भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना आज सर्व देश भारतीय संविधानाचे जनक म्हणुन ओळखतो. त्यांनी भारतीय संविधान बनवणाऱ्या समितीचे अध्यक्षपद भुषवून फार मोलाची कामगिरी केली. दलितांच्या उद्धारासाठी प्रचंड लढा दिला.
त्यांच्या काळात ते सर्व नेत्यांमध्ये सर्वात जास्त शिकलेले, उच्च विद्याविभूषित, परदेशी विद्यापीठामधुन डॉक्टरेट मिळवलेले दुर्मिळ राजकारणी होते.
पण त्यांच्या या उच्च शिक्षणाचा मार्ग मुळीच सोपा नव्हता. ते महार जातीत जन्मले होते. त्या काळात अस्पृश्यता अत्यंत अन्यायकारक पद्धतीने पाळली जायची. अस्पृश्य लोकांना अनेक शतके शिकण्याची परवानगीच नव्हती. आंबेडकरांच्या काळी त्यांना शाळेत प्रवेश तर मिळाला पण अत्यंत अपमानकारक परिस्थितीत शिकावे लागले.
त्यांना शाळेत कोणीही शिवत नसे. वर्गात त्यांना कोपऱ्यात बसावे लागे. अगदी शाळेच्या फरशीलाही त्यांचा स्पर्श नको म्हणुन त्यांना आपल्या घरून एक गोणी आणुन त्यावर बसावे लागायचे आणि ती गोणी नंतर पुन्हा घरी घेऊन जावी लागायची.
त्यांना तहान लागली तर त्यांना स्वतःच्या हाताने पाणीसुद्धा पिता येत नसे. शाळेचा चपराशी येऊन त्यांच्या ओंजळीत उंचावरून स्पर्श न करता पाणी ओतायचा आणि मग ते पाणी प्यायचे. जर तो चपराशी जागेवर नसेल तर त्यांना तहानलेलेच राहावे लागायचे.
तरीही डॉ. आंबेडकर त्यांच्या एका शिक्षकांचे मात्र लाडके होते. त्यांचे नाव कृष्णाजी केशव आंबेडकर.
डॉ. आंबेडकरांच्या वडिलांचे आडनाव सकपाळ होते. पण त्यांनी आपल्या मुलाचे नाव शाळेत नोंदवताना आडनाव “आंबडवेकर” असे आपल्या आंबडवे गावाच्या नावावरून लिहिले होते. ह्या आंबेडकर गुरुजींचे त्यांच्या शिष्यावर विशेष प्रेम होते. त्यांनीच बाबासाहेबांचे आडनाव बदलुन आपल्यासारखे करून घेतले. आणि ह्या शिष्यानेही त्यांचे नाव अजरामर करून त्यांना गुरुदक्षिणा दिली.
पुढे ते साताऱ्याहून मुंबईला राहायला गेले तेव्हा तिथेही त्यांना अस्पृश्यतेमुळे अडचणी आल्या. त्यांना तिथल्या शिक्षकांनी संस्कृत शिकवायला नकार दिला. त्यांना मनाविरुद्ध फारशी शिकावी लागली. पण पुढे मात्र त्यांनी संस्कृत शिकून सर्व ग्रंथांचा अभ्यास केला.
त्यांना पुस्तके वाचण्याची अतिशय आवड होती. ते भरपुर पुस्तके आणत असत. लहानपणी त्यांच्या वडिलांकडे पुस्तके आणण्याइतके पैसे नसल्यामुळे त्यांना बऱ्याचदा उसनवारी करून, खूप प्रयत्न करून पुस्तके आणावी लागायची.
गरिबीमुळे त्यांच्या भावाने ह्यांचे शिक्षण चालु राहावे म्हणुन स्वतः शिक्षण सोडले. डॉक्टरांनीही त्यांचा त्याग वाया जाऊ दिला नाही.
ते रस्त्यावरच्या दिव्याखाली बसुन अभ्यास करायचे. त्यांची शिकण्याची जिद्द आणि मेहनत यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाल्या. परदेशात जाऊन ते कायदे, अर्थशास्त्र यांचा अभ्यास करून आले. बॅरिस्टर हि मनाची पदवी मिळवली. तसेच अर्थशास्त्रात दोन विद्यापीठातुन डॉक्टरेट मिळवली.
परदेशातुन येताना ते हजारो पुस्तके घेऊन येत. असे करता करता मुंबईच्या त्यांच्या खाजगी ग्रंथालयात जवळपास ५० हजार पुस्तके जमली होती.
ज्याच्या समाजाला शिकणेही अवघड होते, अशा समाजातला एक मुलगा कुठल्याही अपमानाला अडचणीला न जुमानता इतकं ज्ञान मिळवतो हे किती कौतुकास्पद आहे.
आजकाल एखाद्या परीक्षेत नापास झाल्यामुळे, किंवा पास होऊनही मनासारख्या कॉलेजात नंबर न लागल्यामुळे, नोकरी गेल्यामुळे लहान मुले ते मोठी माणसं आपला जीव देऊन टाकतात. आई बाबा काय म्हणतील, लोक काय म्हणतील हा अपमान त्यांना सहन होत नाही किंवा स्वतःचीच निराशा सहन होत नाही.
अशा लोकांनी डॉक्टर आंबेडकरांचे उदाहरण डोळ्यासमोर आणावे. त्यांनी जे अपमान, अडचणी, प्रतिकुलता सहन केली आणि तरीही न हारता पुढे जात राहिले, तेवढी प्रतिकूलता आजकाल नक्कीच नसते. त्यांच्या जिद्दीपासुन प्रेरणा घेऊन तशाच जिद्दीने आपणही आपापल्या आयुष्यात पुढे जात रहावे.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take