You are currently viewing रवींद्रनाथ टागोर

रवींद्रनाथ टागोर

विश्वकवि, गुरुदेव अशा उपाध्यांनी ओळखले जाणारे रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७-मे-१८६१ रोजी बंगालच्या मोठ्या जमीनदार घराण्यात देवेंद्रनाथ टागोर आणि सरलादेवी यांच्या पोटी झाला. ते १३ भावंडांपैकी सर्वात लहान होते. 

बंगालीमध्ये त्यांचे नाव (आणि स्पेलिंगसुद्धा) रबिन्द्रनाथ किंवा रोबिंद्रनाथ असे म्हटले जाते. आडनावाचाही मुळ उच्चार ठाकुर असा आहे. त्या काळात काही आडनावे इंग्रजीत म्हणणे सोपे जावे म्हणुन किंवा इंग्रजांना म्हणता येणे सोपे जावे म्हणुन थोडी बदलली गेली होती. उदा. चटोपाध्याय -> चॅटर्जी, मुखोपाध्याय -> मुखर्जी, ठाकुर -> टागोर. 

टागोर घराणे फार मोठे होते. बंगालमध्ये त्यांची फार मोठी मालमत्ता होती. घरातही नोकर चाकर बरेच असत. इतकी भावंडे आणि त्यात सर्वात लहान असल्यामुळे रवींद्रांचा जास्त सांभाळ या नोकरांनीच केला. त्यांची आई ते किशोरवयीन असतानाच गेली. 

त्यांच्या घरी मान्यवर, विद्वान, साहित्यिक अशा लोकांचा राबता असायचा. त्यांचा चांगला प्रभाव सर्व भावंडांवर पडायचा. टागोरांचे वडील आपल्या मुलांना शास्त्रीय संगीत शिकवायला खास शिक्षक घरी बोलवत असत. टागोर स्वतः अनेक कलांमध्ये निपुण होतेच, पण त्यांच्या भावंडांनीही संगीत, कला, साहित्य, तत्वज्ञान अशा क्षेत्रात नाव कमावले होते. 

रवींद्रनाथांना शाळा कॉलेज अशा बंदिस्त वातावरणातल्या रूढ पद्धतीच्या शिक्षणात फार रस नव्हता. त्यांना शिकायला खुप आवडायचं, पण ते अनेक विषयांचा स्वतः भरपूर पुस्तके वाचुन, भाऊ आणि वडिलांसोबत अभ्यास करून शिकायचे. त्यांना वर्गात जायला मात्र आवडत नसे. 

ते तरुण असतानाच त्यांच्या वडिलांसोबत भारतभ्रमण करून आले. यातुन त्यांना खुप शिकायला मिळालं. ते कविता लिहायला लागले, कथा लिहायला लागले. 

त्यांच्या वडिलांना रवींद्रनाथांनी बॅरिस्टर व्हावे अशी इच्छा असल्यामुळे इंग्लंडला शिकायला पाठवले. पण तिथे काही दिवसातच त्यांचा कायद्याच्या शिक्षणातुन रस उडाला, आणि त्यांनी उलट शेक्सपिअरचे साहित्य, युरोपातल्या संगीत आणि इतर लोककलांचा जवळुन अभ्यास केला. तिकडुन डिग्री न घेताच ते परत आले. 

भारतीय कला-साहित्य, युरोपीय कला-साहित्य, संगीत, लोककला या सगळ्यांचा रवींद्रनाथावर बराच प्रभाव होता. यातुन जे जे शिकायला मिळालं त्या सर्वांचा त्यांनी आपल्या कलेत वापर केला. त्यांनी अनेक कविता, कथा, लघु कथा लिहिल्या, गीते लिहिली, हजारो गीतांना संगीत दिले. त्यांच्या वेगळ्याच धाटणीच्या संगीताला “रवींद्र संगीत” म्हणुन ओळखले जाते. 

त्यांचं साहित्य बंगाल मध्ये तर लोकप्रिय झालंच पण इतर भाषांमध्ये भाषांतर होऊन त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळायला लागली. त्यांचा “गीतांजली” हा काव्यसंग्रह विशेष लोकप्रिय झाला. त्याबद्दल त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले एशियन व्यक्ती ठरले. इंग्लंडच्या राजाकडूनही त्यांचा “सर” हा किताब देऊन गौरवण्यात आले. 

पुढे जेव्हा जालियनवाला बागेतले हत्याकांड झाले, तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी याची निर्भत्सना करत ती पदवी परत केली. “अवॉर्ड वापसी”चे आद्य जनक बहुधा तेच असावेत. स्वातंत्र्य चळवळीत ते सक्रिय होते. गांधीजी, नेहरूजी, सुभाषजी अशा अनेक नेत्यांशी त्यांचा संपर्क असायचा. 

त्यांनी अनेक देशात प्रवास केला. तिथल्या आईन्स्टाईन, मुसोलिनी अशा मोठ्या व्यक्ती, तिथले प्राध्यापक, तत्वज्ञ, विचारवंत अशा लोकांच्या भेटी घेऊन विचारांची देवाणघेवाण केली. तिथल्या कॉलेजेसमध्ये व्याख्याने दिली. पुढे ते राष्ट्रवादाऐवजी, आंतरराष्टीयवाद म्हणजे राष्ट्रांच्या सीमा धूसर होऊन सर्व देशांनी आपसातले सहकार्य वाढावे, समस्त मानवजातीने एकत्र येऊन पुढे वाटचाल करावी अशा विचारांकडे वळले होते. 

असे विचार, बंद खोलीतल्या शिक्षणाचा तिटकारा या कारणांमूळे त्यांनी मुक्त वातावरणात शिक्षण द्यावे या हेतूने शांतिनिकेतन विश्वविद्यापीठाची स्थापना केली. ह्याच्या संस्थापनेत, नवीन शिक्षणपद्धती घडवणे, मुलांना शिकवणे यासाठी टागोरांनी खुप मेहनत घेतली. हि संस्था अजूनही कार्यरत आहे. इथे झाडांखाली, बागेत मुलांना विविध विषय शिकवले जातात. 

पु. ल. देशपांड्यांवर टागोरांचा खुप प्रभाव होता. त्यांचे साहित्य थेट बंगालीत त्यांनी लिहिले तसे वाचावे अनुभवावे म्हणुन ते शांतिनिकेतनला जाऊन राहिले होते, बंगाली शिकले होते. 

टागोरांच्या गीतांना दोन देशाचे राष्ट्रगीत होण्याचा मान मिळाला. त्यांनी लिहिलेले “जण गण मन” हे गीत भारताचे, आणि “आमार शोनार बांगला” हे गीत बांगलादेश चे राष्ट्रगीत आहे. 

उतारवयात ते बराच काळ आजारी होते. तशा अवस्थेतही त्यांचे कविता करणे चालूच होते. ७-ऑगस्ट-१९४१ रोजी त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी प्रदीर्घ आजारपणातुन देहावसान झाले.

लेखक: आकाश खोत

व्यवसाय एक (संगणक अभियंता) 
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )

माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा! 

वैयक्तिक ब्लॉगskyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल:  Thats My Take

प्रतिक्रिया व्यक्त करा