “अरे ती विहीर कित्येक वर्षांपासुन कोरडी पडली आहे. एक थेंब नाही त्यात. तिथेच काय आसपास कुठेच पाणी नाही या दिवसात. तु जा इथुन.”
महाराज म्हणाले “ठीक आहे. तू म्हणतोस तसे लोकांच्या भल्याचे काही काम करून बघतो.”
महाराज विहिरीजवळ गेले आणि वर आकाशाकडे पाहत देवाची प्रार्थना केली. आणि चमत्कार झाला.
त्या विहिरीत पाझर फुटला आणि वेगाने पाणी वर यायला लागले. काही क्षणातच विहिरीत पाणी भरून ओसंडून वाहायला लागले.
आता शेतकऱ्याला हा माणुस वेडसर नसुन कोणी सिद्ध पुरुष आहे हे समजले होते. तो धावत आला आणि महाराजांचे पाय धरले.
“क्षमा करा, महाराज. मी आपणास ओळखले नाही. नकळत आपला अपमान केला.”
महाराज हसले. “घाबरू नकोस. आता तुझ्या शेतात मुबलक पाणी आहे. अशीच मेहनत कर आणि छान मळा फुलव.”
शेतकऱ्याला आता शेतीत रस उरला नव्हता. तो म्हणाला “महाराज, आता आपल्यासारख्या सिद्ध पुरुषाचे दर्शन झाले. आता मला ह्या शेतीत काही रस उरला नाही. मला आपल्या सोबत राहू द्या.”
हा शेतकरी म्हणजे महाराजांचे एक प्रसिद्ध भक्त भास्करराव पाटील. या प्रसंगानंतर ते कायम महाराजांसोबत राहिले.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take