शकुनीमामा आणि दुर्योधनाच्या कटात पांडव अडकले. जुगारात सगळं हरून बसले.
युधिष्ठिराने स्वतःचं राज्य, स्वतःचे भाऊ, स्वतः, आणि बायको द्रौपदी सर्वांना पणाला लावुन सर्वांना कौरवांचा दास बनवले.
दुर्योधन आणि दुःशासनाने भर सभेत द्रौपदीचा अपमान केला तेव्हा मोठा पेचप्रसंग उभा राहिला.
तेव्हा पांडवांनी १२ वर्ष वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात रहावे असा तोडगा निघाला.
पांडवांनी द्रौपदीच्या सोबतीने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत १२ वर्षे वनवास पूर्ण केला.
आता त्यांना अज्ञातवासात जायचे होते. अज्ञातवास म्हणजे ते कुठे आहेत हे कोणालाही ज्ञात न होणे, म्हणजे माहित न होणे.
द्युताच्या अटीनुसार त्यांना अज्ञातवासात कोणी ओळखले तर त्यांना पुन्हा वनवासात जावे लागणार होते.
पांडवांनी अज्ञातवासासाठी विराट राजाचे मत्स्य राज्य निवडले.
त्यांनी आपला वेष बदलला आणि विराट राजाच्या सेवेत वेगवेगळ्या नावांनी रुजू झाले. सर्वांनी आपापल्या स्वभाव आणि गुणधर्माला साजेसे रूप घेतले.
युधिष्ठिराने कंक नावाच्या ब्राह्मणाचे रूप घेतले आणि विराट राजाच्या दरबारात त्याच्याशी सल्लामसलत करणे, त्याला द्युत शिकवणे असे काम स्वीकारले.
भीमाने वल्लभाचार्य या नावाने विराट राजाच्या स्वयंपाकघरात आचारी म्हणुन काम स्वीकारले.
अर्जुनाने बृहन्नला या नावाने तृतीयपंथी नर्तिकेचे रूप घेतले आणि विराट राजाची राजकन्या उत्तरा हिला नृत्य शिकवण्याचे काम स्वीकारले.
नकुल ग्रंथिक या नावाने राजाच्या तबेल्यात घोड्यांची निगा राखु लागला.
सहदेवाने तंत्रीपाल या नावाने राजाच्या गोठ्यात गुरांची निगा राखली.
द्रौपदी सैरंध्री या नावाने राणीची दासी बनली आणि तिची मर्जी संपादन केली.
त्यांनी बरेच दिवस यशस्वीपणे अज्ञातवास पूर्ण केला. कौरवांना त्यांची अजिबात खबर लागली नाही.
विराट राजाचा मेहुणा आणि सेनापती किचक निष्णात मल्ल होता. त्याच्या बळाचा राजालाही धाक होता. त्याने सैरंध्रीला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यावर मात्र भीमाचे नियंत्रण सुटले आणि त्याने कीचकाचा वध केला.
त्याने त्याला एकटा गाठुन मारण्याची खबरदारी घेतली असली तरीही किचकाला मारू शकेल असे योद्धे मोजकेच होते. त्यामुळे तो भीमच असणार असा कयास बांधुन दुर्योधनाने विराट राजावर हल्ला केला.
पांडव राजाच्या सेवेत असतील तर त्यांना राजाच्या सोबतीने युद्ध करायला प्रकट व्हावेच लागेल आणि त्यांचा अज्ञातवास भंग होईल असा दुर्योधनाचा कट होता.
त्यांनी विराट राजाच्या गायी पळवुन नेल्या. आपल्या राज्याचे, संपत्तीचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य असते. त्यामुळे विराट राजा आणि त्याचा पुत्र आपल्या सैनिकांसह कौरवांना सामोरे गेले खरे, पण दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण अशा योद्धयांसमोर त्यांचा निभाव लागणे अवघडच होते.
वर्षभर ज्यांचे मीठ खाल्ले त्या धन्याच्या मिठाला जागुन त्यांचे रक्षण करणे हे पांडवांच्या दृष्टीने त्यांचे कर्तव्यच होते.
पांडवांनी अज्ञातवास सुरु करण्याआधी आपली शस्त्रे पाहुन कोणाला संशय येऊ नये म्हणून एका विशाल शमीच्या वृक्षाच्या ढोलीत लपवुन ठेवली होती.
अर्जुनाने जाऊन ती शस्त्रे आणली, एक वर्षभराच्या अंतराने त्यांना हाती घेण्याची, वापरण्याची वेळ आली त्यामुळे साफसुफ करून त्यांची मनोभावे पूजा केली.
बृहन्नलेच्या वेषातच त्याने सर्व कौरवांशी युद्ध करून त्यांना पराभुत केले आणि परतायला लावले.
हा दिवस दसऱ्याचा होता. या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपराच पडली.
आजकालच्या काळात खरी शस्त्रे कोणी वापरत नसले तरी ज्यांच्या घरी वडिलोपार्जित शस्त्रे असतील ती, आपापल्या व्यवसायाला अनुरूप जी अवजारे, यंत्रे असतील अशा सर्वांची पूजा करण्याची पद्धत आहे.
लेखक: आकाश खोत
व्यवसाय एक (संगणक अभियंता)
आवडी अनेक (वाचन, लिखाण, प्रवास, ट्रेक, छायाचित्रण, ब्लॉग, वलॉग, चित्रपट, मालिका….. )
माझ्याबद्दल अजुन जाणुन घेण्यासाठी खालील लिंक्स वर नक्की जा!
वैयक्तिक ब्लॉग: skyposts रँडम विषयांवरचा मराठी / इंग्रजी ब्लॉग
युट्युब चॅनेल: Thats My Take