You are currently viewing शनिवारची (मारुतीची) कहाणी

शनिवारची (मारुतीची) कहाणी

एका आटपाट नगरात एक ब्राह्मण, मुलगा व सून राहत होते. 

मुलगा प्रवासाला गेला. सासू-सासरे देवाला जात; भिक्षा मागून धान्य आणीत. सून स्वयंपाक करे, सासू-सासऱ्यांना वाढून उरलं सुरलं आपण खात असे. 

श्रावण महिन्यात शनिवारी एक मुलगा आला. म्हणाला, “बाई, मला न्हाऊ-माखू घाला.” 

ती म्हणाली, “बाबा ! घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू ?”

“माझ्यापुरतं घागरीत तेल असेल. थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल आणि जेवू घाल.” 

सुनेनं घागरीत हात घालून तेल काढलं. त्याला न्हाऊ घालून जेवायला घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलाने तांदूळ मागून घेतले आणि जाते वेळी घरभर ते तांदूळ फेकून तो अदृश्य झाला.

इकडे घराचा वाडा झाला. गोठा गुरानं भरला. धान्याच्या कोठ्या भरल्या. दास-दासी आल्या. सासू-सासरे देवाहून आले, तो घर काही ओळखेना. वाडा कोणाचा? 

सून दारात आरती घेऊन पुढं आली. “मामंजी, सासूबाई, इकडे या !” अगं, तू कोणाच्या घरात राहिली आहेस ?” 

तिनं सर्व हकीगत सांगितली व म्हणाली, “तुम्ही चुकाल; म्हणून मी दारात उभी राहिले.” आरती करून त्यांना आत घेतलं. 

तिने गरीब असूनही तिच्या हातून होईल तेवढा तिने परोपकार केला. त्याचे पुण्य तिला मिळाले. मारुती प्रसन्न झाला, तसा तुम्हां-आम्हां होवो. 

ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

प्रतिक्रिया व्यक्त करा